सदसद्विवेकबुद्धीचा उपयोग व्हावा !

सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील मनोहर उपाख्य मामा भोसले नावाचे सद्गृहस्थ गत ५-७ वर्षांपासून कर्करोगाच्या रुग्णांवर उपचार करत आहेत. मामा भोसले यांच्या उपचारामुळे अनेक रुग्णांना कर्करोगापासून मुक्ती मिळाली असल्याचे त्यांचे अनुयायी सांगतात. वैद्यकीय क्षेत्रातील कोणत्याही ज्ञानाविना कर्करोगासारख्या दुर्धर आजारावर नियंत्रण मिळवून तो नष्ट करणे केवळ अध्यात्मातील अधिकारी व्यक्तीच करू शकतात; पण ‘गाढवाला गुळाची चव ती काय ?’, यानुसार आज कुणीही उठतो आणि साधू-संतांवर कोरडे ओढण्यास प्रारंभ करतो. अंधश्रद्धा निर्मूलनवाले वा तथाकथित पुरो(अधो)गामी यांनी मनोहर उपाख्य मामा भोसले यांच्या कार्यपद्धतीवर शंका उपस्थित करून त्यांच्यावर कारवाई करण्याची पोलिसांकडे मागणी केली. त्यानुसार पोलिसांनी मनोहर भोसले यांना १० सप्टेंबर या दिवशी अटक केली. डोळ्यांना झापडे लावून ‘मी म्हणतो तेच खरे…’, असे म्हणणार्‍या अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांविषयी जाणवलेली काही सूत्रे इथे मांडत आहे.

१. अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांनी साधना करून अध्यात्माची अनुभूती घ्यावी !

अध्यात्म हे अनुभूतीचे शास्त्र असून त्यासाठी कृती महत्त्वाची आहे. अध्यात्मामध्ये ऐकण्याला २ टक्के, तर कृतीला ९८ टक्के महत्त्व आहे. मनुष्याला दैनंदिन जीवन जगत असतांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते. या समस्यांना तोंड देण्यासाठी केवळ तात्त्विक ज्ञान नव्हे, तर प्रत्यक्ष केलेली ‘साधना’ मनुष्याला धैर्य, स्थिरता, शांती प्रदान करते. यामुळे समस्यांवर मात करून मनुष्य सुखी अन् आनंदी जीवन जगू शकतो. आजपावेतो असंख्य साधू-संतांनी नि:स्वार्थपणे कोट्यवधी भक्तांचे अंधश्रद्धा निर्मूलन केले आहे. अध्यात्मशास्त्रानुसार शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक या ३ स्तरांमध्ये त्रासांची विभागणी होते. त्रासाचे योग्य निदान झाल्यास अध्यात्मातील अधिकारी व्यक्ती मनुष्याचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास दूर करू शकतात; मात्र मनुष्याने साधना करणे आवश्यक आहे. असे असतांना अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांनी साधना करणे तर दूरच; परंतु त्यांना ती जाणून घेण्याचीही आवश्यकता वाटत नाही. विज्ञान हे जसे शास्त्र आहे, तद्वतच अध्यात्म हेही शास्त्र आहे. यासाठी अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांनी सदसद्विवेकबुद्धीचा उपयोग करून अध्यात्माचा अभ्यास केला पाहिजे.

श्री. राहुल कोल्हापुरे

२. अध्यात्मातील अधिकारी व्यक्तींना भोंदू म्हणून हिणवणे कितपत योग्य ?

अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांनी आयते कोलीत मिळाल्यासारखे मनोहर उपाख्य मामा भोसले यांचा विषय उचलून धरला आहे. अध्यात्माचा कोणताही गंध नसणार्‍यांना संपूर्ण जगच भोंदू वाटते. वर्षानुवर्षे एखादी व्यक्ती समाजाला फसवू शकत नाही; मात्र अध्यात्माचा कोणताही अभ्यास न करता हिंदु धर्माची, साधूसंतांची केवळ मानहानी करण्याचा विडा उचलणार्‍या अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांना हे कसे कळणार ?

३. अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांची चिकित्सा होणे आवश्यक !

सध्या काही पुरो(अधो)गामी आणि नास्तिकतावादी संघटना अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली स्वत:ची दुकानदारी हिंदु धर्माची चिकित्सा करण्याच्या नावाखाली चालवत आहेत. देश-विदेशांतून खासगी आणि सरकारी साहाय्य मिळवून कोट्यवधी रुपयांची माया गोळा करत आहेत. अशा संघटनांची कुणी ‘आर्थिक’ चिकित्सा केल्यास त्यांना ‘समाजद्रोही’ असल्याचे लेबल लावले जाते. समाजात त्यांच्याविषयी विष पेरून त्यांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले जाते. मनोहर भोसले यांच्याविषयी आर्थिक अपलाभाचे विष पेरून त्यांनाही अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांनी स्वत:च न्यायाधीश बनून दोषी ठरवले आहे.

४. जादुटोणाविरोधी कायद्याचा वापर करून हिंदु धर्म संपवण्याचे षड्यंत्र जाणा !

‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत अन् त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम, २०१३’ हा कायदा स्वत:ची मक्तेदारी असल्याप्रमाणे त्याचा वापर करणारे पुरोगामी  हे इतर अल्पसंख्यांकांच्या अघोरी रुढी, प्रथा आणि परंपरा यांविषयी कधी तोंडातून ‘ब्र’ काढत नाहीत; कारण त्यांच्याविषयी आपण बोललो, तर आपल्याला मोठ्या प्रमाणात विरोध होईल, हे त्यांना ठाऊक असते. आजही बकरी ईदच्या निमित्ताने कोट्यवधी बकर्‍यांची हत्या केली जाते. प्रत्येक रविवारी मंतरलेले पाणी पाजून चर्चमध्ये व्याधी दूर करण्याचा बहाणा केला जातो; मात्र याकडे नास्तिकतावादी संघटना हेतूपुरस्सर दुर्लक्ष करतात. खरेतर जादुटोणा कायद्याद्वारे केवळ हिंदु धर्मियांना छळून हिंदु धर्म संपवण्याचे षड्यंत्र रचले जात आहे, हे आतापर्यंतच्या घटनांमधून दिसून येते.

हिंदु धर्म संपवण्यासाठी उपयोगात आणली जाणारी सदसद्विवेकबुद्धी जर हिंदु धर्मशास्त्र जाणून घेण्यात उपयोगात आणली, तर निश्चितच समाजातील अंधविश्वास निर्मूलन केल्याचे पुण्य त्यांना लागेल, हे निश्चित !

– श्री. राहुल देवीदास कोल्हापुरे, सातारा