एकट्या हरिद्वार येथे ३ दशकांमध्ये २९ संतांच्या हत्या, तर ३ संत बेपत्ता !

अद्यापही या घटनांमागील गूढ कायम !

  • हिंदूबहुल देशात हिंदु संतांच्या इतक्या मोठ्या प्रमाणावर हत्या होऊनही त्यांच्या मारेकर्‍यांना पकडू न शकणे, तसेच बेपत्ता झालेल्या संतांना शोधू न शकणे, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद ! – संपादक 
  • संत, शिष्य, साधक यांचे रक्षण करण्याचे दायित्व राजाचे असते. ‘हिंदु राष्ट्र’च असे धर्मपरायण शासनकर्ते देऊ शकेल. त्यामुळे हिंदु राष्ट्राची स्थापना करा ! – संपादक 
  • ज्या साधू-संतांच्या अस्तित्वामुळे मनुष्य जीवनाचा उत्कर्ष होतो, त्यांच्या हत्या झाल्यावर त्याचे अन्वेषण करण्यात अशी कुचराई होणे, यातून शासनकर्त्यांच्या लेखी संतांना महत्त्व नसल्याचेच स्पष्ट होते. ही स्थिती हिंदूंसाठी लज्जास्पद ! – संपादक 

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर साधू-संतांच्या हत्यांचा विषय चर्चेत आला आहे. एकट्या हरिद्वार येथे मागील ३ दशकांमध्ये २९ संतांचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला आहे, तर ३ संत बेपत्ता झाले आहेत. अजूनही या प्रकरणाविषयी काहीही स्पष्ट न झाल्यामुळे गूढ कायम आहे. ‘आज तक’ या वृत्तवाहिनीने हे वृत्त प्रसारित केले आहे.

हरिद्वारमध्ये असलेले मठ, मंदिरे, आश्रम आणि आखाडे यांच्याकडे अमाप संपत्ती असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे आखाड्यांची गादी आणि संपत्ती यांच्या संदर्भात अनेक वाद असून त्यांचे खटले न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत. असे असले, तरी अनेक संतांच्या हत्या आणि त्यांचे बेपत्ता होणे या प्रकरणांची उकल होऊ शकलेली नाही.

संत समाजाच्या प्रतिक्रिया !

चेतन ज्योती आश्रमाचे पीठाधीश्वर महंत ऋषीश्वरानंद महाराज म्हणाले की, वारंवार होणार्‍या संतांच्या हत्या संतापजनक आहे. महंत नरेंद्र गिरी यांचा मृत्यू, तसेच ३ दशकांमध्ये हरिद्वारमध्ये संशयास्पदरित्या मृत्यू झालेले आणि बेपत्ता झालेले संत यांच्याविषयी देखील खुलासा होणे आवश्यक आहे. समाजाला मार्ग दाखवणार्‍या आध्यात्मिक तपोमूर्तींना एकत्र येऊन आत्मचिंतन केले पाहिजे. या प्रकरणी हरिद्वार पोलिसांची आकडेवारी हादरवणारी आहे.

हरिद्वार येथील अधिवक्ता राजेश रस्तोगी यांनी म्हटले की, वर्ष २००७ मध्ये योगऋषी रामदेव बाबा यांचे गुरु स्वामी शंकर देव बेपत्ता झाले होते. त्या प्रकरणाचे केंद्रीय अन्वेषण विभागाने अन्वेषण केले; परंतु आजपर्यंत त्यांचे काय झाले, हे समजले नाही.

हरिद्वार येथे संतांच्या हत्या आणि बेपत्ता होण्यासंदर्भातील घटना !

  • २५ ऑक्टोबर १९९१ : रामायण सत्संग भवनचे संत राघवाचार्य यांची दुचाकीस्वारांनी गोळी झाडून हत्या केली.
  • ९ डिसेंबर १९९३ : रामायण सत्संग भवनचे संत रंगाचार्य यांची ज्वालापूर येथे हत्या झाली.
  • १ फेब्रुवारी २००० : मोक्षधाम न्यासाशी संबंधित रमेश यांना जीपने धडक मारली. यात त्यांचा मृत्यू झाला.
  • डिसेंबर २००० : ‘चेतनदास कुटिया’मध्ये अमेरिकी साध्वी प्रेमानंद यांची हत्या झाली.
  • ५ एप्रिल २००१ : बाबा सुतेंद्र बंगाली यांची हत्या करण्यात आली.
  • ६ जून २००१ : ‘हर की पौडी’च्या जवळ बाबा विष्णुगिरी यांच्यासमवेत ४ साधूंची हत्या करण्यात आली.
  • २६ जून २००१ : बाबा ब्रह्मानंद यांची हत्या झाली.
  • वर्ष २००१ : ‘पानप देव कुटिया’चे बाबा ब्रह्मादास यांची दिवसाढवळ्या गोळी झाडून हत्या करण्यात आली.
  • १७ ऑगस्ट २००२ : बाबा हरियानंद आणि त्यांचे शिष्य यांची हत्या करण्यात आली.
  • वर्ष २००२ : संत नरेंद्र दास यांची हत्या करण्यात आली.
  • ६ ऑगस्ट २००३ : संगमपुरी आश्रमाचे प्रसिद्ध संत प्रेमानंद अचानक बेपत्ता झाले. त्यांचे अजूनही काही समजले नाही.
  • २८ डिसेंबर २००४ : संत योगानंद यांची हत्या करण्यात आली.
  • १५ मे २००६ : पिली कोठीचे स्वामी अमृतानंद यांची हत्या करण्यात आली.
  • २५ नोव्हेंबर २००६ : बाल स्वामी यांची हत्या करण्यात आली.
  • जुलै २००७ : योगऋषी रामदेव बाबा यांचे गुरु स्वामी शंकर देव बेपत्ता झाले.
  • ८ फेब्रुवारी २००८ : निरंजन आखाड्याच्या ७ साधूंना विष देऊन मारण्यात आले.
  • १४ एप्रिल २०१२ : निर्वाणी आखाड्याचे महंत सुधीर गिरी यांची रुडकीजवळ गोळी झाडून हत्या करण्यात आली.
  • २६ जून २०१२ : लक्सर येथे हनुमान मंदिरामध्ये ३ संतांची हत्या करण्यात आली.
  • सप्टेंबर २०१७ : बडा आखाडा उदासिनचे महंत आणि अखिल भारतीय आखाडा परिषदेचे प्रवक्ता महंत मोहनदास संशयास्पद स्थितीत बेपत्ता झाले. पुढे त्यांचे काय झाले, ते अजूनही समजले नाही.