पुण्यातील शिवसृष्टीत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित ‘ओंजळ’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला
पुणे, १४ ऑगस्ट – बाबासाहेब हे इतिहास जरी आपल्याला सांगत असले, तरी ते वर्तमानात आपण कसे भानावर यावे, हेसुद्धा सांगतात. इतिहासात चांगल्या झालेल्या गोष्टी आपण विसरलो तर नाही ना ? आणि इतिहासात आपण काय चुका केल्या आहेत ? त्या पुन्हा करू नयेत हे ते सांगतात. बाबासाहेब ज्या पद्धतीने आपल्याला इतिहास सांगतात, तो ऐकतांना इतिहासाचा प्रत्येक प्रसंग डोक्यात ‘फीट’ होतो. इतिहासासमवेत वर्तमानाची जाग आणणारा हा एक महापुरुष आहे. बाबासाहेबांना मी भेटू शकलो, त्यांच्या सहवासात राहू शकलो हे माझे भाग्य आहे, अशा शब्दांमध्ये मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १४ ऑगस्ट या दिवशी पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे वर्णन केले. पुण्यातील शिवसृष्टीमध्ये आयोजित पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित ‘ओंजळ’ पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. या सोहळ्यास स्वत: शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, पद्मविभूषण आशा भोसले, ज्येष्ठ इतिहासकार गजानन मेहेंदळे, भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांची उपस्थिती होती.
राज ठाकरे पुढे म्हणाले की, आज बर्याच वर्षांनी मी शिवसृष्टीत आलो. इथे दाखल होत असतांना मला जुनी शिवसृष्टी आठवली, जी बाबासाहेबांनी शिवाजी पार्कवर साकारली होती. पहिल्यांदा त्या शिवसृष्टीत भवानी तलवार आणली गेली होती आणि बाबासाहेब ती घेऊन आले होते. त्या भवानी तलवारीचे स्वागत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी वेशीवर केले होते, तेव्ही मीही तिथे होतो. त्या वेळी पहिल्यांदा मी बाबासाहेब पुरंदरे यांना पाहिले.
या वेळी ज्येष्ठ गायिका आशा भोसले म्हणाल्या की, वर्ष १९६३ मध्ये मी पहिल्यांदा बाबासाहेबांना भेटले. तेव्हापासून आम्ही अनेकदा भेटत आलो आहोत. त्यांनी मला चांदीच्या ताटात एक शंकराची पिंड आणि नंदी आणून दिला. तेव्हापासून माझ्या आयुष्यात पुष्कळ काही चांगले घडले.
भाजपचे आमदार आशिष शेलार म्हणाले की, बाबासाहेबांनी आदर्श जीवन जगले आहे. त्यांनी शिवचरित्रासाठी स्वत:चे जीवन वाहून घेतले. ऋषितुल्य असे बाबासाहेबांचे व्यक्तीमत्त्व आहे.