धर्मांधता आणि कट्टरतावाद रोखण्यासाठी पावले उचलायला हवीत ! – पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी देहली – आशिया खंडात शांतता आणि सुरक्षितता राखणे, हे सर्वांत मोठे आव्हान आहे. अफगाणिस्तानमध्ये नुकत्याच घडलेल्या घडामोडींमुळे हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शांघाय सहयोग संघटनेच्या (शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या) शिखर परिषदेने धर्मांधता आणि कट्टरतावाद रोखण्यासाठी पावले उचलायला हवीत, इस्लामशी संबंधित सर्व संस्थांशी संपर्क साधून पुढे काम करायला हवे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (एस्.सी.ओ.) देशांच्या बैठकीला संबोधित करत होते. ही बैठक ताजिकिस्तानमधील दुशांबे येथे आयोजित करण्यात आली आहे. या संघटनेमध्ये चीन, कझाकिस्तान, किर्गिस्तान, रशिया, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान या देशांचा समावेश आहे. आर्थिक, राजनैतिक आणि सामरिक क्षेत्रात देवाणघेवाण निर्माण होण्यासाठी या संघटनेच्या माध्यमातून कार्य केले जाते. पंतप्रधान मोदी यांनी ताजिकिस्तानला त्यांच्या स्वातंत्र्याला ३० वर्षे पूर्ण झाल्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच इराण, सौदी अरेबिया, इजिप्त आणि कतार यांचा एस्.सी.ओ.मध्ये समावेश झाल्यासाठी त्यांचे स्वागतही केले. ‘नव्या सदस्यांमुळे आपला गट आणखी भक्कम झाला आहे’, असेही मोदी  या वेळी म्हणाले.