‘फायबर प्लास्टिकमिश्रीत’ तांदूळ पुरवणार्‍यांची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची हिंदु जनजागृती समितीची मागणी

कुडाळ (सातारा) येथील अंगणवाडीमधील ‘फायबर प्लास्टिकमिश्रीत’ तांदूळ प्रकरण

नायब तहसीलदार श्री. उभारे यांना निवेदन देतांना डावीकडून श्री. जितेंद्र वाडेकर, श्री. राजेंद्र सांभारे आणि श्री. हेमंत सोनवणे

सातारा, ३ ऑक्टोबर (वार्ता.) – सप्टेंबर मासाच्या शेवटच्या आठवड्यात जावळी तालुक्यातील कुडाळ येथील एका अंगणवाडीमध्ये ‘फायबर प्लास्टिकमिश्रीत’ तांदूळ खाल्ल्यामुळे एका मुलाला त्रास झाला, असे वृत्त प्रसिद्धीमाध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले. याविषयी तेथील पालक आणि सूज्ञ ग्रामस्थ यांनी ‘स्टिंग ऑपरेशन’ करत ‘एकात्मिक बाल विकास प्रकल्प योजने’च्या अंतर्गत अंगणवाडीतील मुले अन् गर्भवती माता यांना दिल्या जाणार्‍या निकृष्ट अन्नधान्य पुरवठ्यामधील काळाबाजार उघडकीस आणला होता. हा ‘फायबर प्लास्टिकमिश्रीत’ तांदूळ पुरवणार्‍यांची चौकशी करून संबंधित दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. याविषयीचे निवेदन सातारा जिल्हाधिकार्‍यांच्या नावे नायब तहसीलदार श्री. उभारे यांना देण्यात आले.

या वेळी विश्व हिंदु परिषदेचे सातारा शहरमंत्री जितेंद्र वाडेकर, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री राजेंद्र सांभारे, हेमंत सोनवणे आदी उपस्थित होते.

निवेदनामध्ये म्हटले आहे की,

१. कुडाळमधील इंदिरानगर येथील एका मुलाने तांदूळ आणि डाळ खाल्ल्यामुळे त्याला त्रास झाला होता. तांदळासह डाळ, मीठ आणि मिरची पूड आदी साहित्यही अत्यंत निकृष्ट प्रतीचे होते, असे ग्रामस्थांनी केलेल्या पहाणीत सिद्ध झाले होते. या प्रकरणी इंदिरानगर येथील महिलांनी भातातील काही तांदूळ शिजत नसल्याचे माजी सरपंच वीरेंद्र शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिले होते.

२. खरेतर कोणताही अन्नपदार्थ म्हटला की, त्याचा मानवाच्या आरोग्याशीच संबंध येतो. त्यामुळे अन्नपदार्थ हा पौष्टिक आणि सकस असायला हवा. त्यातूनही हे तांदूळ लहान मुलांना देण्यात येत असल्याने त्यांची पडताळणी तर अत्यावश्यकच आहे. त्यामुळे मुलांना फायबर प्लास्टिकमिश्रीत तांदूळ पुरवण्यात आला असेल, तर ही अत्यंत गंभीर गोष्ट असून लहान मुलांच्या जिवाशी खेळण्याचाच हा प्रकार आहे.

३. वास्तविक पोषण आहारात दिले जाणारे धान्य हे सुरक्षित, खाण्यायोग्य आहे ना ? त्यातील घटकांचे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होत नाहीत ना ? अमुक पदार्थ किती काळ टिकून राहू शकतो ? अशा विविध सूत्रांची निश्चिती करूनच तो पुरवठा करणे अपेक्षित आहे. या संपूर्ण प्रक्रियेत प्रशासनाची भूमिकाही तितकीच महत्त्वपूर्ण ठरते.

४. पोषण आहारातील तांदूळ जर आरोग्याच्या दृष्टीने योग्य नाहीत, तर ते मुलांपर्यंत कसे काय जातात ? प्रशासनाचे ठेकेदारावर काहीच नियंत्रण नाही का ? खाण्यायोग्य नसलेल्या तांदळामुळे जर कुणाच्या जिवावर बेतले, तर त्याचे दायित्व कोण घेणार ?

५. या प्रकरणी कुडाळ येथील ‘एकात्मिक बाल विकास प्रकल्प योजने’च्या अंतर्गत अंगणवाडीतील मुले आणि गर्भवती माता यांना पुरवल्या जाणार्‍या निकृष्ट अन्नधान्याची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदार, तसेच या प्रकरणातील दोषी यांवर कठोर कारवाई करण्यात यावी.