सांसारिक कर्तव्ये आणि साधना यांची योग्य सांगड घालणारे अन् शेवटच्या क्षणापर्यंत भगवंताच्या नामस्मरणात रहाणारे केसरी (तालुका सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. श्रीपाद आत्माराम सोमण (वय ७४ वर्षे) !
१५.६.२०२१ या दिवशी केसरी (तालुका सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग) येथील श्रीपाद आत्माराम सोमण (वय ७४ वर्षे) यांचे निधन झाले. ११.७.२०२१ या दिवशी त्यांचे पहिले मासिक श्राद्ध झाले. त्यानिमित्त त्यांचे कुटुंबीय आणि साधक यांना त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
श्रीमती विद्या सोमण (पत्नी)
१. माहेरी भक्तीमार्गाने साधना करण्याचे बाळकडू मिळणे आणि त्यामुळे सर्व धार्मिक कृत्ये भावपूर्ण करणे
‘वर्ष १९७५ मध्ये आमचा विवाह झाला. तेव्हापासूनच सांसारिक दायित्वे सांभाळतांना त्यांना आध्यात्मिक कृतीची जोड देत आमच्या संसाराला आरंभ झाला. माहेरी मला माझ्या आईकडून भक्तीमार्गाने साधना करण्याचे बाळकडू मिळाले होते. त्यामुळे मी सर्व धार्मिक कृत्ये मनापासून आणि भावपूर्ण करत असे.
२. यजमानांमुळे प.पू. गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) दर्शन होऊन साधनेला आरंभ होणे, साधना केल्याने स्वतःत सकारात्मक पालट होणे आणि त्यामुळे यजमानांच्या निधनासारख्या कठीण प्रसंगातही गुरुकृपेने स्थिर रहाता येणे
वर्ष १९९५ मध्ये मला माझ्या यजमानांमुळे प.पू. गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) प्रत्यक्ष दर्शन झाले. त्यानंतर माझ्याकडून साधनेत सांगितलेल्या कृती हळूहळू होऊ लागल्या. आता माझ्यामध्ये ‘व्यष्टी साधनेचा आढावा देतांना चुका स्वीकारणे’ आणि ‘परिस्थिती स्वीकारणे’, असे पालट सहजपणे घडू लागले आहेत. आता मला ‘सतत नामस्मरणात रहावे’, असे वाटू लागले आहे. यजमानांच्या निधनासारख्या कठीण प्रसंगातही मी गुरुदेवांच्या कृपेमुळेच स्थिर राहून दुःख सहन करू शकले. गुरुदेव, मी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
सौ. साधना लक्ष्मण जोशी (मोठी मुलगी), वाळपई, गोवा.
१. परात्पर गुरु डॉ. आठवले आणि सद्गुरु साटम महाराज यांचे शिष्य असलेले आजोबा यांनी सांगितलेल्या साधनेतील साम्य पाहून वडिलांनी सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ करणे
‘माझ्या आजोबांकडून वडिलांना लहानपणीच अध्यात्माचा वारसा मिळाला. आमचे आजोबा हे सद्गुरु साटम महाराज (दाणोली, तालुका सावंतवाडी) यांचे शिष्य होते. ‘परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांनी सांगितलेली साधना आणि आजोबा सांगत असलेली उपासना’ यांतले साम्य पाहून वडिलांनी सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधनेला आरंभ केला.
२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी भेट झाल्यावर वडिलांच्या साधनेला गती मिळून त्यांनी अनेक प्रकारच्या सेवा करणे
वडिलांची गुरुमाऊलीशी प्रथम भेट आरोंदा (तालुका सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग) येथे झाली. त्यानंतर त्यांच्या साधनेला गती मिळाली. ‘सत्संग आणि बालसंस्कारवर्ग घेणे, विज्ञापने गोळा करणे, सार्वजनिक (जाहीर) सभांचा प्रसार करणे’, अशा अनेक सेवा त्यांनी मनापासून केल्या. ते आरोंदा येथे कामानिमित्त रहात असल्याने त्यांनी आरोंदासह सिंधुदुर्ग आणि जवळ असलेले गोवा राज्य येथेही सेवा केली. सेवानिवृत्त झाल्यावर त्यांनी ‘केसरी’ येथे घर बांधले. ‘ते घर, म्हणजे गुरुदेवांचा आश्रमच आहे’, असा त्यांचा भाव होता. केसरी येथे रहायला आल्यावर त्यांनी ‘गावातील तरुण मुलांना एकत्रित करणे, त्यांचा सत्संग घेणे, त्यांना कुडाळ येथील सनातनचे सेवाकेंद्र दाखवणे, सेवाकेंद्रातील सेवांमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांना साहाय्य करणे’ इत्यादी सेवा केल्या. ‘समोरील व्यक्तीला साधना कशी सांगता येईल आणि ती साधक कशी बनेल ?’, अशी त्यांना तीव्र तळमळ असायची. गुरुकार्य आणि सर्व साधक यांच्यावर त्यांनी पुष्कळ प्रेम केले.
