आसाममध्ये भाजपला ‘मियां मुसलमानां’ची मते नको आहेत ! – मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा, आसाम

  • स्वातंत्र्यानंतर मतपेटीला डोळ्यासमोर ठेवून राजकारण्यांकडून मोठ्या प्रमाणात मुसलमानांचे लांगूलचालन करण्यात आले. त्यामुळे बहुसंख्यांकांच्या मूलभूत अधिकारांवरही गदा आली. त्यांना दुय्यम दर्जाच्या नागरिकाप्रमाणे वागणूक मिळाली. या पार्श्‍वभूमीवर हिमंत बिस्व सरमा यांचे धोरण बहुसंख्यांक हिंदूंना दिलासा देणारे आहे ! – संपादक
  • असे अन्य भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना वाटते का ? जर वाटत असेल, तर त्यांनीही तसे वक्तव्य केले पाहिजे, असे हिंदु धर्मप्रेमींना वाटते. मुख्यमंत्र्यांनी त्याही पुढे जाऊन हिंदुहिताचे निर्णय घेण्यासाठी कृतीशील झाले पाहिजे ! – संपादक
मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा (उजवीकडे) इंडिया टुडे’च्या चर्चासत्रात बोलताना

नवी देहली – बाहेरून आलेल्या मुसलमानांमुळे आसामने त्याची ओळख, संस्कृती आणि भूमी गमावली आहे. त्यांची लोकसंख्या प्रचंड वाढल्यामुळे अतिक्रमणातही वाढ झाली आहे. भारतीय जनता पक्षाला आसाममध्ये ‘मियां मुसलमानां’चे मत नको आहे. त्यामुळे मी त्यांच्याकडे मत मागण्यासाठी जात नाही आणि तेही माझ्याकडे येत नाहीत. तेव्हा ‘अतिक्रमण हटाव’ मोहीम चालूच रहाणार आहे, असे प्रतिपादन आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी केले.

‘इंडिया टुडे’च्या वतीने नुकतेच एक चर्चासत्र घेण्यात आले. या चर्चासत्रामध्ये मुख्यमंत्री सरमा सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी वरील वक्तव्य केले. आसामच्या ३३ जिल्ह्यांपैकी १५ जिल्ह्यांमध्ये बांगलादेशी घुसखोर वरचढ झाले आहेत. २६ वैष्णव मठांच्या ५ सहस्र ५४८ बिघा भूमीवर (अनुमाने २० सहस्र एकर भूमीवर) घुसखोरांनी नियंत्रण मिळवले आहे. तसेच राज्याच्या ४ लाख हेक्टर वनभूमीवर अतिक्रमण करण्यात आले आहे. हे क्षेत्रफळ राज्यातील एकूण वनभूमीपैकी तब्बल २२ टक्के आहे. या घुसखोरांनी गावची गावे वसवली असल्याचे एका सरकारी अहवालातून समोर आले आहे.