रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात साधना करणारी साधिका कु. अस्मिता लोहार (वय १७ वर्षे) हिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. अस्मिता लोहार एक आहे !

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना सिद्ध केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

आषाढ शुक्ल पक्ष तृतीया (१३.७.२०२१) या दिवशी कु. अस्मिता लोहार (वय १७ वर्षे) हिचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने तिची आई सौ. रेखा लोहार आणि साधिका सौ. अरुणा पोवार यांना तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढेे दिली आहेत.

कु. अस्मिता लोहार

कु. अस्मिता लोहार हिला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

सौ. रेखा लोहार (कु. अस्मिताची आई), कागल, कोल्हापूर.

सौ. रेखा लोहार

१. शांत स्वभाव

‘वर्ष २००६ च्या गुरुपौर्णिमेनंतर आम्ही सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ केला. आम्ही अस्मिताला सत्संगाला घेऊन जात होतो. तेव्हा ती सत्संगात कोणताही त्रास द्यायची नाही. रात्री कितीही वेळ झाला, तरी काही न बोलता शांत बसायची.

२. व्यवस्थितपणा

अस्मिता लहानपणापासूनच नीटनेटकी रहाते. तिचे सर्व साहित्य ती व्यवस्थित ठेवते. तिचे अक्षरही सुंदर आहे.

३. कुशाग्र बुद्धीमत्ता

लहानपणापासूनच ती अभ्यासामध्ये हुशार आहे. शाळेत तिला ९० टक्के गुण मिळत असत. इयत्ता तिसरीमध्ये असतांना ‘भारतीय प्रज्ञाशोध’ या परीक्षेमध्ये तिला ३०० पैकी २६८ गुण मिळाले असून तिने जिल्ह्यामध्ये आठवा क्रमांक मिळवला होता.

४. धर्माचरण करणे

शाळेत जातांना दोन वेण्या घालण्याचे आणि कुंकू लावण्याचे महत्त्व समजल्यामुळे ती प्रतिदिन कुंकू लावून अन् दोन वेण्या घालूनच शाळेत जात होती.

५. सत्सेवेची आवड

नामजप करणे, तिच्या वडिलांच्या समवेत दैनिक ‘सनातन प्रभात’ वितरणाला जाणे, ग्रंथप्रदर्शनाच्या ठिकाणी जाऊन सेवा करणे इत्यादी सेवा ती करत होती. शाळेत असतांनाही ती तिच्या शिक्षकांना आणि मित्र-मैत्रिणींना सात्त्विक उत्पादनांचे महत्त्व सांगायची.

६. साधनेची आवड

मे २०१७ मध्ये रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमामध्ये तिला ८ दिवस सेवेसाठी जाण्याची संधी मिळाली होती. नंतर एप्रिल २०१८ मध्ये ती रामनाथी आश्रमात साधनेसाठी गेली. त्यानंतर ती ‘मायेतून मुक्त झाली आहे’, असे मला वाटते.

अस्मितामध्ये झोकून देऊन सेवा करणे, प्रेमभाव, इतरांमध्ये त्वरित मिसळणे, इतरांचा विचार करणे इत्यादी गुण आहेत.

‘हे गुरुदेवा, हे सर्व लिखाण तुम्हीच माझ्याकडून करवून घेतले’, यासाठी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

(९.७.२०२१)

सौ. अरुणा पोवार, कोल्हापूर

सौ. अरुणा पोवार

१. प्रेमभाव

‘कु. अस्मितामध्ये पुष्कळ प्रेमभाव आहे. ती तिच्यापेक्षा वयाने मोठ्या असणार्‍या आणि वयाने लहान असलेल्या सर्वांशी पुष्कळ प्रेमाने वागते.

२. नेतृत्व

वयाने लहान असूनही ती तिच्या सेवेचे दायित्व चांगल्या प्रकारे सांभाळते. ते पाहून मला आश्‍चर्य वाटते. तिला पाहून ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी घडवलेली हिंदु राष्ट्र चालवणारी हिच ती मुले आहेत’, याची मला जाणीव होऊन मला तिचे कौतुक वाटते आणि लहान वयात साधना करणार्‍या या मुलांविषयी आदर वाटतो.

३. तत्त्वनिष्ठ

मी सध्या रामनाथी आश्रमात ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन’, या प्रक्रियेसाठी आले आहे. एकदा एका प्रसंगात तिने मला एक कृती कार्यपद्धतीप्रमाणे करायला सांगितली. खरंतर तिला माझी अडचण ठाऊक नव्हती. त्या वेळी ती कृती करतांना मला थोडा त्रास झाला; पण ‘मी शिस्त पाळली पाहिजे’, असे मला वाटले आणि मी झोपायला गेले. तिला माझ्या त्रासाविषयी समजल्यावर, मी झोपले होते तिथे येऊन तिने प्रेमाने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि माझी ३ – ४ वेळा क्षमा मागितली. नंतर तिने मला कार्यपद्धत समजावून सांगितली. दुसर्‍या दिवशी सकाळी ती मला भेटली. त्या वेळी घडलेल्या प्रसंगाची तिला खंत वाटत होती.

‘हे गुरुमाऊली, मला कु. अस्मिताच्या गुणांतून शिकता येऊदे, तसेच मला तुमच्यावरील भाव आणि श्रद्धा वाढवता येऊदे’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे. ‘आपणच मला या साधकांचा सहवास दिलात’, यासाठी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

(२७.६.२०२१)

यासमवेतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यू ट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.