तळमळीने सेवा करणार्‍या आणि ‘गुरुदेव करवून घेत आहेत’, असा कृतज्ञताभाव असणार्‍या सौ. संगीता प्रमोद घोळे

तळमळीने सेवा करणार्‍या आणि ‘गुरुदेव करवून घेत आहेत’, असा कृतज्ञताभाव असणार्‍या सातारा रस्ता, पुणे येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. संगीता प्रमोद घोळे (वय ५६ वर्षे) !

सौ. संगीता घोळे

१. कौटुंबिक दायित्व निभावणे

‘सौ. घोळेकाकूंनी त्यांच्या दोन्ही मुलींवर चांगले संस्कार केले आहेत. काकूंचे यजमान श्री. प्रमोद घोळे यांनी सेवानिवृत्तीनंतर पूर्णवेळ सेवा करण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी काकूंनी कौटुंबिक दायित्व घेऊन यजमानांना सहकार्य केले. काका मोठ्या पदावर सेवारत होते, तरी ‘त्यांनी आता साधनेला वेळ द्यावा’, अशी काकूंची तळमळ असते.’ – सौ. प्रतिभा फलफले आणि सौ. अनुराधा तागडे (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), सातारा रस्ता, पुणे.

२. सेवेची तळमळ

अ. ‘२ वर्षांपूर्वी सौ. घोळेकाकूंना मोठ्या मुलीच्या बाळंतपणामुळे बाहेर जाऊन सेवा करणे जमत नसे. तेव्हा त्यांनी नातेवाईक आणि परिचित यांना संपर्क करून दिवाळी अन् मकरसंक्रांती यानिमित्त ग्रंथ, सात्त्विक उत्पादने आणि सनातन पंचांग भेट देण्याविषयी प्रबोधन केले आणि त्यांच्याकडून त्यासंदर्भातील मागणी घेतली. काकूंनी त्यासाठी ध्येय ठेवून तळमळीने प्रयत्न केले.

आ. त्या नातेवाइकांना साधना सांगून त्यांना कार्यात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करतात. त्या साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ आणि विज्ञापने यांच्या अहवालांची सेवा तळमळीने अन् मनापासून करतात.

इ. त्या सेवेशी संबंधित प्रत्येक सूत्र पुढाकार घेऊन पूर्ण करतात. त्यांचा ‘सेवा वेळेत आणि परिपूर्ण कशी होईल ?’, असा विचार असतो.

ई. त्या वाचक आणि विज्ञापनदाते यांना संपर्क करतात. त्यांनी अनेक वाचक आणि विज्ञापनदाते यांना सनातन संस्थेशी जोडले आहे. त्यांनी दळणवळण बंदीच्या काळात वाचक आणि विज्ञापनदाते यांना संपर्क करून दैनिक ‘सनातन प्रभात’ची ‘पी.डी.एफ.’ पाठवण्याच्या सेवेची अल्प कालावधीत घडी बसवली.

उ. त्या गुरुपौर्णिमेला गुरुपूजनाच्या सेवेची सिद्धता भावपूर्ण आणि परिपूर्ण करतात.

३. अल्प अहं 

अ. काकू फार पूर्वीपासून साधनेत आहेत. त्यांनी अनेक ठिकाणी विविध सेवा केल्या आहेत; परंतु त्याविषयी त्यांच्या बोलण्यात अहं जाणवत नाही.

आ. ‘त्या सधन घरातील असूनही त्या गोष्टीचा त्यांना अहं नाही’, असे जाणवते.

– सौ. मनीषा पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), सौ. प्रतिभा फलफले आणि सौ. अनुराधा तागडे

४. भाव

अ. ‘परात्पर गुरुदेवांनी साधनेविषयी केलेले मार्गदर्शन ऐकून, तसेच ‘परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथातील छायाचित्रे पाहून त्या गुरुदेवांशी अनुसंधान ठेवण्याचा प्रयत्न करतात. आता ‘साधना करून गुरुदेवांच्या चरणी जायचे’, एवढेच ध्येय आहे’, असे त्या सांगतात.

आ. सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये पुणे येथे आल्यानंतर काकू त्यांच्यासाठी अल्पाहार बनवून पाठवतात. तेव्हा त्यांना संतसेवा मिळाल्याविषयी कृतज्ञता वाटते. त्यांनी पाठवलेल्या अल्पाहाराच्या पाकिटाकडे पाहून त्यांचा संतांप्रतीचा भाव जाणवतो.

इ. एकदा सद्गुरु (कु.) स्वातीताई दुपारच्या महाप्रसादासाठी सौ. घोळेकाकूंकडे जाणार होत्या. त्या वेळी ‘साक्षात् भगवंत घरी येणार आहे’, या भावाने त्यांनी देवाला नैवेद्य दाखवतांना जशी भावपूर्ण सिद्धता करतात, तशी सर्व सिद्धता केली होती. काकूंचे कौतुक केल्यानंतर ‘सर्वकाही गुरुदेवांनीच करवून घेतले’, असा त्यांचा भाव होता.

५. जाणवलेले पालट

अ. त्या ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रिये’तील बारकावे समजून घेऊन स्वभावदोष आणि अहं दूर करण्यासाठी नियमित प्रयत्न करतात. काकू आधीच्या तुलनेत आता आनंदी वाटतात. त्या सत्संगात बोलतांना त्यांच्यातील निर्मळता आणि मोकळेपणा जाणवतो.

आ.‘पूर्वी काकूंच्या बोलण्यात नकारात्मकता असायची. मागील सहा मासांपासून काकूंमधील मनमोकळेपणा वाढला आहे. त्या ‘साधनेची स्थिती आणि अडचणी’, यांविषयी मोकळेपणाने बोलून घेतात. आता त्या सकारात्मक राहून प्रत्येक प्रसंग स्वीकारतात.’

– सौ. मनीषा पाठक

इ. ‘पूर्वी जीवनात घडलेल्या काही प्रसंगांमुळे त्यांना भीतीचे आणि स्वतःच्या प्रकृतीविषयी काळजीचे विचार येऊन अधूनमधून त्रास होत असे. त्यावर त्यांनी स्वयंसूचना सत्रे करून आणि भावाच्या स्तरावर प्रयत्न करून मात केली आहे.

ई. पूर्वी त्यांच्यातील ‘कर्तेपणा घेणे’, या अहंच्या पैलूमुळे त्यांना सेवा करतांना ताण जाणवत असे. ‘सेवेमुळे व्यष्टी साधना होत नाही’, अशी त्यांची नकारात्मक स्थिती असायची. आता ‘गुरुदेवच सर्वकाही करवून घेत आहेत’, असा भाव ठेवून त्या सेवा करतात. त्यामुळे त्यांना सेवा करतांना आनंद मिळतो.

ऊ. ‘आता त्यांच्यातील स्थिरता वाढली आहे’, असे जाणवते.’

– सौ. प्रतिभा फलफले आणि सौ. अनुराधा तागडे (जून २०२०)