पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलेल्या आदेशानंतर पुणे येथील ‘मोदी मंदिरा’तील पंतप्रधान मोदींचा पुतळा हटवला !

हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने ते भावनेच्या आहारी जाऊन अशा प्रकारच्या कृती करतात. ही स्थिती पालटण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देणे किती आवश्यक आहे, हे अधोरेखित करणारी घटना ! – संपादक 

मोदी मंदिर

पुणे, १९ ऑगस्ट – भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि नमो प्रतिष्ठानचे अध्यक्ष मयूर मुंडे यांनी येथील औंध भागातील परिहार चौकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देवाचा दर्जा देत ‘मोदी मंदिरा’ची उभारणी केली होती. या मंदिरात पंतप्रधान मोदी यांचा अर्धपुतळा बसवण्यात आला होता. या मंदिराजवळ पंतप्रधान मोदींसाठी लिहिलेल्या विशेष आरतीचा फलकही लावण्यात आला होता. राममंदिर उभारणीची प्रेरणा घेत ‘मोदी मंदिरा’ची उभारणी करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला होता; मात्र या मंदिराच्या उभारणीशी शहर भाजपचा कोणत्याही प्रकारचा संबंध नसल्याचे शहराध्यक्ष योगेश मुळीक यांनी स्पष्ट केले होते. पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलेल्या आदेशानंतर हा पुतळा हटवण्यात आला आहे.

मयूर मुंडे यांनी पंतप्रधान मोदी यांच्या कार्यावर रचलेली कविता दर्शनी भागात, तर शेजारील फलकावर त्यांच्या कार्याची माहिती दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हे मंदिर पहाण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. अनेकजण येथे येऊन मोदींच्या पुतळ्याला पाया पडत होते. पिंपरी-चिंचवड येथील व्यावसायिक दिवांशू तिवारी यांच्या वतीने जयपूर येथून पंतप्रधान मोदी यांचा अर्धपुतळा सिद्ध करून आणण्यात आला होता. यासाठी मुंडे यांनी १ लाख ६० सहस्र रुपयांचा व्यय केला होता. मंदिराची उभारणी खासगी जागेत करण्यात आल्याचा दावा मुंडे यांनी केला होता.