हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात ‘ऑनलाईन’ तक्रार प्रविष्ट !

नगरपालिकेने निर्माल्य गोळा करण्यासाठी कचर्‍याच्या वाहनाचा वापर केल्याचे प्रकरण

  • अन्य धर्मियांच्या सणांच्या वेळी असे निर्णय घेण्याचे धाडस प्रशासन कधी दाखवते का ? – संपादक
  • हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या प्रशासनाविरुद्ध हिंदुत्वनिष्ठांनी वैध मार्गाने लढा द्यायला हवा ! – संपादक

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – अनंत चतुर्दशी म्हणजेच १९ सप्टेंबर या दिवशी पंढरपूर नगरपालिकेने कचरा वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणार्‍या वाहनातून श्री गणेशमूर्तीला अर्पण केलेल्या निर्माल्याची वाहतूक केली होती. कचरा गाडी ही कचर्‍याची वाहतूक करण्यासाठी असते. त्यामध्ये टाकाऊ, तसेच कुजलेले आणि नासलेले पदार्थ टाकले जातात. देवाला वाहिलेले निर्माल्य हे देवतेप्रमाणेच पवित्र असते. त्यामुळे नगरपालिकेने कचर्‍याच्या वाहनामध्ये पवित्र निर्माल्य गोळा करून हिंदु धर्म, परंपरा आणि देवता यांचा अपमान केला आहे. पंढरपूर नगरपालिकेचे वाहनचालक, नगर परिषदेचे कर्मचारी आणि मुख्याधिकारी यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी ‘ऑनलाईन’ तक्रार हिंदु जनजागृती समितीचे श्री. शशिशेखर पाटील यांनी शहर पोलीस ठाण्यात प्रविष्ट केली आहे.

तक्रारीमध्ये म्हटले आहे की, घरातील केराची सुपली कितीही स्वच्छ केली, तरी आपण त्यात अन्न ग्रहण करत नाही. ती केवळ कचरा भरण्यासाठीच वापरली जाते. देवतेच्या मूर्तीला अर्पण केलेला हार, दुर्वा आणि अन्य वस्तू या देवतेसमान पवित्र झालेल्या असतात, अशी हिंदूंची श्रद्धा आहे. त्यामुळे निर्माल्य कधीही कचरा होऊ शकत नाही. (गणेशभक्तांनी भक्तीभावाने पूजा करून देवतेला वाहिलेल्या निर्माल्याची कचर्‍याच्या वाहनातून वाहतूक करणे, हे धर्मविसंगत कृत्य आहे. त्यामुळे ‘याचा सर्वच स्तरांवर निषेध व्हायला हवा’, असे सर्वसामान्यांना वाटते ! – संपादक)