‘नथुराम गोडसे झिंदाबाद’ म्हणणार्‍यांची जाहीरपणे लाज काढली पाहिजे ! – खासदार वरुण गांधी, भाजप

‘देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्याने कुणी काहीही बोलू शकतो’, असे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी हे हिंदूंच्या देवतांचा अथवा श्रद्धास्थानांचा कुणी अवमान केला, तर लगेच म्हणतात, तर मग नथुराम गोडसे यांच्याविषयी कुणी काही बोलत असेल, तर त्या वेळी त्यांची भूमिका उलट का असते ?

खासदार वरुण गांधी

नवी देहली – मोहनदास गांधी यांच्या २ ऑक्टोबरला झालेल्या जयंतीच्या निमित्त सामाजिक माध्यमांतून ‘नथुराम गोडसे’ या नावाने ‘ट्रेंड’ (एखाद्या विषयावर घडवून आणली गेलेली चर्चा) करण्यात आला होता. त्यावर भाजपचे खासदार वरुण गांधी यांनी टीका केली आहे. ‘अशा दायित्वशून्य वर्तनाने देशाची लाज काढू नका. अशांची जाहीरपणे लाज काढली पाहिजे’, असे वरुण गांधी म्हणाले.

वरुण गांधी म्हणाले की, भारत नेहमीच आध्यात्मिक महासत्ता राहिला आहे. गांधी यांनीच आपल्या देशाच्या आध्यात्मिक पायामध्ये भर घातली आणि आपल्याला नैतिक अधिकार दिला, जी आजही आपली सर्वांत मोठी शक्ती आहे. (गांधींमुळे नाही, तर ऋषिमुनी, संत यांच्यामुळे भारत नेहमीच आध्यात्मिक गुरु राहिला आहे, हे गांधी यांनी लक्षात ठेवायला हवे. – संपादक) गांधी आणि त्यांच्या आदर्शांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला जो सन्मान मिळाला आहे, तो विसरता येणार नाही.