माजी परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी लिहिलेल्या ‘द लाँग गेम : हाऊ द चायनिज निगोशिएट विथ इंडिया’ (प्रदीर्घ खेळी : चिनी भारताशी कशा प्रकारे वाटाघाटी करतात ?) हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले. गोखले हे माजी आय.एफ्.एस्. (इंडियन फॉरेन सर्व्हिस) अधिकारी आहेत. त्यातही ते चीनचे गाढे अभ्यासक म्हणून ओळखले जातात. चीन आणि तैवान या दोन्ही देशांत कार्यरत असणारे गोखले हे भारतातील एकमेव आय.एफ्.एस्. अधिकारी आहेत. वर्ष २०१७ मध्ये डोकलाम विवाद सोडवण्यासाठी चीनसमवेत वाटाघाटी करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. ही सर्व पार्श्वभूमी पहाता त्यांनी चीनविषयी लिहिलेल्या पुस्तकाला विशेष महत्त्व आहे. हे पुस्तक प्रकाशित केलेल्या ‘पॅग्वीन रॅन्डम हाऊस’च्या कार्यकारी संपादिका एलिझाबेथ कुरुविला यांच्या मते, ‘विजय गोखले यांना भारत-चीन मुत्सद्देगिरीचा असलेला प्रदीर्घ अनुभव, त्यांनी या विषयावर केलेले व्यापक संशोधन आदी सूत्रांचा भारताला नक्कीच लाभ होईल’, असे म्हटले आहे. या पुस्तकात गोखले यांनी भारतातील घरभेद्यांचा म्हणजे साम्यवाद्यांचाही समाचार घेतला आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील अणूकराराच्या वेळी चीनने भारतातील माकप आणि भाकप या साम्यवादी पक्षांच्या नेत्यांना हाताशी धरून हा करार होऊ नये, यासाठी प्रयत्न चालवले होते. या कराराला भारतातील साम्यवादी पक्षांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला. याविषयी पुस्तकात सविस्तर नोंदी केल्या आहेत. याला भारतातील साम्यवादी पक्षांनी थातुरमातुर विरोध केला; मात्र त्या विरोधाला धार नव्हती. कशी असणार ? गोखले यांनी सत्य तेच समोर आणले ! सध्या भारत-चीन यांच्यातील संबंध ताणले आहेत. अशा परिस्थितीत गोखले यांनी चीनचे अनेक बारकाव्यांसहित केलेले विश्लेषण अभ्यासणे आवश्यक आहे. भारतातील साम्यवाद्यांचे चीनप्रेम वारंवार उघड झाले आहे. तरी ‘त्यांच्यावर कारवाई का होत नाही ?’ हा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होतो. बलाढ्य चीनशी दोन हात करून त्याला नमवण्यासाठी भारताला सर्वच क्षेत्रात चांगली कामगिरी करावी लागेल, हेही या पुस्तकाच्या माध्यमातून पुन्हा एकदा पुढे आले.
शत्रूला ओळखणे अपरिहार्य !
शत्रूशी दोन हात करायचे असल्यास त्याची मर्मस्थळे आणि शक्तीस्थळे ठाऊक असणे आवश्यक असते. हे पुस्तक चीनच्या अंतरंगावर प्रकाश टाकते. भारत आणि चीन यांच्यात अधूनमधून द्विपक्षीय स्तरावर चर्चा चालू असते. अशा वाटाघाटी करतांना चीनची भूमिका कशी असते ? हे गोखले यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण मांडले आहे. ‘चीनची वाटाघाटी करण्याची शैली वेगळी आहे. तो वेळ, परिस्थिती आणि उद्दिष्ट ठेवून शत्रूसमवेत वाटाघाटी करण्यास पुढे येतो. त्याची वाटाघाटी करण्याची शैली जटील आहे. तो वाटाघाटी करतांना शत्रूचे सामर्थ्य आणि कमकुवतपणा यांचा काळजीपूर्वक अभ्यास करतो. तो सावधपणे सिद्धता करतो आणि त्याच्याकडून फसवणूक होणे, ही सामान्य गोष्ट आहे.
