प्रेमळ, सर्वांशी जवळीक साधणारे आणि सात्त्विक आचरणामुळे संतांच्या कौतुकाला पात्र ठरलेले चिंचवड (जिल्हा पुणे) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. अविनाश देसाई (वय ७४ वर्षे) !
२०.४.२०२१ या दिवशी चिंचवड (जिल्हा पुणे) येथील अविनाश दिनकर देसाई यांचे निधन झाले. १७.७.२०२१ या दिवशी त्यांचे त्रैमासिक श्राद्ध आहे. त्यानिमित्त ‘त्यांच्या पत्नीला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या मृत्यूपूर्वी घडलेल्या अकल्पित घटना’ पुढे दिल्या आहेत.
‘माझे यजमान माझ्या प्रापंचिक आणि आध्यात्मिक प्रवासातील आधारस्तंभ होते. त्यांचे आचरण आदर्श होते. ‘त्यांच्याविषयी नेमके काय लिहावे ?’, हे मला उमजत नाही. ज्याप्रमाणे हिर्याला अनेक पैलू असतात, त्याप्रमाणे माझ्या यजमानांमध्येही अनेक आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये होती.
१. माझ्या यजमानांचा स्वभाव शांत होता. ते कधीच अधिकारवाणीने बोलत नसत.
२. इतरांचा विचार करणे
ते वयाच्या ७१ व्या वर्षापर्यंत आस्थापनात चाकरीसाठी जात होते. त्यांचा हेतू धनार्जन करण्याचा नव्हता. त्यांच्यातील कौशल्याचा आस्थापनाला लाभ होत होता, तरी त्यांनी कुठल्याच गोष्टींचे श्रेय स्वतःकडे घेतले नाही. यजमानांच्या प्रेमळ स्वभावामुळे तेथील काही कामगारांना हुरूप येत असे. ते कामगार म्हणायचे, ‘‘साहेब, तुम्ही ज्या दिवशी निवृत्त व्हाल, त्या दिवशी आम्ही आमचे त्यागपत्र देऊ.’’ ‘अल्प शिक्षण असलेल्या तरुण कामगारांनी हातची नोकरी सोडल्यास त्यांना आर्थिक अडचणी येऊ नयेत आणि त्यांच्या मुलाबाळांचे हाल होऊ नयेत’, यासाठी यजमानांना कार्यालयीन निवृत्तीचा विचार अनेक वेळा पुढे ढकलावा लागला.
३. प्रेमळ स्वभावामुळे यजमानांची आस्थापनातील सर्वांशी जवळीक असणे आणि त्यांनी कामगारांना साधनेविषयी सांगणे
यजमानांची कामगारांशी जवळीक असल्यामुळे यजमान त्यांना साधनेविषयी सांगायचे. यजमान तेथे सनातन पंचांग आणि सात्त्विक उत्पादने यांचे वितरण करून त्यांच्याकडून गुरुपौर्णिमेसाठी अर्पण घ्यायचे. ईश्वराने त्यांच्याकडून आस्थापनामध्येही समष्टी सेवा आणि साधना करवून घेतली.
४. कुणाकडूनही अपेक्षा न करणे
ते नेहमी म्हणायचे, ‘‘अपेक्षाभंगाचे दुःख पुष्कळ मोठे असते. त्यामुळे कधीही अपेक्षा करू नये.’’ ते त्यानुसार वागायचेही. त्यांनी कधीच कुणाकडूनही कुठलीही अपेक्षा केली नाही. त्यांनी सांगितलेले एखादे सूत्र इतरांनी अमान्य केल्यास त्याविषयी ते पुन्हा काहीच बोलत नसत.
५. ते स्वभावाने भोळे होते. त्यांनी कुणावरही स्वतःची मते लादली नाहीत.
६. पत्नीला साधनेत साहाय्य करणे
मला स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवण्यात यजमानांचे पुष्कळ साहाय्य मिळायचे. माझ्या मनात भूतकाळातील प्रसंगाचा विचार आल्यास ते मला ‘घडून गेलेल्या घटनांविषयी शोक करू नये’, असे सांगायचे.
७. ‘माऊली बाबा’ नावाच्या संतांकडे गेल्यावर त्यांनी यजमानांना त्यांच्या जवळ बसवणे, त्यांनी उपस्थित लोकांना यजमानांविषयी ‘हे संत माणूस आहेत’, असे सांगणे आणि यजमानांची आपुलकीने विचारपूस करणे
वर्ष २००१ – २००२ या काळात आम्ही पुण्याहून नगर येथे दुचाकीने जात होतो. त्या वेळी ‘सुपा’ या गावाजवळून जातांना मी यजमानांना सहज म्हणाले, ‘‘या गावात ‘माऊली बाबा’ नावाचे विख्यात संत वास्तव्याला आहेत. ते लोकांच्या व्याधी बर्या करतात. त्यांना भेटायला दूरवरून लोक येतात’, असे मी ऐकले आहे.’’ त्यानंतर यजमानांनी लगेच दुचाकी गावाकडे वळवली.
आम्ही माऊली बाबांच्या आश्रमात गेलो. तेथे पुष्कळ लोक उपचार करवून घेण्यासाठी आले होते. आम्हाला घरी पोचायला विलंब होत असल्याने मी निघण्याची घाई करत होते. त्या वेळी माऊली बाबांनी उपस्थितांना सांगितले, ‘‘हे संत माणूस आहेत. यांना माझ्या जवळ थोडा वेळ बसू द्या.’’ त्यानंतर त्यांनी त्यांच्या शिष्यांना आम्हा दोघांसाठी चहा करून आणायला सांगितला आणि यजमानांची आपुलकीने विचारपूस केली. सर्वांनाच माऊली बाबांच्या या वागण्याचे आश्चर्य वाटले; कारण ते सर्वांशी एका विशिष्ट अंतरावरूनच संवाद साधायचे. त्यांनी कुणालाही त्यांच्या जवळ बसवले नव्हते. मी घाई करत असल्याने माऊली बाबा म्हणाले, ‘‘घाई करू नका. तुम्ही थांबला नाहीत, तर तुमची दुचाकी ‘पंक्चर’ होईल. यांना माझ्या जवळ बसू द्या.’’ त्यानंतर अर्ध्या घंट्याने त्यांनी आम्हाला घरी जायला सांगितले.
८. नगर येथे रहायला गेल्यानंतर यजमानांविषयी जाणवलेली सूत्रे
८ अ. वर्ष २०२० च्या दिवाळीपासून आम्ही नगर येथे स्थलांतर केल्यावर ते नियमितपणे अग्निहोत्र करायचे.
८ आ. ‘वातावरणाची शुद्धी व्हावी’, यासाठी प्रतिदिन सायंकाळी गोवर्या, कापूर आणि कडूनिंब एकत्रित करून त्याची धुरी करण्यासाठी यजमानांनी तरुणांचे प्रबोधन करणे : नगर येथे ज्या ठिकाणी आम्ही रहात होतो, तेथे वसाहतीच्या मध्यभागी गणपतीचे मंदिर आहे. तिथे संध्याकाळी काही तरुण मुले एकत्र येत असत. त्या वेळी ‘कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये आणि सभोवतालचा परिसर, तसेच वातावरण यांची शुद्धी व्हावी’, या हेतूने प्रतिदिन सायंकाळी गोवर्या, कापूर अन् कडूनिंब एकत्र करून त्याची धुरी करण्यासाठी यजमानांनी तरुणांचे प्रबोधन केले. मुलांनाही ते पटल्यामुळे त्यांनी त्वरित ते आचरणात आणले.
८ इ. यजमानांचे मन झाडे आणि फुले यांमध्ये अधिक रमत होते. प्रतिदिन पक्ष्यांना दाणा-पाणी ठेवल्यानंतरच ते दुपारचे जेवण करायचे.
९. यजमानांच्या मृत्यूपूर्वी घडलेल्या अकल्पित घटना
९ अ. मंगळसूत्र वाढवल्याचे लक्षात येणे, यजमानांना याविषयी सांगितल्यावर त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करणे, परात्पर गुरु डॉ. आठवले यांना प्रार्थना केल्यावर मंगळसूत्राची वाटी अन् मणी सापडणे आणि यजमानांनी त्याविषयी कोणतीही प्रतिक्रिया न देणे : ४.४.२०२१ या दिवशी माझे मंगळसूत्र वाढवले. ‘मंगळसूत्राची एक वाटी आणि एक मणी निखळून पडला आहे’, हे दुसर्या दिवशी माझ्या लक्षात आले. ‘मंगळसूत्र मात्र माझ्या गळ्यातच होते’, याचे मला आश्चर्य वाटले. त्या वेळी माझे चित्त विचलित झाल्याने मी यजमानांना त्याविषयी सांगितले; पण त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. काही विशेष घडले नसल्याप्रमाणे त्यांनी त्यांचे हातातील काम चालूच ठेवले. मी सगळीकडे मंगळसूत्र शोधले; मात्र ते मला सापडले नाही. मी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आत्मनिवेदन करून ‘वाटी आणि मणी सापडू द्या’, अशी प्रार्थना केली. त्यानंतर मला मणी आणि मंगळसूत्राची वाटी न्हाणीघराच्या कोपर्यात सापडले. मी ते उचलले; पण त्याविषयी यजमानांना सांगितले नाही.
दळणवळण बंदी असल्यामुळे सोनाराची दुकाने बंद होती. त्यामुळे मी ती वाटी आणि मणी पुन्हा मंगळसूत्रात ओवले. यजमान त्यांच्या स्वभावाच्या उलट वागत असलेले पाहून मला आश्चर्य वाटत होते; कारण अन्य वेळी त्यांनी अशा प्रसंगात मला मणी आणि वाटी शोधायला साहाय्य केले असते. एवढेच नव्हे, तर ‘मी मंगळसूत्र ओवत आहे’, हे पाहून त्यांनी मला त्याविषयी उत्साहाने ‘सापडले का ? कुठे होते ?’, अशी विचारणा केली असती आणि मला ते व्यवस्थित तारेत गुंफून दिले असते; मात्र त्यांनी त्या घटनेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले अन् कुठलीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.
९ आ. पायाच्या बोटांना सूज आल्याने जोडवी काढून ठेवावी लागणे : वर्ष २०२१ मधील मार्च आणि एप्रिल या मासांमध्ये माझ्या पायाच्या बोटांना अधूनमधून सूज येत होती. त्यामुळे बोटात जोडवी रुतून व्रण होऊ नये; म्हणून मला त्या त्या वेळी जोडवी काढून ठेवावी लागत होती. आमच्या लग्नानंतर असे घडण्याची ही पहिलीच वेळ होती.
१०. यजमान मृत्यूशय्येवर असतांनाही त्यांनी कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आणि नियमांचा सहजतेने स्वीकार केला.
११. कृतज्ञता आणि प्रार्थना
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मला गत १७ वर्षांपासून सातत्याने साधना करण्याचे बळ, प्रोत्साहन आणि आध्यात्मिक दिशा मिळाली. त्यांनी आम्हाला कठीण प्रसंगांमधून तारले आणि अनुभूती दिल्या. त्यांनी आमची आपत्काळातही साधना करवून घेतली’, याविषयी मी श्री गुरुमाऊलीच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते. माझ्या यजमानांचा जीवनप्रवास तीव्र साधनेसमानच होता. ‘त्यांच्या पुढील प्रवासात त्यांची उत्तरोत्तर आध्यात्मिक उन्नती करवून घ्यावी’, ही परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी प्रार्थना आहे.’
– श्रीमती अनघा देसाई (पत्नी), चिंचवड, पुणे. (२२.६.२०२१)