श्री गणेशचतुर्थीचे महत्त्व आणि त्या दिवशी चंद्रदर्शन निषिद्ध असण्याचे कारण

हिंदु धर्मातील विविध देवता म्हणजे विविध तत्त्वे आहेत. त्यांच्या लहरी हे त्यांचे एक स्वरूप आहे. हिंदु धर्मामध्ये विशिष्ट तिथी आणि विशिष्ट देवतेची उपासना यांचीही सांगड घालण्यात आली आहे. या दृष्टीकोनातून श्री गणेश आणि चतुर्थी तिथी यांचा संबंध समजून घेऊया.

गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, म्हणजेच ज्या दिवशी गणेशजन्म झाला, तो दिवस होता माघ शुक्ल पक्ष चतुर्थी. तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध स्थापित झाला. अन्य दिवसांच्या तुलनेत चतुर्थीच्या दिवशी पृथ्वीवर गणेशाची स्पंदने अधिक प्रमाणात कार्यरत असतात. प्रत्येक मासाच्या चतुर्थीला ही स्पंदने अन्य दिवसांच्या तुलनेत १०० पट अधिक कार्यरत असतात. त्यामुळे या दिवशी वातावरणाची सात्त्विकता वाढते, तसेच या दिवशी रज-तम कणांचे विघटन होते. त्यामुळे या दिवशी श्री गणेशाची उपासना केल्याने भक्ताला अधिक लाभ होतो. या पार्श्‍वभूमीवर श्री गणेशचतुर्थीचे महत्त्व समजून घेऊया.

आषाढ पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा हा कालखंड ‘चातुर्मास’ म्हणून ओळखला जातो. या काळात विनाशकारक, तमप्रधान यमलहरी पृथ्वीवर अधिक प्रमाणात येतात. या काळात त्यांची तीव्रताही अधिक असते. नेमक्या याच कालखंडातील भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत, गणेशलहरी पृथ्वीवर अधिक प्रमाणात येत असतात. त्यामुळे चातुर्मासात अधिक प्रमाणात पृथ्वीवर येणार्‍या यमलहरींची तीव्रता न्यून व्हायला साहाय्य होते. श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी, तसेच गणेशोत्सवाच्या दिवसांत गणेशतत्त्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर १ सहस्र पटींनी कार्यरत असते. या काळात केलेल्या श्री गणेशाच्या उपासनेने गणेशतत्त्वाचा अधिक लाभ होतो. यासाठी या काळात श्री गणेशाची उपासना केली जाते.

श्री गणेशचतुर्थीला चंद्रदर्शन निषिद्ध का असते ?

‘मूषकावर आरूढ असलेल्या श्री गणेशाच्या रूपाला पाहून चंद्र हसला. म्हणून श्री गणेशाने त्याला शाप दिला की, श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी तुला कोणी पहाणार नाही’, अशी कथा पुराणात सांगितलेली आहे. त्यामुळे ‘श्री गणेशचतुर्थीला चंद्रदर्शन करू नये’, असे सांगितले जाते. अनेकांना याविषयी प्रश्‍न पडतो की, ‘असे का ?’ अध्यात्मशास्त्रदृष्ट्या त्याचे कारण म्हणजे चंद्र हा मनाचा कारक आहे, म्हणजे मनाला कार्य करण्यास प्रवृत्त करणारा आहे. श्रीगणेश हा ॐकारस्वरूप आहे. ‘ॐ’ हा ध्वनी ब्रह्मवाचक आहे. म्हणजेच गणेश-उपासना ही ब्रह्मोपासनाच ठरते. त्यासाठी मन नाश पावणे, म्हणजे मनाचा लय होणे आवश्यक असते. गणेशभक्ताला किंवा साधकाला तर मनोलयच करायचा असतो. सोप्या भाषेत ‘मनोलय करणे’, म्हणजे मनाची चंचलता घालविणे. चंद्राचा आकार तिथीनुसार लहान-मोठा होतो. त्यामुळे ग्रहमालेत जसा चंद्र चंचल आहे, तसे शरिरात मन चंचल आहे. चंद्रदर्शनाने मनाची चंचलता एक लक्षांश इतकी वाढते. यासाठी श्री गणेशचतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन करू नये.

संकष्टी चतुर्थीला चंद्रदर्शन का करावे ?

प्रत्येक मासात येणारी शुक्ल किंवा कृष्ण पक्ष चतुर्थी म्हणजे संकष्टी. या दिवशी संकष्टीचे व्रत करतात. हे श्री गणेशाचे व्रत आहे. गणेशभक्त या दिवशी दिवसभर उपवास, श्री गणेशाची पूजा-अर्चना, त्याचा नामजप आदी यथाशक्ती करतात. त्यामुळे त्यांचे मन दिवसभर साधनारत रहाते. संकष्टीला दिवसभर साधना करून रात्री चंद्राचे दर्शन घेतात. त्यामुळे ते एकप्रकारे साधनाकाळ संपल्याचे आणि मनोव्यापार नेहमीप्रमाणे चालू करण्याचे निदर्शक आहे.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘श्री गणपति’ आणि सनातन-निर्मित ‘श्री गणेशचतुर्थी आणि श्री गणेश उपासना’ हा दृकश्राव्य लघुपट)