आमदार प्रवीण पोटे यांचा राणा दांपत्यावर आरोप
अमरावती – ‘भाजप देशातील सर्वांत मोठा राजकीय पक्ष आहे. भाजपला कुणा खासदार किंवा आमदार यांची आवश्यकता नाही. असे असले, तरी काही लोक पक्षात घुसण्याचा प्रयत्न करतात. आमच्या नेत्यांच्या पाया पडून, त्यांच्या समवेत छायाचित्र काढून त्याद्वारे इतरांना ‘ब्लॅकमेल’ करतात’, अशी टीका जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि विधान परिषदेचे सदस्य प्रवीण पोटे यांनी अपक्ष आमदार रवि राणा आणि खासदार नवनीत राणा या दांपत्याचे नाव न घेता केली आहे. युवा स्वाभिमान पक्षाने केलेल्या या कृत्याच्या निषेधार्थ १८ ऑगस्ट या दिवशी येथील जयस्तंभ चौक येथे भाजपच्या वतीने ‘ठिय्या आंदोलन’ करण्यात आले. या वेळी पोटे बोलत होते.
महापालिकेत कुशल आणि अकुशल कामगार भरतीविषयी नियुक्त केलेल्या ‘एजन्सी’च्या विषयावरून आमदार रवि राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेची आमसभा चालू असतांना सभागृहात अनधिकृत प्रवेश करून गोंधळ घातला होता. या प्रकरणात महापालिकेतील सर्वपक्षीय नेत्यांनी निषेध नोंदवला, तसेच महापौर चेतन गावंडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस आयुक्तांकडे तक्रार दिली होती. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस २ दिवसांपूर्वी कौटुंबिक कार्यक्रमानिमित्त येथे आले होते. त्या वेळी आमदार रवि राणा यांनी फडणवीस यांचा ताफा राजापेठ चौक येथे अडवून त्यांच्या समवेत बळजोरीने छायाचित्र काढले. हे छायाचित्र सर्वत्र प्रसारित करून ‘देवेंद्र फडणवीस आमच्या समवेत ‘अंडरपास’च्या उद्घाटनाला आले होते’, अशी खोटी माहिती पसरवण्याचा उद्योग राणा करत आहेत, असा आरोप भाजपच्या पदाधिकार्यांनी या वेळी केला.