‘न भूतो न भविष्यति’ अशा झालेल्या वर्ष २०२० मधील गुरुपौर्णिमेच्या वेळी पुणे येथील साधकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘सद्यःस्थितीत कोरोनामुळे दळणवळण बंदी असल्याने प्रतिवर्षाप्रमाणे गुरुपौर्णिमा सोहळ्यात सहभागी होता येणार का ?’, असे सर्वांना वाटत होते; मात्र अशा परिस्थितीत श्रीविष्णुरूपी कृपाळू गुरुमाऊलींच्या साधकांवर असलेल्या अपार प्रीतीमुळे प्रत्येक साधकाला या वर्षीची गुरुपौर्णिमा साजरी करण्याचा अनुभव घेता आला. वर्ष २०२० मध्ये झालेल्या ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमेचा प्रत्येक साधकाने घरात राहून आनंद अनुभवला. गुरुपौर्णिमेच्या दिवशी पुणे येथील साधकांनी अनुभवलेला गुरुकृपेचा वर्षाव अनुभूतींच्या रूपात येथे देत आहोत. 

सौ. राजश्री खोल्लम

१. वेदमूर्ती वझेगुरुजी यांनी महागणपतीचे आवाहन केल्यावर गणपति सगुण रूपात अवतीर्ण झाल्याचे दिसणे

गुरुपौर्णिमेच्या दिवशी ‘वैकुंठात गुरुपूजन होत आहे’, असे मला जाणवत होते. ‘सर्व साधक तिथे बसून हा भावसोहळा पहात आहेत’, असे मला जाणवले. वझेगुरुजींनी महागणपतीला आवाहन केल्यावर गणपति सगुण रूपात अवतीर्ण झाल्याचे दिसले. ‘गणपति सर्वत्र पहात आहे आणि त्याचे कान हालत आहेत’, असे मला दिसले. ‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ भावपूर्णरित्या करत असलेल्या गुरुपूजनामुळे गणपतीचे आगमन झाले आहे’, असे मला जाणवले. त्या वेळी माझी पुष्कळ भावजागृती झाली. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, म्हणजे साक्षात् श्री महालक्ष्मीदेवी गुरुपूजन करत असून ‘हा अलौकिक भावसोहळा अनुभवायला मिळाला’, त्याविषयी मी गुरुचरणी कोटीश: कृतज्ञता व्यक्त करते.

२. प्रत्येक साधक आणि समाजातील जिज्ञासू यांना घरबसल्या दिव्य दर्शन देणारी अन् साधनेविषयी मार्गदर्शन करणारी कृपाळू गुरुमाऊली

‘प.पू. गुरुदेवांचे ध्वनीचित्र-चकतीच्या माध्यमातून दर्शन होईल’, हे मला समजल्यावर माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही. प्रत्येक साधकावर प्रीती, आनंद आणि चैतन्य यांचा भरभरून वर्षाव करणार्‍या दयाळू गुरुमाऊलीने साधक आणि समाजातील जिज्ञासू यांना घरबसल्या दर्शन दिले अन् साधनेविषयी अमूल्य मार्गदर्शन केले. ‘त्यांचे ते दिव्य रूप मनात किती साठवून घेऊ !’, असे मला वाटत होते. किती ही त्यांची आम्हा लेकरांवरील कृपा आणि प्रीती !

कृतज्ञ आणि शरणागत आम्ही तव चरणी ।

गुरुदेव साक्षात् श्रीमहाविष्णु तुम्ही ।
पृथ्वीवर अवतरलात आम्हा अज्ञ जिवांसाठी ।।

हिंदु राष्ट्र स्थापण्यासाठी ।
आम्हा भवसागरातून पार करण्यासाठी ।। १ ।।

हिंदु धर्माची महानता बिंबवली सर्वांच्या मनी ।
धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची मुहूर्तमेढ रोवली ।

ईश्वरी कृपेस पात्र होण्या ।
धर्माचरणाचा मार्ग दाविला जनांसी ।। २ ।।

आपल्या रूपे वैकुंठ आले भूवरी ।
पवित्र झाली ही अवनी ।
साधक कृतार्थ झाले ।
आपल्या कृपाछत्रछायेखाली येऊनी ।। ३ ।।

कृतज्ञ आणि शरणागत आम्ही तव चरणी ।
अर्पितो ही भाव सुमनांजली आपल्या दिव्य चरणी ।।

– सौ. राजश्री खोल्लम

सौ. सुवर्णा लुगडे

गुरुमाऊलींच्या प्रत्येक हास्यमुद्रेचे मनात जणू चित्र उमटणे आणि ‘ते आपत्काळासाठी संजीवनी पुरवत आहेत’, असे वाटणे

गुरुपौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी गुरुमाऊलींच्या चैतन्यदायी वाणीतून त्यांचे मार्गदर्शन ऐकतांना माझ्या मनातील बुद्धीच्या स्तरावर असणार्‍या सर्व प्रश्नांचे निराकरण झाले. गुरुमाऊलीने साधकांच्या मनावर स्वभावदोष निर्मूलनाचे महत्त्व बिंबवले. त्यांच्या प्रत्येक हास्यमुद्रेचे माझ्या मनात जणू चित्र उमटत होते. गुरुदेव साधनेसाठी भरभरून शिदोरी देत होते आणि मी माझ्यात साठवून ठेवत होते. ‘ते आपत्काळासाठी संजीवनी पुरवत आहेत’, असे मला वाटले.’

 सौ. अर्चना भांगले

गुरुपूजन चालू असतांना ‘प.पू. गुरुदेव माझ्यासमोर आसनावर बसले असून मी त्यांची भावपूर्ण पूजा करत आहे’, असे जाणवणे : एरव्ही मला लवकर उठावेसे वाटत नाही आणि त्रास होतो; परंतु गुरुपौर्णिमेच्या दिवशी मला वातावरण चैतन्यमय जाणवत होते. श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ गुरुपूजन करत असतांना ‘माझ्यासमोर प.पू. गुरुदेव आसनावर बसले असून मी त्यांची भावपूर्ण पूजा करत आहे’, असे जाणवून माझी पुष्कळ भावजागृती झाली. ‘सारी सृष्टीही आनंदी झाली आहे’, असे मला वाटत होते.’

 सौ. सुधीरा नंदकुमार झा

मला गुरुपौर्णिमेच्या दिवशी पुष्कळ आनंद अनुभवता आला. ‘गुरुदेवच सर्वकाही अनुभवायला देत आहेत’, असे मला जाणवत होते. ‘गुरुमाऊली, श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ घरी आले’, असे जाणवल्याने आम्ही धन्य धन्य झालो. ‘मी स्वत:च पूजा आणि मंत्र म्हणत अर्पण करत आहे’, असे मला जाणवले. ‘गुरुमाऊली घरात कायमस्वरूपी वास्तव्याला आली आहे’, असे मला जाणवले. मला गुरुमाऊलीचे मार्गदर्शन ऐकतांना शांत आणि स्थिर वाटत होते. ‘माझे मनमंदिर आणि घर पावन पवित्र झाले’, असे मला अनुभवता आले. (जुलै २०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक