यापुढे ‘रेड झोन’मधील बांधकामांना अनुमती नको ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

आता कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे

कोल्हापूर, ३० जुलै – मी ‘पॅकेज’ घोषित करणारा मुख्यमंत्री नाही, तर आवश्यक ते साहाय्य करणारा मुख्यमंत्री आहे. महापुराने शेतकरी आणि व्यापारी यांची मोठी हानी झाली आहे. महापुराचा अभ्यास करणार्‍या आतापर्यंतच्या सर्व समित्यांचे अहवाल एकत्र करून त्यातील महत्त्वाची सूत्रे एकत्र करावी लागतील. महापुरामुळे अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. आता कठोर निर्णय घेण्याची वेळ आली असून यापुढे ‘रेड झोन’मधील बांधकामांना अनुमती नको, अशी भूमिका घ्यावी लागेल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. ते कोल्हापुरात ३० जुलै या दिवशी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

या वेळी मुख्यमंत्री म्हणाले की,

१. मला लोकांच्या जिवाशी खेळ करायचा नाही आहे, तसेच आपत्तीत राजकारण करायचे नाही. आज पहाणीच्या कालावधीत देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. संकटाचा सामना करण्यासाठी ठोस उपाययोजनांविषयी एकत्र येऊन चर्चा करण्याविषयी मी त्यांच्याशी बोललो.

२. आता घरोघरी साचलेल्या पाण्याने रोगराईची भीती आहे. त्यावर तात्काळ उपाययोजना कराव्या लागतील.

३. हानीभरपाईसाठी आता वर्ष २०१५ चे निकष पालटण्याची आवश्यकता आहे. सवंग लोकप्रियतेसाठी मी कोणतीही घोषणा तात्काळ करणार नाही, तर सर्व हानीची माहिती घेऊन मी ठोस साहाय्याविषयी निर्णय घेणार आहे. काही ठिकाणी केंद्राचे आर्थिक साहाय्य लागेल, ते त्यांना आपण मागू.

४. अधिकोष आणि विमा आस्थापन यांना सूचना देण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. महसूल विभागाचे पंचनामे विमा आस्थापनांनी ग्राह्य धरावेत, तसेच ५० टक्के रक्कम तातडीने देण्याविषयी संबंधितांना सूचना करण्याविषयी विनंती केली आहे.

५. अतिरिक्त पावसामुळे वाढणार्‍या अधिकच्या पाण्याचे काय करायचे ?, याचा अभ्यास करावा लागणार आहे. याच समवेत भूस्खलनाचा अभ्यासही करावा लागणार आहे. यापुढील काळात सतत पूरबाधित क्षेत्रातील दरड कोसळणार्‍या भागातील लोकांचे पुनर्वसन करावे लागणार आहे.

आजी-माजी मुख्यमंत्र्यांचा एकत्रित कोल्हापूर दौरा !

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री अन् विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पूरस्थितीची पहाणी करण्यासाठी कोल्हापूर दौर्‍यावर आले आहेत. ३० जुलै या दिवशी दुपारी १२ वाजता आजी-माजी मुख्यमंत्री हे एकाच वेळी कुंभारगल्ली येथे समोरासमोर आले. या वेळी दोघांमध्ये काही मिनिटे पूरस्थितीवर चर्चा झाली.