आमदार प्रताप सरनाईक यांच्याविरुद्ध कोणतीही कठोर कारवाई करू नका ! – उच्च न्यायालयाचा ‘ईडी’ला आदेश

आमदार प्रताप सरनाईक

मुंबई – ‘एन्.एस्.ई.एल्.’ आणि ‘टॉप सिक्युरिटी’ प्रकरणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या विरोधात तूर्तास कोणतीही कठोर कारवाई करू नका’, असा आदेश येथील उच्च न्यायालयाने सक्तवसुली संचालनालयाला (‘ईडी’ला) दिला आहे. त्यामुळे प्रताप सरनाईक यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांना २३ ऑगस्टपर्यंत दिलासा मिळाला आहे.

‘एन्.एस्.ई.एल्.’ आणि ‘टॉप सिक्युरिटी’ प्रकरणी २८ जुलै या दिवशी सुनावणी होणे अपेक्षित होते; परंतु न्यायालय सध्या परमबीर सिंह आणि रश्मी शुक्ला यांच्या याचिकांवर सुनावणी घेत आहे. ही सुनावणी दिवसभर चालण्याची शक्यता असल्याने प्रताप सरनाईक यांच्या याचिकेवर सुनावणी घेता येणार नाही, असे सकाळी न्यायालयाने स्पष्ट केले. ‘एम्.एम्.आर्.डी.एम्.’मध्ये सुरक्षारक्षक पुरवण्याच्या संदर्भात प्रताप सरनाईक यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. या संदर्भात सरनाईक यांनी राज्य सरकारला अन्वेषण करण्याची विनंती केली आहे.

याविषयी प्रताप सरनाईक म्हणाले, ‘‘आघाडी सरकार स्थापन होण्यात माझाही खारीचा वाटा आहे. ‘एम्.एम्.आर्.डी.एम्.’मध्ये सुरक्षारक्षक पुरवण्याकामी काेट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला आहे, असा आरोप माझ्यावर केला जात आहे. गृह विभागाच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागात या संदर्भात गुन्हा नोंद झाला आहे. ते अन्वेषण ‘ईडी’ने स्वत:कडे घेतले; पण आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या माध्यमातून असा घोटाळा झाला आहे किंवा नाही, याचे अन्वेषण करण्याचे दायित्व राज्य सरकारचे आहे. मी सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे. त्यामुळे माझ्यावर असे आरोप होत असतांना ते राज्य सरकारवरही होत आहेत.’’