प्रेमभावाने सर्वांची मने जिंकणार्‍या आणि तळमळीने साधना अन् सेवा करणार्‍या देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती अनुराधा मुळ्ये !

श्रीमती अनुराधा मुळ्ये

१. उत्साही

‘काकूंचे वय ६१ वर्षे आहे, तरी त्या तरुणांना लाजवेल, अशा उत्साहाने सेवा करतात. त्या पहाटे ४ वाजता उठतात आणि रात्री ११.३० वाजता झोपतात, तरी त्या दिवसभर उत्साही असतात.

सौ. राधा साळोखे

२. सेवेची तळमळ आणि नियोजनकौशल्य

त्या सकाळी १ घंटा दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा करतात आणि घरचे सर्व आवरून त्या सकाळी ११ ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत देवद आश्रमात सेवेला येतात. त्यांनी आश्रमसेवा, दैनिकाच्या वितरणाची सेवा, घर आणि व्यष्टी साधना या सर्वांचे दिवसभराचे नियोजन व्यवस्थित केलेले असते. त्यामुळे त्यांची आश्रमसेवा नियमित ७ घंटे होते. काकू स्वतःच्या क्षमतेचा आणि देवाने दिलेल्या प्रत्येक क्षणाचा उपयोग केवळ साधनेसाठी करतात.

३. निर्मळ मन

काकू मनाने मोकळ्या आहेत. त्यांच्या निर्मळ मनात कुणाविषयी अपेक्षा किंवा प्रतिक्रिया नाहीत. त्यामुळे त्यांचा सहवास सर्वांनाच हवाहवासा वाटतो. त्यांनी अल्प कालावधीत आश्रमातील सर्वांशी जवळीक केली आहे.

४. प्रेमभाव

अ. त्या सुनेवर मुलीप्रमाणे प्रेम करतात. त्यामुळे तीही त्यांना ‘आई’ म्हणून हक्काने हाक मारते. काकू सकाळी आणि रात्री घरी गेल्यावर सुनेला घरकामात लागेल ते साहाय्य करतात.

आ. काकूंनी दिवाळीत आश्रमातील सर्व साधकांसाठी उकडीचे मोदक करून आणले होते.

इ. आश्रमातील कोणत्याही साधकाला खाऊ, आवश्यक वस्तू इत्यादी गोष्टी हव्या असतील, तर साधक काकूंना हक्काने आणायला सांगतात आणि काकू तितक्याच प्रेमाने आणून देतात.

ई. काकूंनी घरी एखादा पदार्थ बनवला आणि तो एखाद्या साधकाला आवडत असेल, तर त्या आठवणीने त्याच्यासाठी घेऊन येतात.

उ. ‘काकूंच्या प्रेमभावामुळे त्या सतत इतरांचा विचार करतात आणि इतरांसाठी जगतात’, असे जाणवते.

५. व्यष्टी साधनेचे गांभीर्य

काकू नियमित नामजपादी उपाय आणि व्यष्टी साधनेचे प्रयत्न करतात अन् रात्री झोपायच्या आधी आठवणीने दिवसभरातील सेवेचा आणि व्यष्टी साधनेच्या प्रयत्नांचा आढावा उत्तरदायी साधकांना पाठवतात अन् नंतर झोपतात.

६. स्वीकारण्याची वृत्ती

त्या कोणत्याही सेवेला ‘नाही’ म्हणत नाहीत. त्या स्वतःच्या सेवा करून इतरांना सेवेत साहाय्य करतात. सेवा करतांना कितीही पालट झाले किंवा अडचणी आल्या, तरी त्या ते सहजतेने स्वीकारतात आणि तळमळीने अन् चिकाटीने सेवा पूर्ण करतात.

‘गुरुमाऊली, तुम्हीच काकूंचे गुण लक्षात आणून दिले, त्याविषयी तुमच्या चरणी कृतज्ञता ! ‘हे गुण माझ्यात येण्यासाठी माझ्याकडून तळमळीने प्रयत्न करवून घ्या’, अशी तुमच्या चरणी शरणागतभावाने प्रार्थना करते.’

– सौ. राधा रवींद्र साळोखे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१७.११.२०१९)