कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या कालावधीत राज्याच्या  महसुलात निम्म्याने घट ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

पणजी, ९ जुलै (वार्ता.) – राज्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या कालावधीत राज्याचा महसूल निम्म्याने घटला, तर कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या कालावधीत राज्याच्या महसुलात १० टक्के घट झाली होती, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. आल्तिनो, पणजी येथील १९ कोटी रुपये खर्चून उभारलेल्या ‘गोवा राज्य कर भवन’च्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत बोलत होते.

ते पुढे म्हणाले, ‘‘वर्ष २०१६ मध्ये ‘वस्तू आणि सेवा कर’ (जी.एस्.टी.) भरणार्‍यांची संख्या २८ सहस्र होती आणि आता ही संख्या ४३ सहस्र झाली आहे. कर चुकवणार्‍यांवर शासन कठोर कारवाई करणार आहे. आल्तिनो येथे नवीन निवडणूक कार्यालय आणि दूरसंचार विभागाचे कार्यालय उभारण्याचा प्रस्ताव आहे. गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाला आल्तिनो विभागाचा विकास करण्यासंबंधी योजना आखण्याची सूचना करण्यात आली आहे.’’

‘वस्तू आणि सेवा कर’ चुकवणार्‍यांवर कारवाई करणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

‘वस्तू आणि सेवा कर’ (जी.एस्.टी.) चुकवणार्‍यांवर कारवाई करणार असल्याची चेतावणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. विशेष म्हणजे राज्यशासनाने वेर्णा औद्योगिक वसाहतीत ‘जी.एस्.टी.’ कर चुकवल्याने २ व्यावसायिकांवर ८ जुलै या दिवशी कारवाई केली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही चेतावणी दिली.

वेर्णा येथील ‘मुख्तार ऑटोमोबाईल’ नावाच्या आस्थापनाचे दोन्ही संचालक मुख्तार शेख आणि महेश जेक्स यांच्यावर ‘गोवा वस्तू आणि सेवा कर कायदा २०१७’च्या कलम १२२ (१)(सी) आणि १२२ (१) (डी) अंतर्गत ८ जुलै या दिवशी उशिरा कारवाई करण्यात आली. ही कर चुकवेगिरी २० कोटी ९६ लक्ष रुपयांच्या घरात आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘अनेक ‘जी.एस्.टी.’ थकबाकीदार कर भरण्यामध्ये शिथिलता मिळवण्यासाठी किंवा कारवाई टाळण्यासाठी राजकीय नेत्यांकडे जात असतात. असे करणे आता लोकांनी टाळले पाहिजे. सध्या महामारीच्या स्थितीत सरकारने सर्व विभागांना विविध कर आणि शुल्क भरण्यासाठी पुरेशी शिथिलता दिली आहे. यामुळे सरकारचा महसूल घटला आहे. सरकार नेहमी सवलत देत राहू शकणार नाही.’’