१७.१०.२०२१ या दिवशी रवि ग्रह तूळ राशीत प्रवेश करणार आहे. त्या निमित्ताने…
१. १७.१०.२०२१ या दिवशी रवि (सूर्य) ग्रहाचा तूळ राशीत होणारा प्रवेश प्रतिकूल असल्याने या काळात श्री सूर्यनारायणाची उपासना करावी !
‘१७.१०.२०२१ या दिवशी दुपारी १.१२ वाजता रवि ग्रह तूळ राशीत प्रवेश करणार असल्याने सकाळी ९.१२ वाजल्यापासून सायंकाळी ५.१२ वाजेपर्यंत पुण्यकाल आहे. हा रवि ग्रहाचा संधीकाल आहे. रवि तूळ राशीत १७.१०.२०२१ पासून १६.११.२०२१ पर्यंत रहाणार आहे. कोणताही ग्रह कायमस्वरूपी शुभ किंवा अशुभ फल देत नाही. रवि ग्रह एका राशीत १ मास असतो. यातील प्रथम ५ दिवस शुभ किंवा अशुभ फल देतो. तूळ राशीत रवि ग्रह अशुभ मानला असल्याने प्रथम ५ दिवस प्रतिकूल असतात. या काळात रोगप्रतिकारक शक्ती आणि प्राणशक्ती न्यून होते. यासाठी रवि ग्रह तूळ राशीत प्रवेश करण्याच्या पुण्यकालात सूर्यदेवतेचा ‘ॐ सूर्याय नमः।’ हा जप करावा.
२. सूर्याेपासनेचे महत्त्व
सूर्याेपासना करणे, म्हणजे तेजतत्त्वाची उपासना करणे. सूर्याच्या उपासनेमुळे सात्त्विकता आणि चैतन्य ग्रहण करण्याची क्षमता वाढते. उगवत्या सूर्याकडे पाहून त्राटक (सूर्याकडे डोळ्यांच्या पापण्या न मिटता एकटक पहाणे) केल्यावर डोळ्यांची क्षमता वाढते. सूर्याेपासनेमुळे सूर्यनाडी जागृत होते; स्मरणशक्ती, तेज, ज्ञान आणि चांगले आरोग्य प्राप्त होते, तसेच अनिष्ट शक्तींचा नाश होऊन भीती नष्ट होते. यासाठीच हिंदु धर्मात सूर्याच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. सर्वांनी प्रतिदिन शक्य होईल, ती (सूत्र क्र. ३ मध्ये दिल्याप्रमाणे) सूर्याेपासना करावी.
३. रवि ग्रह तूळ राशीत असतांना करावयाची उपासना
अ. सूर्यदेवतेचा ‘ॐ सूर्याय नमः ।’ हा जप करावा.
आ. गायत्री मंत्राचा जप करावा.
गायत्री मंत्र : ‘ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गाे देवस्य धीमहि । धियो यो न: प्रचोदयात् ।’
अर्थ : दैदीप्यमान भगवान सविता (सूर्य) देवाच्या त्या तेजाचे आम्ही ध्यान करतो. ते (तेज) आमच्या बुद्धीला प्रेरणा देवो.
इ. नवग्रह स्तोत्रातील रवि ग्रहाचा जप म्हणावा. त्याची जपसंख्या ७ सहस्र आहे.
जपाकुसुमसङ्काशं काश्यपेयं महद्युतिम् ।
तमोऽरिं सर्वपापघ्नं प्रणतोऽस्मि दिवाकरम् ।।
– नवग्रहस्तोत्र, श्लोक १
अर्थ : रक्तवर्णी जास्वंदीच्या फुलाप्रमाणे वर्ण असलेल्या, कश्यपऋषींचा पुत्र, अत्यंत तेजस्वी, अंधकाराचा शत्रू आणि सर्वपापनाशक, अशा दिनकर सूर्याला मी प्रणाम करतो.
ई. सूर्याेदयसमयी सूर्याला अर्घ्य देऊन नमस्कार करावा. अर्घ्य देतांना म्हणावयाचा श्लोक पुढे दिला आहे.
‘एहि सूर्य सहस्रांशो तेजोराशे जगत्पते ।
अनुकम्पय मां भक्त्या गृहाणार्घ्यं दिवाकर ।।
अर्थ : हे सहस्र किरण असलेल्या, तेजाची राशी असलेल्या, जगाचा स्वामी असलेल्या दिवाकरा, माझ्यावर अनुकंपा (दया) कर. मी श्रद्धेने दिलेल्या या अर्घ्याचा स्वीकार कर.
उ. सूर्यनमस्कार घालावेत.
ऊ. श्रीरामरक्षा स्तोत्र वाचावे.
ए. श्री सूर्य सहस्रनामावली ऐकावी.
ऐ. श्री सूर्यस्तुती वाचावी.
– सौ. प्राजक्ता जोशी (ज्योतिष फलित विशारद, वास्तू विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल पंडित, हस्ताक्षर मनोविश्लेषणशास्त्र विशारद), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१०.१०.२०२१)