३. त्यांना प्रत्येक वस्तूचा विनियोग अत्यंत काटकसरीने केलेला आवडायचा. ते आम्हाला नेहमी ‘श्री गुरूंनी आपल्याला काय शिकवण दिली आहे ?’, याची आठवण करून द्यायचे.
४. परिस्थिती स्वीकारणे
त्यांना ‘हृदयविकार, मधुमेह आणि उच्च रक्तदाब’ या व्याधी होत्या. ते नामस्मरण करून मगच औषधे घेत असत. व्याधींना न घाबरता देवावर पूर्ण श्रद्धा ठेवून त्यांनी परिस्थिती स्वीकारली.
५. निधनापूर्वी
५ अ. प.पू. गुरुदेवांवरील अपार श्रद्धेमुळे वडिलांनी आजारपणातील शेवटचे ४ दिवस अगदी शांतपणे भगवंताचे नाम घेत घालवले.
५ आ. स्वतःच्या अंतकाळाची जाणीव होणे : त्यांनी गोमातेची सेवा भावपूर्ण केली. त्यांनी घरी गायी पाळल्या आहेत. त्यांच्या निधनाच्या आदल्या दिवशी त्यांनी गायी सांभाळणार्या सेविकेला ‘आज गायी रानात चरवून आण. उद्या असे सांगायला मी नसेन’, असे सांगितले. यावरून ‘त्यांना त्यांच्या अंतकाळाची जाणीव झाली होती’, असे आम्हाला जाणवले.
६. वडिलांच्या निधनाच्या दुसर्या दिवशी त्यांचा अंत्यविधी झालेल्या ठिकाणी घरातील एका गायीने पूर्ण प्रदक्षिणा घातली.
‘प.पू. गुरुमाऊलीच्या कृपेने मला गोव्याहून सिंधुदुर्ग येथे येतांनाही कुठलीही अडचण आली नाही. मी वडिलांचे शेवटचे दर्शन घेऊ शकले’, यासाठी गुरुमाऊलींच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
श्री. योगेश्वर श्रीपाद सोमण (लहान मुलगा)
१. स्वतःच्या कृतीतून शिकवणे
१ अ. संसारातील दायित्व आणि सेवा यांचे सुव्यवस्थित नियोजन करणे : ‘माझे वडील त्यांची कचेरीतील कामे पूर्ण झाल्यावर शेती आणि बाग यांतील कामे करायचे. त्यांनी संसारातील दायित्व सांभाळतांना आणि सेवा करतांना गुरुदेवांनी सांगितल्याप्रमाणे स्वतःला नियोजनाची सवय लावून घेतली होती. त्यांच्यामुळेच आम्हालाही नियोजनाची सवय लागली.
१ आ. इतरांशी जवळीक करणे : ते कुठेही जातांना मला समवेत घेऊन जात असत. ‘समाजातील लोकांशी कसे वागावे ? त्यांच्याशी जवळीक कशी करावी ?’, हे त्यांच्या वागण्यातून मला समजत असे आणि त्यासाठी ते मला मार्गदर्शनही करत असत.
१ इ. इतरांना साहाय्य करणे
अ. ते प्रत्येकाला साहाय्य करत असत. ते स्वतःकडे असलेल्या वस्तू समोरच्या व्यक्तीच्या आवश्यकतेनुसार तिला देत असत.
आ. ते शेती आणि बाग यांतील कामे कामगारांकडून हसत-खेळत करवून घ्यायचे. ते कामगारांच्या अडचणी समजून घ्यायचे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करून साहाय्यही करायचे.
यांतून मला त्याग करण्याची आणि इतरांना साहाय्य करण्याची शिकवण मिळाली.
२. गुरुदेवांनी शिकवलेली साधना वडिलांनी त्यांच्यातील ‘आज्ञापालन’ या गुणामुळे आत्मसात केली होती.
३. ‘श्रीकृष्ण’ आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हे नामजप करून त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
‘त्यांना गुरुदेवांच्या आशीर्वादाने सद्गती मिळावी’, अशी गुरुचरणी भावपूर्ण प्रार्थना आहे. गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’
सौ. ललिता योगेश्वर सोमण (सून)
१. विनोदी स्वभाव
अ. ‘माझे लग्न डिसेंबर २००८ मध्ये झाले. तेव्हा माझ्या सासरच्या घरी माझे सर्वांत पटकन सूर जुळले, ते माझे सासरे श्रीपाद आत्माराम सोमण यांच्याशी ! मी त्यांना ‘बाबा’ म्हणत असे. त्यांचा स्वभाव फार मिस्कील होता. माझी काही चूक झाली, तर ते मला अत्यंत शांतपणे आणि मिस्कीलपणे समजावून सांगत असत.
