मराठी भाषेतूनही केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होता येते ! – सुब्रह्मण्य केळकर, सनदी (आय.पी.एस्.) अधिकारी

मराठी भाषेतून यु.पी.एस्.सी.ची परीक्षा उत्तीर्ण झालेले भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी सुब्रह्मण्य केळकर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

श्री. सुब्रह्मण्य केळकर

सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – स्पर्धा परीक्षेची सिद्धता करतांना प्रामाणिकपणे केलेले प्रयत्न धेय्याकडे नेतात. मराठी भाषेतूनही केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यु.पी.एस्.सी.ची) परीक्षा उत्तीर्ण होता येते आणि अशा खूप मुलांची निवड झाली आहे. ज्यांची इंग्रजी भाषा चांगली आहे, ते इंग्रजीतून परीक्षा देऊ शकतात. प्रामाणिकपणे अभ्यास केला, तरीही काही गोष्टी आपल्या हातात नसतात. यश मिळाले नाही; म्हणून खचून न जाता, त्यासाठी अन्य पर्याय उपलब्ध करायला हवा. ज्या ज्या क्षेत्रात, जे जे कराल ते उत्तम करा, असे मार्गदर्शन मराठी भाषेतून यु.पी.एस्.सी.ची परीक्षा उत्तीर्ण झालेले अन् भारतीय पोलीस सेवा (आय.पी.एस्.) अधिकारी म्हणून तमीळनाडू येथे सेवारत असलेले सुब्रह्मण्य केळकर यांनी केले.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने ‘प्रेरणा कार्यक्रमा’च्या अंतर्गत मूळचे जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील चिंदर गावचे रहिवासी असलेले आणि मराठी भाषेतून यु.पी.एस्.सी.ची परीक्षा उत्तीर्ण झालेले अन् सध्या तमिळनाडू राज्यात सेवारत असणारे आय.पी.एस्. (भारतीय पोलीस सेवा) अधिकारी सुब्रह्मण्य केळकर यांनी ९ नोव्हेंबर या दिवशी ‘फेसबूक लाईव्ह’द्वारे केंद्रीय लोकसेवा आयोग (यु.पी.एस्.सी.) आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एम्.पी.एस्.सी.) या परीक्षा देऊ इच्छिणार्‍या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी केळकर यांचे अभिनंदन केले.

या वेळी अधिकारी केळकर म्हणाले, ‘‘स्पर्धा परीक्षांना बसणार्‍यांनी जुन्या प्रश्‍नपत्रिका अभ्यासणे आवश्यक आहे. यश मिळवण्यासाठी अभ्यासाचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. परीक्षेचा अभ्यास करतांना स्वत:साठी प्रत्येक जण ‘टाचण’ (नोट्स) काढत असतो. तुमचे कौशल्य आणि वेगळेपण ‘टाचण’ काढतांना जपले पाहिजे. इंग्रजी आणि मराठी वृत्तपत्रे वाचतांना छोटे छोटे सारांश लेखन करायला हवे. वैकल्पिक विषय निवडतांना त्या विषयांची तुम्हाला आवड असायला हवी, जेणेकरून समर्पण करून अभ्यास करता येईल. महाविद्यालयीन जीवनाचा आनंद घेतांना अभ्यासही महत्त्वाचा आहे, हे लक्षात ठेवले पाहिजे. स्पर्धा परीक्षेची सिद्धता करतांना वर्ष २०११ पासूनच्या प्रश्‍नपत्रिकांचा अभ्यास करायला हवा.’’