एक दिवसात गोव्यातील सर्व मंदिरांचे दर्शन घडवणार
पणजी, ६ नोव्हेंबर (वार्ता.) – राज्यशासनाने ६० वर्षांवरील नागरिकांसाठी ‘देवदर्शन’ योजना सिद्ध केली आहे. या योजनेच्या अंतर्गत ६० वर्षांवरील नागरिकांना एका दिवसात राज्यातील सर्वच मंदिरांचे दर्शन घडवण्यात येणार आहे. १ ते १९ डिसेंबर या कालावधीत समाजकल्याण खात्याच्या वतीने ही योजना राबवली जाणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.
ते पुढे म्हणाले, ‘‘देश-विदेशांतून गोव्यात येणारे पर्यटक राज्यातील मंदिरे, तसेच गोव्यातील संस्कृतीचे दर्शन घेतात; मात्र राज्यातील अनेकांनी गोव्यातील विविध ठिकाणची मंदिरे अजूनही पाहिलेली नाहीत. राज्य गोवामुक्तीचा हिरक महोत्सव साजरा करत आहे. या निमित्ताने शासनाने ‘देवदर्शन’ योजना सिद्ध केली आहे. या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणार्या नागरिकांनी आधारकार्ड आणि मतदान ओळखपत्र यांद्वारे नोंदणी करून योजनेला लाभ घ्यावा.’’