हिंदुत्व आणि विरोध !

संपादकीय

हिंदुत्वाला विद्वेषापासून रोखण्यासाठी हिंदूंनी राष्ट्र आणि धर्म रक्षक व्हायला हवे !

काही संकल्पना कालौघातात नष्ट होतात, काही शतकानुशतके चर्चिल्या जातात, तर काही संकल्पनांना अनंत काळापर्यंत विरोधच होत रहातो. ‘हिंदुत्वा’च्या संदर्भातही असेच होते. दुर्दैवाने ‘हिंदुत्व’ या संकल्पनेला नेहमीच विरोधाच्या परीक्षेत उतरावे लागते. छत्तीसगडमधील सरकारी शाळेत एका साम्यवादी शिक्षकाने विद्यार्थ्यांना विचारले, ‘‘श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त तुमच्यापैकी किती जणांचा उपवास आहे ?’’ यावर काही हिंदु विद्यार्थ्यांनी हात वर केले. ज्यांनी हात वर केले, त्या विद्यार्थ्यांना शिक्षकाने पुष्कळ मारहाण केली, तसेच सर्व विद्यार्थ्यांसमोर हिंदु देवतांच्या संदर्भात द्वेषपूर्वक विधानेही केली. ही घटना ऐकताच कोणत्याही हिंदूच्या तळपायाची आग मस्तकातच जाईल, इतकी ही संतापजनक घटना आहे ! स्थानिक तहसीलदारांनी त्या शिक्षकाला निलंबित केले, हे चांगले झाले.

दुसर्‍या एका घटनेत ब्रिस्बेन (ऑस्ट्रेलिया) येथे १२ वर्षीय हिंदु भारतीय विद्यार्थ्याने गळ्यात तुळशीची माळ घातली असल्याने त्याला फूटबॉल सामन्यात खेळण्यापासून रोखण्यात आले. या दोन्ही घटना म्हणजे हिंदु आणि हिंदुत्व यांवर शिंतोडे उडवण्याचा किंवा हिंदुत्वाचा आवाज दाबण्याचा केलेला प्रयत्नच आहे. केवळ भारतातच नव्हे, तर ऑस्ट्रेलियातही हिंदूंना हिंदुद्वेषाला तोंड द्यावे लागते. ही स्थिती म्हणजे हिंदुत्वाच्या विरोधी रचलेले षड्यंत्रच आहे.

हिंदूंनी व्रत, वैकल्ये, उपवास, धार्मिक विधी करायचे नाहीत. तसे केले, तर त्यांना विरोध आणि निषेध यांच्या पिंजर्‍यातच उभे केले जाते. दुसरीकडे मात्र अन्य धर्मियांना त्यांच्या धार्मिक विधींचे पालन करता यावे, यासाठी पूरक वातावरण उपलब्ध करून दिले जाते. कोरोनाच्या संसर्गामुळे सर्वत्र प्रतिबंधात्मक नियम लागू असल्याने हिंदूंच्या सण-उत्सवांवर मर्यादा आल्या; पण त्याच वेळी अन्य धर्मियांच्या धार्मिक स्थळांमध्ये त्यांचे धार्मिक विधी पार पडावेत, यासाठी पोलिसांचा मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात केलेला आढळला. हे चित्र अनेक मोठ्या शहरांमध्ये दिसून आले. ही दुटप्पीपणाची परिसीमाच होय. ‘हिंदु’ म्हटले की, अनेकांच्या भुवया उंचावतात, कपाळाला आठ्या पडतात. त्यातूनच

पुढे हिंदु धर्माविरुद्धचा सर्वतोपरी संघर्ष चालू होतो. हिंदु धर्माला विकृत करून समाजामध्ये त्याविषयीच्या नकारात्मकतेची विषवल्लीच पेरली जाते आणि कालांतराने ती वाढून हिंदुद्वेष प्रक्षोभक ठरू लागतो. इतकी वर्षे मोगल आणि ब्रिटीश सत्ताधिशांनी राज्यकारभार करतांना हिंदुविरोधी भूमिका घेत हिंदु धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न केला खरा; पण हिंदु धर्म नष्ट होऊ शकला नाही. हिंदुत्व प्रत्येक वेळी विरोधाच्या तडाख्यातून तावून सुलाखूनच बाहेर पडले. त्यामुळे हिंदूंनी कर्तव्यपालन म्हणून हिंदुत्वाला न्याय, मान-सन्मान मिळवून देण्यासाठी सिद्ध व्हायला हवे. खरेतर हिंदुत्वाचा अभिमान बाळगणे, ही काळाची आवश्यकताच आहे. हिंदुत्वाला वारंवार विद्वेषाच्या दरीत लोटले जाऊ नये, यासाठी आता हिंदूंनीच राष्ट्र आणि धर्म रक्षक व्हायला हवे !