सकारात्मक, सतत आनंदी आणि गुरुदेवांप्रती अपार भाव असलेल्या सातारा रस्ता, पुणे येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. अंजली सुरेशचंद्र मेहता (वय ६४ वर्षे) !

सौ. अंजली मेहता यांनी वर्ष १९९८ पासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ केला. सध्या त्या ‘वस्तूसंग्रह वितरक’ म्हणून सेवा करतात. पुण्यात रहाणारे त्यांचे कुटुंबीय आणि एक साधिका यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये, तसेच त्यांच्यातील पालट येथे दिले आहेत.

सौ. अंजली मेहता

१. मनाने कणखर

‘सौ. अंजली तिला झालेल्या मोठ्या व्याधीतही कधी खचली नाही.’

– श्री. सुरेशचंद्र मेहता (यजमान)

२. कृतीतून शिकवणे

‘आईंमध्ये सेवाभाव आणि आदरातिथ्य करणे, हे गुण आहेत. त्या घरी आलेल्या प्रत्येकाचे आनंदाने स्वागत करतात. त्यांनी मला ‘व्याधीग्रस्त व्यक्तींची शुश्रूषा कशी करायची ?’, हे कृतीतून शिकवले. त्यामुळे मला माझे आजेसासरे, मामेसासूबाई यांची शुश्रूषा करतांना कसलीही लाज वाटली नाही.

३. प्रेमभाव

कधीकधी माझ्यातील तीव्र अहंकार आणि स्वभावदोष यांमुळे त्या दुखावल्या जायच्या, तरी त्या मला अत्यंत प्रेमाने माझी चूक दाखवून ‘योग्य काय असायला हवे ?’, हे सांगायच्या.’

– सौ. नेहा मेहता (सून)

४. श्रद्धा

४ अ. देवावर श्रद्धा ठेवण्यास शिकवणे : ‘आपल्या प्रारब्धात जे आहे, तेच आपल्याला मिळणार आहे’, हे आईने आम्हाला लहानपणापासून शिकवले आहे. ‘त्यामुळे अडचणीच्या काळात आनंदी कसे रहायचे ?’, हे आम्ही आईकडून शिकलो.’

– श्री. अमोल मेहता (मुलगा)

४ आ. गुरुदेवांवर अपार श्रद्धा : ‘साधना चालू केल्यानंतर सौ. अंजली काही वर्षे सत्संग घेण्याची सेवा करत होती. त्या वेळी तिला पुष्कळ अनुभूती आल्या आणि तिची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर अपार श्रद्धा बसली. ‘ते आपल्यासमवेत आहेत’, असा तिचा दृढ विश्वास आहे. तिच्यामुळे माझेही साधनेचे प्रयत्न होत आहेत.’

– श्री. सुरेशचंद्र मेहता

४ इ. परात्पर गुरु डॉक्टरांवर असलेल्या श्रद्धेच्या बळावर वेदना सहन करणे : ‘गेली ३५ वर्षे आई तिच्या व्याधीशी झुंजत आहे. आईच्या आजारपणात मला तिची सहनशीलता अनुभवायला मिळाली. वर्ष १९८६ मध्ये तिची मोठी शस्त्रक्रिया झाली आणि वर्ष २०१५ पासून तिला ‘जॉ ओपनिंग डिस्टोनिया’ ही व्याधी झाली. या व्याधीत तोंडाचा जबडा सतत उघडा रहातो आणि जबड्याच्या अनियंत्रित हालचाली होत रहातात. त्या वेळी आधुनिक वैद्यांनी उपचार म्हणून डोळ्यांच्या बाजूला आणि जबड्याला बाहेरून इंजेक्शन दिले, तरी तिच्या तोंडवळ्यावर वेदना दिसायच्या नाहीत. तिच्या जबड्याला बाहेरून इंजेक्शन दिले जात असतांना पाहून माझ्या अंगावर काटा यायचा; पण आई ते आनंदाने सहन करायची. याविषयी विचारल्यावर ती म्हणाली, ‘‘आधुनिक वैद्यांच्या खोलीत जातांना मी परात्पर गुरुदेवांना माझ्यासमवेत घेऊन जाते.’’