आ. त्यांचा स्वभाव विनोदी होता. त्यामुळे अतिशय रागीट व्यक्तीही त्यांच्या संपर्कात आल्यावर कधी शांत होऊन जायची, ते त्या व्यक्तीलाही समजत नसे.
२. स्वावलंबी
त्यांना शारीरिक त्रास होत असला, तरीही स्वतःचे काम स्वतः करण्याकडे त्यांचा कल असायचा. मी थोडेसे साहाय्य केले, तरी त्यांना फार कृतज्ञता वाटायची.
३. नातू रुग्णाईत असतांना सुनेला साहाय्य करणे आणि तिला मानसिक आधार देणे
माझा लहान मुलगा रुग्णाईत असतांना बाबांनी मला पुष्कळ मानसिक आधार दिला. त्यांची शारीरिक क्षमता नसतांनाही ते माझ्या समवेत रुग्णालयात एक दिवस राहिले होते. त्या वेळी त्यांनी मला मानसिक आधार दिला आणि माझ्या मुलासाठी नामजपादी उपायही केले.
४. आमच्या घरी साधक आल्यावर त्यांना अत्यंत आनंद होत असे.
५. सासर्यांच्या खोलीतील प.पू. गुरुदेवांचे छायाचित्र सजीव असल्याचे जाणवणे
त्यांची प.पू. गुरुदेवांवर भक्ती आणि श्रद्धा होती. त्यांच्या खोलीत असलेली प.पू. गुरुदेवांची प्रतिमा कुठूनही पाहिली, तरी ‘गुरुदेव आपल्याकडे बघून हसत आहेत’, असे दिसत असल्याचे त्यांनी त्यांच्या निधनापूर्वी ५ – ६ घंटे आम्हाला सांगितले.
६. त्यांना अनेक शारीरिक व्याधी असतांनाही ते नेहमी आनंदी रहाण्याचा प्रयत्न करायचे.
७. त्यांच्या शेवटच्या आजारपणात त्यांना अत्यल्प शारीरिक त्रास झाला. गुरुदेवांवरील श्रद्धा आणि भक्ती यांमुळे त्यांना आंतरिक बळ मिळाले.
‘त्यांची पुढील प्रगती लवकरात लवकर व्हावी’, अशी श्रीकृष्ण आणि गुरुमाऊली यांच्या चरणी प्रार्थना !’
कु. वैष्णवी योगेश्वर सोमण (नात (वय ११वर्षे), आध्यात्मिक पातळी ६१ टक्के)
१. नेहमी आनंदी, हसतमुख आणि टवटवीत दिसणारे आजोबा !
‘माझे आजोबा म्हणजे आनंदी व्यक्तीमत्त्व ! मी त्यांना लाडाने ‘आबा’ म्हणायचे. त्यांना कितीही शारीरिक त्रास होत असला, तरी ते कुणालाही सांगत नसत. त्यांचा तोंडवळा नेहमी हसरा, टवटवीत आणि तेजस्वी दिसायचा.
२. नातवांवर साधनेचे संस्कार करणे
आम्ही (मी आणि माझा लहान भाऊ) संध्याकाळी स्तोत्रे आणि नामजप म्हणायला बसलो की, आबाही लगेच आमच्या समवेत स्तोत्रे अन् नामजप म्हणू लागायचे. ते मला ‘नामजपाचे महत्त्व काय आहे ? तो भावपूर्ण कसा करायचा ?’, हे समजावून सांगायचे. ‘साधना कशी करायची ?’, याविषयी मार्गदर्शन करतांना ते त्यांना आलेल्या अनुभूती मला सांगायचे.
३. कधी कधी मला त्यांच्यामध्ये प.पू. गुरुदेवांचे दर्शन व्हायचे.
असे आजोबा मिळायला पुण्य लागते. ‘मला असे आजोबा मिळाले’, यांसाठी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
श्री. अनिल ल. कोरगावकर (साधक), माडखोल, जिल्हा सिंधुदुर्ग
१. उतारवयातही उत्साहाने सेवारत रहाणारे सोमणकाका !
‘मला सोमणकाकांच्या समवेत अर्पण गोळा करण्याची सेवा करण्याची संधी लाभली. त्यांच्या समवेत ‘अर्पण गोळा करणे किंवा ग्रंथप्रदर्शन लावणे’ यांसारख्या सेवा करतांना मला पुष्कळ आनंद मिळायचा. त्यांना असलेल्या व्याधींविषयी त्यांचे कधीही गार्हाणे नसायचे. त्यांचा या वयातील सेवेचा उत्साह आम्हाला लाजवणारा होता.
२. त्यांचा ‘प.पू. गुरुदेव’ असा जप सतत चालू असायचा.
३. काकांचे नाव डोळ्यांसमोर आले, तरी माझ्या मनाला शांतता जाणवते.’