देवतेची मूर्ती पर्यावरणपूरक नसल्यास मूर्तीकारांची नोंदणी २ वर्षांसाठी रहित करणार ! – मुंबई महानगरपालिका

वर्ष २०२२ च्या उत्सव समन्वय बैठकीत महानगरपालिकेकडून चेतावणी

यासह कागदी लगद्याच्या प्रदूषणकारी मूर्ती, तसेच अन्य शास्त्रविसंगत मूर्ती बनवण्यावरही प्रशासनाने बंदी घातली पाहिजे ! – संपादक 

मुंबई – गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आदी साजरे करतांना मूर्ती केवळ नैसर्गिक, जैविकदृष्ट्या विघटनशील आणि पर्यावरणपूरक साहित्य यांपासून सिद्ध केलेल्या असाव्यात. मूर्ती पर्यावरणपूरक नसल्यास मूर्तीकारांची नोंदणी २ वर्षांसाठी रहित केली जाणार आहे, तसेच त्यांची अनामत रक्कमही जप्त केली जाणार आहे, अशी चेतावणी मुंबई महानगरपालिकेने मूर्तीकारांना दिली. वर्ष २०२२ चा गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव आदर्श अन् पर्यावरणपूरक साजरा व्हावा, यांसाठी १ ऑक्टोबर या दिवशी मुंबई महानगरपालिकेकडून एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून आलेल्या वरील मार्गदर्शक सूचनांविषयी सर्वांना अवगत करण्यात आले.

उपआयुक्त हर्षद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई पोलीस दल, ‘नीरी’ संस्था, बृहन्मुंबई सार्वजनिक गणशोत्सव समन्वय समिती, मुंबई उपनगरे श्री गणेशोत्सव समन्वय समिती, अखिल सार्वजनिक गणेशोत्सव महासंघ, बृहन्मुंबई मूर्तीकार संघ आदींचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत ‘केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून आलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सजावट पाना-फुलांची असावी, एकदाच वापरायच्या प्लास्टिकचा वापर करण्यावर पूर्णपणे बंदी असेल, मूर्ती रंगवणे आणि सजावट करणे यांसाठी वापरण्यात येणारे रंग हे पर्यावरणपूरक असावेत’, आदी माहिती देण्यात आली.

पर्यावरणपूरक मूर्ती सिद्ध करण्यासाठी लागणारी अधिक जागा आणि अधिक कालावधी यांचा विचार करून महानगरपालिकेने मंडपांना अनुमती द्यावी ! – मूर्तीकार संघटनांची विनंती

या वेळी मूर्तीकार संघटनेच्या सदस्यांनी महानगरपालिकेकडे विनंती केली की, न्यायालय आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्ती सिद्ध करण्यावर बंदी घातली आहे. पर्यावरणपूरक असलेल्या शाडूमातीच्या मूर्ती सिद्ध करण्यास अधिक कालावधी लागतो आणि जागाही अधिक लागते. त्यामुळे यापुढे महानगरपालिकेने या गोष्टींचा विचार करून मंडपांना अनुमती द्यावी.