वाटाघाटी करतांना स्वतःचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी चीन एकाच वेळी प्रेमळपणे वागतो, तर कधी सूत्र सोडवण्यासाठी उदासीनता दाखवतो. कधी कधी तर तो थेट शत्रुत्व प्रकट करतो. त्यामुळे चीनशी वाटाघाटी करतांना कुशल मुत्सद्देगिरी करणारे लोक आपल्याकडे हवेत’, असे गोखले नमूद करतात. वाटाघाटी करतांना चीन एवढी सिद्धता करत असेल, तर भारताच्या विरोधात पावले टाकतांना तो किती विचारपूर्वक आणि पूर्ण सिद्धतेनिशी पावले टाकत असेल ?
‘चीनच्या अंतर्गत समस्या काय आहेत ?’ ‘महासत्ता बनण्यापर्यंत त्याचा प्रवास कसा होता ?’ आणि त्याहून अधिक ‘एक प्रकारे हुकूमशाही असलेल्या चीनमधील लोकांची स्थिती कशी आहे’, याविषयी जगाला अगदी थोड्याच प्रमाणात ठाऊक आहे. चीन याविषयी कधीच मोकळेपणाने भाष्य करत नाही. ‘जगासमोर स्वतःची प्रतिमा नेहमीच उजळत राहील’, याची चीन नेहमीच काळजी घेतो. त्यामुळे चीनभोवती एक गूढ वलय निर्माण झाले आहे. अशा चीनला भारताला वठणीवर आणायचे आहे ! मागील ५०-६० वर्षे चीन अनेकविध भारतविरोधी कारवाया करत आहे. त्यामुळे आपण चीनला ‘धूर्त’, ‘विश्वासघातकी’, ‘कावेबाज’ अशी विविध विशेषणे लावतो. ही विशेषणे किती सार्थ आहेत, हे भारताने अनुभवले आहे. अशाशी वाटाघाटी करणे म्हणजे वेळ वाया घालवणे होय.
भारताची सर्वंकष सिद्धता महत्त्वाची !
‘चीनच्या विरोधात सर्वंकष लढा देण्यास भारत सिद्ध आहे का ?’ हा महत्त्वाचा प्रश्न आहे. भारताला खिंडित पकडण्यासाठी चीन करत असलेले प्रयत्न हे १-२ वर्षांचे नाहीत. त्याची पूर्वसिद्धता तो गेली कित्येक दशके करत आहे. ९० च्या दशकात चीन आणि भारत यांची आर्थिक, सामाजिक किंवा सामरिक परिस्थिती सारखीच होती; मात्र वर्ष १९९० नंतर चीनने सर्वच क्षेत्रात विहंगम प्रगती केली. चीनची आर्थिक, औद्योगिक किंवा सामरिक प्रगती पहाता ‘भारत चीनच्या १०० वर्षे मागे आहे’, असे काही विश्लेषकांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्याला पराभूत करणे, हे तसे सोपे काम नाही.
सद्यःस्थितीत युद्ध हे केवळ रणांगणावर लढले जाते, असे नव्हे. हल्ली पडद्यामागूनही अनेक हालचाली केल्या जातात. चीनला केवळ सीमेवरच नव्हे, तर विविध क्षेत्रात मात देण्यासाठी सातत्याने प्रयत्न व्हायला हवेत. यासाठी पहिले पाऊल म्हणजे चीनचे समर्थन करणार्यांना त्यांची जागा दाखवायला हवी. भारत सरकारने याचा आरंभ भारतातील साम्यवाद्यांपासून करावा. शत्रूराष्ट्राशी हातमिळवणी करणे, हे देशद्रोह आहे. भारतातील साम्यवादी उघडपणे चीनची बाजू घेतात आणि त्याचे हित चिंतित असतात. असे असतांना त्यांच्यावर कारवाई का होत नाही ? वास्तविक असे पक्ष हा भारतीय लोकशाहीला लागलेला कलंक आहे. हा कलंक मिटवण्यासाठी आता भारत सरकारने पावले उचलावीत, अशीच राष्ट्रप्रेमींची अपेक्षा आहे !