– श्री. अमोल मेहता

५. अनुभूतींमुळे सकारात्मक रहाणे

‘आई त्यांना आलेल्या अनुभूती मला सांगायच्या. कधीकधी तीच अनुभूती पुन्हा सांगायच्या. तेव्हा माझ्या मनात विचार यायचे, ‘आईंनी या अनुभूतीत अडकायला नको’; पण नंतर माझ्या लक्षात आले की, या अनुभूती त्यांना व्याधीवर मात करायला साहाय्य करतात. त्यामुळेच त्या सकारात्मक राहू शकतात.’

– सौ. नेहा मेहता

६. सेवेची तळमळ

अ. ‘आईला तीव्र शारीरिक त्रास आहे, तरी ‘माझ्याकडून थोडीतरी सेवा होऊ दे’, असे म्हणून ती उदबत्तीच्या कारखान्यात सेवेला जाते. सेवा करतांना ‘कोण काय म्हणेल ?’, याकडे तिचे लक्ष नसते.’

– श्री. अमोल मेहता

आ. ‘आईला पूर्वी ‘आपल्या मनाप्रमाणे व्हावे’, असे वाटायचे. आता तिने सर्व परिस्थिती स्वीकारली आहे. ‘मी या स्थितीतही साधना कशी करू ?’, असे तिला सतत वाटत असते. परात्पर गुरुदेवच माझ्याकडून साधनेचे प्रयत्न करून घेणार आहेत’, असा तिचा भाव असतो. माझ्याशी दूरभाषवर बोलतांना ती साधनेविषयीच बोलते.’

– सौ. श्वेता तागडे (मुलगी)

७. जाणवलेले पालट

अ. ‘पत्नीच्या मनातील व्याधीच्या संदर्भातील विचार न्यून झाले आहेत. ती गेल्या २ – ३ मासांपासून शांत झाली आहे.’

– श्री. सुरेशचंद्र मेहता

आ. ‘आई पूर्वीच्या तुलनेत अधिक शांत झाली आहे. तिच्याकडे पाहून आनंद जाणवतो.’ –

श्री. अमोल मेहता

इ. ‘गेल्या तीन मासांपासून आईंशी बोलतांना मला हलकेपणा जाणवतो आणि पूर्वीसारखा ताण येत नाही. त्यांच्याकडे पाहिल्यावर ‘त्यांचा नामजप आतून चालू आहे’, असे मला वाटते. त्यांच्या हालचालीत शांतपणा आणि हलकेपणा जाणवतो.’

– सौ. नेहा मेहता

‘आईने पुष्कळ शारीरिक त्रास सहन केले आहेत. गुरुकृपेमुळे आणि गुरूंवर असलेल्या दृढ श्रद्धेमुळेच ती या स्थितीतही आनंदी आहे. तिला गुरुचरणी स्थान मिळावे’, अशी गुरुचरणी शरणागतभावाने प्रार्थना करते.’

– सौ. श्वेता तागडे

८. सौ. मनीषा पाठक (६८ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या साधिका)

सौ. मनीषा पाठक

८ अ. सत्संगात सहभागी होणे : ‘पुणे जिल्ह्यात प्रतिदिन होणार्‍या सत्संगात काकू मोकळेपणाने सहभागी होतात. त्यांना शारीरिक त्रास होत असल्यामुळे बोलतांना त्रास होतो, तरी त्या सत्संगात बोलण्याचा प्रयत्न करतात. एकदा भावाच्या स्तरावर त्यांनी केलेले प्रयत्न ऐकतांना त्यांचे बोलणे अस्पष्ट ऐकू येत होते; परंतु ते ऐकावेसे वाटत होते.

८ आ. तीव्र शारीरिक त्रास असूनही निराशाजनक न बोलणे : त्या स्वतःचे आजारपण किंवा होणारे शारीरिक त्रास यांविषयी कधीही बोलत नाहीत. त्या कधीही नकारात्मक किंवा निराशाजनक बोलत नाहीत. त्यांच्या बोलण्यात परात्पर गुरुदेवांप्रती असलेली कृतज्ञता जाणवते.

८ इ. जाणवलेला पालट : सौ. मेहताकाकूंचा तोंडवळा आधीपेक्षा तेजस्वी जाणवतो.’ (११.६.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक