प्रत्येक हिंदु स्त्री जिजाऊंप्रमाणे शौर्यशाली आणि धर्माचरणी बनल्यास घरोघरी शिवबा जन्माला येतील ! – सुमित सागवेकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

सातारा येथे राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त ‘शिवकन्या संघटने’साठी शौर्यजागृती व्याख्यानाचे आयोजन !

श्री. सुमित सागवेकर

सातारा, १२ जुलै (वार्ता.) – राजमाता जिजाऊ यांनी शौर्य म्हणजे काय, हे छत्रपती शिवरायांच्या रूपात आपल्या समोर ठेवले. शौर्य हे नाव उच्चारताच आपल्या डोळ्यांसमोर राजमाता जिजाऊ, झाशीची राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर, स्वातंत्र्यसेनानी प्रीतीलता वड्डेदार यांसारख्या वीरांगना येतात. त्यांच्या शौर्यामध्ये शक्ती, भक्ती आणि युक्ती यांचा संगम आहे. राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना लहानपणापासून राष्ट्रभक्तीचे बाळकडू दिले. राज्य चालवण्याचे प्रत्यक्ष धडे दिले. प्रत्येक हिंदु स्त्री जिजाऊंप्रमाणे शौर्यशाली आणि धर्माचरणी बनली, तर घरोघरी शिवबा जन्माला येतील, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे युवा संघटक श्री. सुमित सागवेकर यांनी केले. सातारा येथे राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त ‘शिवकन्या संघटने’साठी शौर्यजागृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमात शौर्य जागवणारी स्वरक्षणाची ‘ऑनलाईन’ प्रात्यक्षिके व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्यात आली. व्याख्यानाचे सूत्रसंचालन कु. प्रियांका जाधव यांनी, तर व्याख्यानाचा उद्देश कु. नेहा कदम यांनी सांगितला.

विशेष

व्याख्यानामध्ये दाखवलेली ‘ऑनलाईन’ स्वरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके पाहून कार्यक्रमात सहभागी युवतींनी शौर्यवर्ग चालू करण्याची मागणी केली. त्यानुसार युवतींसाठी ७ दिवसांच्या शौर्यवर्गाचे नियोजन करण्यात आले.