सिंधुदुर्ग – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (एम्.एस्.आर्.टी.सी.चे) राज्यशासनात विलिनीकरण करण्यात यावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यात एस्.टी.च्या कर्मचार्यांनी ८ नोव्हेंबरपासून संप चालू केला आहे. या संपात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एस्.टी.च्या सर्व आगारांतील कामगार सहभागी झाल्यामुळे जिल्ह्यातील एस्.टी.ची वाहतूक ठप्प झाली आहे. १० नोव्हेंबर या संपाच्या तिसर्या दिवशी कामगारांनी ‘मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन चालूच ठेवणार’, अशी भूमिका घेत संप चालू ठेवला आहे.
सावंतवाडी येथे कर्मचार्यांनी भजन करत शासनाचा निषेध केला, तर कणकवली येथे संपात सहभागी न झालेल्या शिवसेनाप्रणित कामगार सेनेच्या काही कर्मचार्यांवर संपात सहभागी झालेल्या कर्मचार्यांनी पुष्पवृष्टी करून निषेध नोंदवला.
एस्.टी.च्या कर्मचार्यांना न्याय मिळेपर्यंत भाजप संघर्ष करेल ! – जिल्हा भाजप
कणकवली – महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास आणखी डबघाईस आणून त्याची कोट्यवधींची मालमत्ता खासगीकरणाच्या माध्यमातून घशात घालण्याचा सरकारचा डाव आहे; मात्र आम्ही हा डाव उधळून लावू आणि एस्.टी.च्या कर्मचार्यांना न्याय मिळेपर्यंत भाजप संघर्ष करेल, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी केले आहे.