‘नांदेड येथील श्री. शांताराम बेदरकर (वय ३८ वर्षे) मागील ११ वर्षे सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करत आहेत. ते साधनेत आल्यापासून मागील ११ वर्षे दैनिक ‘सनातन प्रभात’चे नियमित वितरण करत आहेत. नांदेड येथील साधकांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. आनंदी
‘श्री. शांताराम बेदरकर यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे, तरी ते कधीही निराश दिसत नाहीत. ते नेहमी आनंदी आणि हसतमुख असतात.
२. सकारात्मक
त्यांना नोकरीच्या ठिकाणी पुष्कळ शारीरिक काम करावे लागते. त्यामुळे त्यांना ‘शारीरिक वेदना होणे किंवा थकवा असणे’, यांसारखे त्रास होतात; परंतु ते त्याविषयी कुठलाही नकारात्मक विचार न करता सतत सकारात्मक राहून सेवा करतात. ते त्यांच्या दैनंदिन सेवेत कधीच खंड पडू देत नाहीत.
३. वाचकांशी जवळीक साधणे
३ अ. वाचकांशी अनौपचारिक बोलून त्यांची विचारपूस करणे : शांतारामदादा नांदेडमधील अर्ध्याहून अधिक वर्गणीदारांकडे दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करतात. ते प्रत्येक वाचकाशी अनौपचारिक बोलून त्यांची विचारपूस करतात आणि त्यांना दैनिक ‘सनातन प्रभात’ची वैशिष्ट्ये सांगतात. त्यामुळे त्यांची वाचकांशी चांगली जवळीक झाली आहे. वाचकही ‘शांतारामदादा कधी येणार ?’, याची वाट पहातात. येथे दैनिक ‘सनातन प्रभात’ एक दिवस उशिरा येतो, तरीही येथील वाचक टिकून आहेत.
३ आ. वाचक बाहेरगावी जाणार असल्यास ‘आम्ही परत आल्यावर दैनिक ‘सनातन प्रभात’चे सर्व अंक एकत्र द्या’, असे त्यांनी शांतारामदादांना सांगणे : शांतारामदादांच्या वाचकांशी असलेल्या जवळीकीमुळे वाचक कधी बाहेरगावी जाणार असल्यास ते शांतारामदादांना सांगतात, ‘‘आमचा दैनिक ‘सनातन प्रभात’चा अंक देण्यासाठी इतक्या लांब किंवा एवढे माळे चढून येऊ नका. आम्ही गावाहून परत आल्यावर आम्हाला सर्व अंक एकदाच एकत्र द्या.’’
४. इतरांना साहाय्य करणे
४ अ. वयस्कर वाचकांना आणि साधकांना सेवाभावाने साहाय्य करणे : काही वयस्कर साधक आणि वाचक घरात एकटे असतात. त्यांची मुले बाहेरगावी असतात. ‘नियमित दैनिक ‘सनातन प्रभात’ देण्यासाठी येणारे शांतारामदादा आपल्याला निश्चितच साहाय्य करतील’, असे त्या वयस्कर वाचकांना वाटते. शांतारामदादा त्यांना दिवाळीत आकाशकंदील लावून देतात किंवा त्यांच्या घरातील माळ्यावरून एखादी वस्तू काढायची असेल किंवा ठेवायची असेल, तरी ते आनंदाने करतात. त्यामुळे ‘शांतारामदादा आपल्याला साहाय्य करणार’, याची वाचकांना निश्चिती असते. ‘शांतारामदादांच्या या सेवाभावामुळे सनातनचे साधक समाजात आदर्श साधक म्हणून का परिचित आहेत ?’ हे लक्षात येते.
