मुंबई – नवाब मलिक यांचे सर्व आरोप खोटे आणि बिनबुडाचे आहेत. ज्या वेळी अमली पदार्थविरोधी पथकाने ‘क्रूझ’वर कारवाई केली, त्या वेळी ऋषभ बोटीवर होता; मात्र त्याचा आणि आर्यन खान याचा काहीही संबंध नाही. ऋषभ सचदेव याला कोणतेही व्यसन नाही. मलिक यांनी आरोप सिद्ध करावेत; अन्यथा मी त्यांच्या विरोधात १०० कोटी रुपयांचा खटला प्रविष्ट करीन, अशी चेतावणी मोहित कंबोज यांनी दिली आहे. कंबोज हे भाजपचे माजी सरचिटणीस आहेत. ‘क्रूझ’वर अटक करण्यात आलेला ऋषभ सचदेव हा कंबोज यांचा मेव्हणा आहे. या प्रकरणात नवाब मलिक यांनी त्यांच्यावर केलेल्या आरोपांविषयी कंबोज यांनी प्रसारमाध्यमांकडे त्यांची वरील भूमिका मांडली.
या वेळी मोहित कंबोज म्हणाले, ‘‘मागील दीड वर्षापासून मी भाजपचा पदाधिकारी नाही. या प्रकरणाचा भाजपशी काहीही संबंध नाही. नवाब मलिक यांच्या जावयाला अटक केली, म्हणजे शरद पवार यांच्याशी संबंध जोडायचा का ? मलिक यांच्या कुठल्याही प्रश्नाला मी कुठेही उत्तर द्यायला सिद्ध आहे.’’