(म्हणे) ‘सनातन संस्थेचाही गुन्हेगारी जगताशी (अंडरवर्ल्डशी) संबंध जोडायचा का ?

देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांवर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचा प्रश्‍न !

नबाब मलिक आणि देवेंद्र फडणवीस

मुंबई – मी कुठलीही भूमी कुणाच्याही दबावाखाली किंवा कुणावर दबाव आणून घेतलेली नाही. हसीना पारकर हिलाही मी ओळखत नाही. असा कुणाचाही कुणाशी संबंध जोडायचा झाला, तर दाऊद कासकरचे कोकणातले घर सनातन संस्थेने घेतले आहे; मग ‘सनातनचा दाऊदशी किंवा गुन्हेगारी जगताशी (अंडरवर्ल्डशी) संबंध आहे’, असे म्हणायचे का?,’ असा प्रश्‍न राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांवर उत्तर देतांना केला.

देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांनी गुन्हेगारी जगताशी संबंध असलेल्यांकडून अल्पदरात भूमी घेतल्याचा आरोप केला आहे. त्यावर मलिक यांनी वरील भूमिका मांडली. तसेच ‘उद्या (१० नोव्हेंबर) सकाळी १० वाजता देवेंद्र फडणवीस यांचा गुन्हेगारी जगताशी काय संबंध आहे आणि मुख्यमंत्री असतांना त्यांनी सर्व शहराला ओलीस ठेवले होते, याविषयी मी माहिती उघड करणार आहे’, असेही मलिक यांनी म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मालमत्ता खरेदीचा विषय, म्हणजे राईचा पर्वत करण्याचा प्रकार !

मलिक पुढे म्हणाले की, असत्याचा डोलारा उभा करून कुणाची प्रतिमा मलीन होईल, असे तुम्हाला वाटत असेल, तर तुम्ही अपसमजात आहात. मालमत्ता खरेदी व्यवहाराची सर्व कागदपत्रे उपलब्ध आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मालमत्ता खरेदीच्या विषयाचा राईचा पर्वत केला जात आहे. देवेंद्र फडणवीस यांना माहिती देणारे लोक कच्चे खिलाडी आहेत. तुम्ही जर सांगितले असते, तर मीच तुम्हाला सर्व कागदपत्रे दिली असती. देवेंद्र फडणवीस यांनी बिनबुडाचे आरोप केले आहेत. त्यांना देण्यात आलेली माहिती चुकीची आहे. फडणवीस यांनी कोणत्याही यंत्रणेकडे जावे. मी अन्वेषणासाठी सिद्ध आहे. मी कोणत्याही गुन्हेगार जगतातील व्यक्तीकडून भूमी विकत घेतलेली नाही. कवडीमोल किमतीत कुठेही भूमी विकत घेतलेली नाही.