पंढरपर (जिल्हा सोलापूर) – श्री विठ्ठल मंदिरातील कान्होपात्रा समाधी शेजारी दगडी भिंतीतून एक पुरातन तारातीचे झाड उगवले होते. या झाडाला कान्होपात्राचे झाड, असे नाव भाविकांनी दिले होते. पुरातन असलेल्या या झाडाला हात लावून त्याची पाने घेतल्याने आपली वारी पूर्ण होते, असे वारकरी भाविकांची भावना असते. दर्शन मंडपातून विठ्ठल मंदिरात उतरण्याच्या मार्गावरच हे झाड आहे. हे पुरातन झाड वठल्याने त्या जागी नवीन कान्होपात्राचे झाड लावण्याची सिद्धता मंदिर समितीने केली असून आषाढी एकादशीला हे झाड कान्होपात्राच्या समाधी समोर लावण्यासाठी समितीने कट्टा सिद्ध करून घेतला असून याठिकाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, त्यांच्या पत्नी सौ. रश्मी ठाकरे आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते हे रोपटे लावून कान्होपात्राची आठवण चिरंतर ठेवण्यात येणार आहे.
सौजन्य : Zee 24 Taas
मंगळवेढा (तालुका पंढरपूर) येथील शामा या गणिकेची मुलगी कान्होपात्रा ही रूपवान असल्याने तिला पुष्कळ अडचणींना सामोरे जावे लागले होते; मात्र कान्होपात्रा ही श्री विठ्ठलाची निस्सीम भक्त होती. एकदा तिला अटक करण्यासाठी बादशहाचे सैनिक विठ्ठल मंदिरात आल्यावर तिने देवाच्या चरणांवर प्राण सोडल्याने कान्होपात्रा या गणिकेची समाधीही श्री विठ्ठल मंदिरात बांधण्यात आली आहे.