अवैध फेरीवाल्यांचे ठाणे महानगरपालिकेच्या महिला साहाय्यक आयुक्तांवर आक्रमण !

आयुक्तांच्या डाव्या हाताची दोन बोटे, तर अंगरक्षकाचे एक बोट कापले

  • अवैध फेरीवाल्यांना कायदा आणि सुव्यवस्था, तसेच पोलीस, प्रशासन यांचा धाकच राहिलेला नाही, हेच यावरून लक्षात येते ! – संपादक
  • साहाय्यक आयुक्तपदाच्या महिला अधिकार्‍यावर हिंसक आक्रमण होणे, हे राज्यात अराजक वाढत असल्याचेच द्योतक ! – संपादक
महानगरपालिकेच्या माजीवाडा-मानपाडा प्रभाग समितीच्या साहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे

ठाणे – येथील महानगरपालिकेच्या माजीवाडा-मानपाडा प्रभाग समितीच्या साहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर ३० ऑगस्ट या दिवशी अवैध फेरीवाल्यांनी जीवघेणे आक्रमण केले. यात त्यांच्या डाव्या हाताची दोन बोटे कापली गेली. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करणार्‍या अंगरक्षकाचेही बोट कापले गेले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी अमरजीत यादव याला अटक केली आहे. स्थानिक लोकांच्या साहाय्याने पोलिसांनी ही कारवाई केली.

३० ऑगस्ट या दिवशी सायंकाळी साहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे त्यांच्या सहकार्‍यांसमवेत संबंधित भागाचा दौरा करत होत्या. त्याच वेळी काही अवैध फेरीवाले त्यांना रस्त्याच्या कडेला दिसले. साहाय्यक आयुक्तांनी त्यांना दुकाने काढण्यास सांगितले. यामुळे फेरीवाले आणि साहाय्यक आयुक्त यांच्यात वाद झाला. त्याच वेळी आरोपी अमरजीत यादव चाकू घेऊन घटनास्थळी पोचला आणि काहीही न बोलता त्याने पिंपळे यांच्यावर आक्रमण केले. अचानक झालेल्या आक्रमणामुळे सर्वच जण घाबरले. स्थानिकांनी कल्पिता पिंपळे आणि त्यांचे अंगरक्षक यांना रुग्णालयात भरती केले. सध्या त्यांच्यावर उपचार चालू आहेत.

आरोपी कारागृहातून सुटल्यावर आमच्याकडून मार खाईल ! – राज ठाकरे

राज ठाकरे

मुंबई – महाराष्ट्रातील एका शासकीय अधिकार्‍याची बोटे छाटण्याचे धारिष्ट्य कसे होते ? फेरीवाल्यांचे हे धारिष्ट्य ठेचलेच पाहिजे. ज्यांनी हे केले, त्यांची सगळी बोटे छाटली जातील. त्यांना ‘फेरीवाला’ म्हणून फिरता येणार नाही. आंदोलने आणि निषेध करून हे लोक सुधारणार नाहीत. यांची मस्ती उतरवली पाहिजे. तो (आरोपी) कारागृहातून ज्या दिवशी सुटेल, त्या दिवशी आमच्याकडून मार खाईल, अशी चेतावणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाणे येथे महिला शासकीय अधिकार्‍याची बोटे छाटणार्‍या गुंडाला दिली.

या वेळी ठाकरे म्हणाले, ‘‘आज आरोपींना पकडले गेले, उद्या जामीन दिला जाईल. सरकार कशासाठी आहे ? सरकारने यावर बंधने आणली पाहिजेत. हे केवळ मुंबईत होत नाही. आरोपी सुखरूपपणे जामिनावर सुटणार. ‘भीती काय आहे ?’ हे आरोपी कारागृहातून बाहेर आल्यावर कळेल.’’