पूरग्रस्त भागाची पहाणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा सांगली जिल्हा दौरा
सांगली, २ ऑगस्ट (वार्ता.) – आपत्तीची वारंवारता पाहिली, तर त्यांचे स्वरूप भीषण होत आहे. प्रचंड प्रमाणात पाऊस, दरडी खचणे अशा घटना घडत असून निसर्गासमोर आपण सर्व हतबल आहोत. पुराच्या पाण्यामुळे पूल वाहून गेले, घाट रस्ते खचले. यांवर आता कायमस्वरूपी तोडगा काढणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी पुराच्या पाण्याचे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. दुष्काळग्रस्त भागाकडे पाणी वळवण्याच्या सूचना आल्या आहेत. वडनेरे समितीसह सर्व समित्यांचे अहवाल एकत्र करून योग्य तो आराखडा करण्यात येईल. तज्ञांची समिती नेमून त्यात पूर व्यवस्थापन, दरडी का कोसळतात ? या अनुषंगाने उपाय शोधण्यात येतील, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. २ ऑगस्टला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सांगली जिल्ह्यात पूरग्रस्त भागात पहाणी करण्यासाठी दौर्यावर आले होते, त्या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या वेळी मुख्यमंत्री म्हणाले
१. अतिक्रमणे झाली आहेत आणि नदी पात्रातील पूर रेषेची कार्यवाही होत नसेल, तर त्यांना काय अर्थ आहे ? (मुख्यमंत्र्यांनी केवळ माहिती देऊन न थांबता उत्तरदायींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत ही अपेक्षा ! – संपादक)
२. यापुढे विकासकामे करतांना त्यामुळे होणारे लाभ आणि यानंतर निसर्ग, पर्यावरण या अनुषंगाने भविष्यात होणारे तोटे यांचा विचार करावा लागेल.
३. राज्यात आज १ सहस्र ३०० मेट्रिक टन प्राणवायू आपण प्रतिदिन उत्पादन करत आहोत. पुढच्या लाटेत दुपटीपेक्षा अधिक ऑक्सिजन लागेल, असे तज्ञांचे सांगणे आहे. रुग्णवाढ अल्प होत नाही, तिथे दुकानांच्या वेळांवर मर्यादा रहातील, अन्य ठिकाणी दुकानांच्या वेळा रात्री ८ पर्यंत वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
४. मुंबईतील लोकलविषयी आपण लगेच निर्णय घेत नाही. सर्व ठिकाणच्या कार्यालय प्रमुखांना कामाच्या वेळा विभागण्याची आणि घरूनच काम करण्याची मी विनंती करतो.
मुख्यमंत्र्यांच्या भिलवडी, अंकलखोप, तसेच पूरग्रस्त ठिकाणी भेटी
याअगोदर मुख्यमंत्र्यांनी भिलवडी, अंकलखोप, मौजे डिग्रज, तसेच पूरग्रस्त ठिकाणी भेटी दिल्या. या वेळी मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘जुलैमध्ये सांगली जिल्ह्यात अतीवृष्टी आणि महापूर यांमुळे मोठ्या प्रमाणावर नागरिक-शेतकरी यांची हानी झाली आहे. राज्यासमोर सध्या कोरोना आणि पूरस्थिती यांचे संकट असले, तरी मी पूरग्रस्तांना वार्यावर सोडणार नाही. काही ठिकाणी कायमस्वरूपी तोडगा काढण्याची आवश्यकता असून त्यासाठी काही कटू निर्णय घ्यावे लागतील. त्याकरिता नागरिकांची सिद्धता हवी.
हानीभरपाईसाठी मी कोणतेही ‘पॅकेज’ घोषित करणार नाही, तसेच कुणालाही वार्यावर सोडणार नाही. सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.’’