नगर, २८ जुलै – शिर्डीच्या अर्थकारणाचे चाक थांबल्याने बँकांचे हप्तेही थकले आहेत, त्यामुळे व्यावसायिकांना मालमत्ता जप्तीच्या नोटीस देण्यात येत आहेत. यामुळे निराशेचे वातावरण असून आर्थिक विवंचनेला कंटाळून अनेकांनी स्वत:ची जीवनयात्रा संपवली आहे. शिर्डीला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी साई मंदिर उघडणे, हाच पर्याय आहे. यासाठी आपण महिला आघाडीच्या कार्यकर्त्या आणि स्थानिक शिवसैनिक यांना समवेत घेऊन मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्षा अन् शिर्डीच्या माजी नगराध्यक्षा अनिता जगताप यांनी सांगितले.
(सौजन्य: RNO Right News Online)
जगताप यांनी सांगितले की, साईभक्तांवर अवलंबून असलेले हॉटेल, रेस्टॉरंट, हार, फूले, छायाचित्रे, मूर्तींची दुकाने, ‘टुरिस्ट’ वाहन व्यवसाय आणि यांवर उपजीविका असलेल्या सहस्रो कुटुंबांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन्ही लस घेतलेल्या भाविकांना ‘ऑनलाईन’ पद्धतीने नोंदणीद्वारे संख्या मर्यादित ठेवून आणि कोरोनाच्या नियमांचे पालन करून दर्शन देता येऊ शकेल. यामुळे शिर्डीचा रूतलेला अर्थकारणाचा गाडा हळूहळू पूर्वपदावर येण्याची प्रक्रिया चालू होईल.