४ आ. वाचकाला साधना सांगून निराशेतून बाहेर पडायला साहाय्य करणे : एका वाचकांना नोकरीच्या ठिकाणी पुष्कळ त्रास होत होता आणि पुष्कळ अडचणीही येत होत्या. त्या वेळी त्यांचे नोकरीतील पदही धोक्यात आले होते. त्यामुळे ते निराश झाले होते. तेव्हा शांतारामदादांनी त्यांना ‘नामजप आणि साधना’ यांचे महत्त्व सांगून निराशेतून बाहेर पडण्यास साहाय्य केले. काही दिवसांनी त्या वाचकांची अडचण सुटली आणि त्यांचे पदही स्थिर राहिले. त्यामुळे त्या वाचकांची शांतारामदादांशी जवळीक वाढली आणि ते वाचक साधना करू लागले.
५. सेवेची तळमळ
५ अ. नांदेडमधील लांब अंतरावर रहात असलेल्या वाचकांकडे दैनिक ‘सनातन प्रभात’चे नियमित वितरण करणे : शांतारामदादा मागील १० वर्षे दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा सायकलवरून करत आहेत. त्यांचे निवासस्थान आणि वाचकांचे निवासस्थान यांत पुष्कळ अंतर आहे, तरी त्यांनी त्याविषयी कधीच गार्हाणे केले नाही. ते सायकलवरून संपूर्ण नांदेडमध्ये फिरून (जवळपास ४० ते ४५ किलोमीटर) दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करतात. त्यानंतरचा उर्वरित वेळ ते वैयक्तिक कामांसाठी देतात. त्यांच्या वितरणाच्या सेवेत सातत्य आहे. इतक्या वर्षांत केवळ २ – ३ वेळाच आणि तेही ते रुग्णाईत झाल्याने किंवा अन्य घरगुती अडचणींमुळे सेवा करू शकले नव्हते.
५ आ. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा आणि नोकरी सांभाळून ग्रंथप्रदर्शनाची सेवा करणे : या वर्षी नवरात्रीच्या कालावधीत लावलेल्या ग्रंथप्रदर्शनाच्या सेवेसाठी साधकसंख्या अल्प होती आणि साधकांची शारीरिक क्षमताही अल्प झाली होती. शांतारामदादांना हे समजल्यावर त्यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण आणि नोकरीची वेळ सांभाळून पहाटे आणि रात्री ग्रंथप्रदर्शन सेवेला अधिक वेळ देण्याचा प्रयत्न केला.
५ इ. देवतांचे विडंबन थांबवणे : शांतारामदादांना देवतांचे विडंबन किंवा एखादा धर्महानीचा प्रसंग दिसला, तर ते निर्भिडपणे त्याचा प्रतिकार करतात. त्यांचे शिक्षण आणि वाचन अल्प आहे, तरी ते ‘समोरील व्यक्तीला योग्य काय ?’, हे नम्रपणे समजावून सांगतात.
६. अल्प अहं
काही वेळा दैनिक ‘सनातन प्रभात’चे गठ्ठे वेळेत मिळत नाहीत. त्या वेळी शांतारामदादांना २ दिवसांचे अंक एकत्र द्यावे लागतात. तेव्हा ते प्रत्येक वाचकाची कान पकडून क्षमा मागतात. त्या वेळी वाचकांना अन्य वर्तमानपत्रांचे वितरक आणि दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरक यांच्यातील भेद लक्षात येतो. वाचक आनंदाने अडचणी समजून घेतात.
७. श्रद्धा
काही वर्षांपूर्वी त्यांच्या आयुष्यात अनेक संकटे आली होती. त्यांनी ती परिस्थिती स्वीकारली. त्यांचा देवावर असलेला दृढ विश्वास आणि श्रद्धा यांमुळे ते त्या प्रसंगांतून लवकर बाहेर पडले. त्या वेळीही त्यांनी सेवेत कधी खंड पडू दिला नाही.
‘गुरुदेवा, तुम्हीच शांतारामदादांचे हे गुण आमच्या लक्षात आणून दिले आणि आम्हाला त्यांच्याकडून शिकण्याची संधी दिली. आमच्यातही हे गुण येण्यासाठी तुम्हीच आमच्याकडून प्रयत्न करवून घ्या. आमची ईश्वरप्राप्तीची तळमळ वाढवा’, अशी प्रार्थना करून कृतज्ञता व्यक्त करतो.’
– सर्व साधक, नांदेड (२.१२.२०१९)