थोडक्यात पण महत्वाचे : २७ मे या दिवशी इयत्ता १० वीचा निकाल !….,२ दिवसांनंतरही मानवी अवयव सापडत आहेत ….

२७ मे या दिवशी इयत्ता १० वीचा निकाल !

पुणे – महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च २०२४ मध्ये इयत्ता दहावीची परीक्षा घेण्यात आली. राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी सोमवारी, म्हणजेच २७ मे या दिवशी दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीने निकाल घोषित केला जाणार असल्याचे परिपत्रकाद्वारे घोषित केले.

पुढील लिंकवर निकाल पहाता येईल !

https://mahresult.nic.in

http://sscresult.mkcl.org

https://sscresult.mahahsscboard.in

https://results.digilocker.gov.in

https://results.targetpublications.org


२ दिवसांनंतरही मानवी अवयव सापडत आहेत !

डोंबिवली स्फोट प्रकरणाचे विदारक चित्र

डोंबिवली – येथील अमुदान आस्थापनात स्फोट होऊन २ दिवस उलटून गेले, तरी घटनास्थळी अजूनही मानवी अवशेष सापडत आहेत. काही मानवी अवयवांचे अवशेष ढिगार्‍याखाली आढळले, तर काही आसपासच्या आस्थापनांच्या छतावर सापडले आहेत. येथील स्फोट दुर्घटनेत १० कामगारांचा मृत्यू, तर ६० कामगार घायाळ झाले आहेत. या प्रकरणी आस्थापनाचे मालक मलय मेहता यांना २९ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


मुंबईत ३० मेपासून ५ टक्के, तर ५ जूनपासून १० टक्के पाणी कपात !

मुंबई – मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणार्‍या जलाशयांमधील पाणीसाठ्यात घट झाल्याने दक्षतेचा उपाय म्हणून ३० मे या दिवशीपासून ५ टक्के पाणीकपात, तर ५ जूनपासून १० टक्के पाणीकपात लागू करण्याचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने घेतला आहे. ‘सर्व नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा’, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


दादर येथे अवाढव्य ‘होर्डिंग’ निष्काषित करण्याचे काम चालू !

मुंबई – दादर रेल्वेस्थानकाच्या परिसरात नियमबाह्य अवाढव्य होर्डिंग लावलेले आहे. घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेनंतर मुंबई महानगरपालिकेने दादर रेल्वेस्थानकाच्या परिसरातील अवाढव्य होर्डिंग निष्काषित करण्याचे काम चालू केले आहे. दादर (पूर्व) आणि (पश्चिम) भाग जोडणार्‍या लोकमान्य टिळक पुलाच्या येथे हे होर्डिंग आहे.