पसार आरोपी देवानंद रोचकरींना मुंबईतील मंत्रालय भागातून अखेर अटक !

तीर्थक्षेत्र तुळजापूर (जिल्हा धाराशिव) येथील मंकावती तीर्थकुंड येथे अवैधरित्या बांधकाम केल्याचे प्रकरण

धाराशिव – महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेचे तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील प्राचीन मंकावती तीर्थकुंड येथे अवैधरित्या बांधकाम करणारे आरोपी देवानंद रोचकरी यांना अखेर पोलिसांनी अटक केली आहे. मागील ८ दिवसांपासून पसार असलेल्या रोचकरी यांना धाराशिव पोलिसांनी मुंबईतील मंत्रालय भागातून अटक केली असल्याचे पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांनी सांगितले. रोचकरी यांच्यावर या पूर्वी अनेक गंभीर गुन्हे नोंद असून त्यात सावकारकी करणे, शासकीय भूमी हडप करणे, मारहाण करणे, जिवे मारण्याचा प्रयत्न करणे यांचा समावेश आहे. रोचकरी यांच्यावर यापूर्वी २ वेळा हद्दपारीची कारवाईही करण्यात आली होती.

१. प्राचीन मंकावती तीर्थकुंड येथे अवैधरित्या बांधकाम करणार्‍यांवर गुन्हा नोंद करण्याची मागणी येथील दशावतार मठाचे महंत मावजीनाथ महाराज यांच्यासह महंत इच्छागिरी महाराज, महंत व्यंकटअरण्य महाराज, संजयदादा सोनवणे, जनक कदम पाटील, सुदर्शन वाघमारे यांनी ३१ मे २०२१ या दिवशी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. त्यांच्या या मागणीला यश प्राप्त झाले आहे.

२. जिल्हाधिकार्‍यांनी तुळजापूर तहसीलदार सौदागर तांदळे, नगर परिषद मुख्याधिकारी आशिष लोकरे आणि भूमी अभिलेख कार्यालयाच्या उपअधीक्षक वैशाली गवई यांच्या त्रिसदस्यीय चौकशी समितीची नेमणूक केली होती. या समितीने सिद्ध केलेल्या अहवालानंतर जिल्हाधिकार्‍यांनी फौजदारी गुन्हे नोंद करण्याचे आदेश दिले होते.

३. मंकावती तीर्थकुंड स्वतःच्या नावावर करून ते हडपण्यासाठी बोगस कागदपत्रे आणि पुरावे सिद्ध करणे, फसवणूक करणे यांसह कलम ४२०, ४६८, ४६९, ४७१ आणि ३४ अंतर्गत देवानंद रोचकरी आणि त्यांचे बंधू बाळासाहेब रोचकरी यांच्यासह अन्य अज्ञात आरोपींविरोधात ११ ऑगस्ट या दिवशी तुळजापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता.