नाशिक येथील सौ. मंजुषा जोशी यांचे निधन झाल्यावर श्री. नीलेश नागरे यांना सूक्ष्मातील जाणवलेली सूत्रे

कै. (सौ.) मंजुषा जोशी

१. सौ. मंजुषा जोशी यांच्या मृत्यूनंतर दिसलेल्या दृश्यात त्यांचा सूक्ष्मदेह स्वतःचा मृत्यू स्वीकारत नसल्याचे जाणवणे आणि त्यांची साधना चांगली असल्याने काही वेळाने सूक्ष्मदेहाने ती गोष्ट स्वीकारणे

‘सौ. मंजुषा जोशी यांचे १७.४.२०२१ या दिवशी निधन झाले. ही बातमी कळल्यावर काही क्षण माझे मन शांत झाले आणि मनात गुरुदेवांप्रती शरणागती निर्माण झाली. त्या वेळी मला पुढील दृश्य दिसले, ‘जोशीकाकूंचा सूक्ष्मदेह काही वेळ स्वतःचा मृत्यू स्वीकारत नव्हता. त्यांचा साधनेचा पाया भरभक्कम असल्याने काही वेळाने त्यांच्या सूक्ष्मदेहाने ती गोष्ट स्वीकारली.

२. सौ. जोशी यांनी प.पू. गुरुदेवांना ‘तुम्ही माझ्या समवेत आहात ना ?’, असे विचारल्यावर एका अदृश्य शक्तीने त्यांना भुवर्लोकातील एका आश्रमामध्ये नेणे आणि तेथे सनातनचे देहत्याग केलेले बरेच संत अन् साधक दिसल्यावर सौ. जोशी यांना आनंद होणे

सौ. जोशी यांनी प.पू. गुरुदेवांना प्रार्थना केली, ‘हे गुरुदेवा, मानवी देह असतांना तुम्ही नेहमीच माझ्याजवळ असायचा. मी नेहमीच तुमची आठवण काढायचे. आता माझ्या मृत्यूनंतर तुम्ही कुठे आहात ? तुम्ही माझ्या समवेत आहात ना ?’ त्यानंतर एक अदृश्य शक्ती त्यांना भुवर्लोकातील एका आश्रमामध्ये घेऊन गेली. त्या ठिकाणी काकूंना सनातनचे देहत्याग केलेले बरेच संत आणि साधक दिसले. त्या सर्वांना पहाताक्षणी काकूंच्या तोंडवळ्यावर एक वेगळ्या प्रकारचा आनंद दिसू लागला.

३. भुवर्लाेकातील एका आजींनी सौ. जोशी यांना सेवेला प्रारंभ करण्याविषयी सांगणे

भुवर्लाेकात सौ. जोशीकाकूंना एक आजी म्हणाल्या, ‘‘तू भूलोकामध्ये असतांना छान सेवा केलीस. तुझा भावसुद्धा छान आहे. आता आपल्याला गुरुदेवांच्या सेवेमध्ये खंड पडू द्यायचा नाही; म्हणून आता भुवर्लोकामध्येही तुला तुझ्या सेवेला प्रारंभ करायचा आहे.’’

४. सौ. जोशी यांच्यामधील गुणांमुळे त्यांनी मिळालेली सेवा स्वीकारून ती करण्यास प्रारंभ करणे

सौ. जोशीकाकूंकडे ‘भुवर्लोकातील भरकटलेल्या जिवांचा सत्संग घेणे आणि त्यांना साधना सांगणे’ ही सेवा देण्यात आली. काकूंमधील ‘प्रेमभाव, नम्रता, स्वीकारण्याची वृत्ती आणि आज्ञापालन’ या गुणांमुळे त्यांनी सेवेला, तसेच नामजपादी उपाय नियमितपणे करायला तात्काळ प्रारंभ केला.

वरील दृश्य दिसल्यावर ‘परात्पर गुरु डॉक्टर साधकांच्या समवेत सदैव आहेत’, याची जाणीव होऊन माझ्याकडून त्यांच्या चरणी पुष्कळ कृतज्ञता व्यक्त झाली.’

– श्री. नीलेश नागरे, गंगापूर रोड, नाशिक. (२०.५.२०२१)

सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला सूक्ष्म-परीक्षण म्हणतात.