आषाढ मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !

साप्ताहिक शास्त्रार्थ

 ‘११.७.२०२१ या दिवसापासून आषाढ मासाला आरंभ होत आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत. ११.७.२०२१ ते १७.७.२०२१ या सप्ताहातील दिनविशेष देत आहोत.

१. हिंदु धर्मानुसार ‘प्लव’नाम संवत्सर, शालिवाहन शक – १९४३, दक्षिणायन, ग्रीष्मऋतू, आषाढ मास आणि शुक्ल पक्ष चालू आहे.

(संदर्भ : दाते पंचांग)

२. शास्त्रार्थ

सौ. प्राजक्ता जोशी

२ अ. चंद्रदर्शन : अमावास्येनंतर चंद्राचे ‘चंद्रकोर’रूपात प्रथम दर्शन होते. हिंदु धर्मात चंद्रदर्शनाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी चंद्रदर्शन होणे भाग्यकारक आहे; कारण चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे. सूर्यास्तानंतर लगेचच केवळ थोड्या वेळासाठी चंद्रकोर दिसते. या तिथीची देवता ब्रह्मा आहे. ११.७.२०२१ या दिवशी सायंकाळी ८.४१ पर्यंत चंद्रदर्शन आहे.

२ आ. विनायक चतुर्थी : प्रत्येक मासाच्या अमावास्येनंतर येणार्‍या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला ‘विनायक चतुर्थी’ म्हणतात. या दिवशी श्री विनायक (गणेश) व्रत करतात. या दिवशी श्री विनायकी चतुर्थी माहात्म्य, व्रतकथा आणि श्री विनायक अष्टोत्तरशत नामस्तोत्र वाचतात. या उपासनेने सर्व कार्ये सिद्ध होतात. मंगळवार, १३.७.२०२१ या दिवशी विनायक चतुर्थी आहे. मंगळवारी येणार्‍या चतुर्थीला ‘अंगारक योग’ म्हणतात.

२ इ. भद्रा (विष्टी करण) : ज्या दिवशी ‘विष्टी’ करण असते, त्या काळाला ‘भद्रा’ किंवा ‘कल्याणी’ असे म्हणतात. भद्रा काळात शुभ आणि मंगल कार्ये करत नाहीत; कारण त्या कार्यात विलंब होण्याचा संभव असतो. १३.७.२०२१ या दिवशी रात्री ८.१७ पासून १४.७.२०२१ या दिवशी सकाळी ८.०३ पर्यंत आणि १६.७.२०२१ या दिवशी उत्तररात्री ४.३५ पासून १७.७.२०२१ या दिवशी दुपारी ३.४१ पर्यंत विष्टी करण आहे.

२ ई. घबाड मुहूर्त : हा शुभ मुहूर्त आहे. १५.७.२०२१ या दिवशी सकाळी ७.१७ पासून उत्तररात्री ३.२१ पर्यंत घबाड मुहूर्त आहे.

२ उ. दग्ध योग : रविवारी द्वादशी, सोमवारी एकादशी, मंगळवारी पंचमी, बुधवारी तृतीया, गुरुवारी षष्ठी, शुक्रवारी अष्टमी आणि शनिवारी नवमी ही तिथी असेल, तर दग्ध योग होतो. दग्ध योग हा अशुभ योग असल्याने सर्व कार्यांसाठी निषिद्ध मानला आहे. १५.७.२०२१ या दिवशी गुरुवार असून सकाळी ७.१७ पासून दुसर्‍या दिवशी पहाटे ६.०७ पर्यंत षष्ठी तिथी असल्याने ‘दग्ध योग’ आहे.

२ ऊ. दुर्गाष्टमी : प्रत्येक मासाच्या अमावास्येनंतर येणार्‍या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला ‘दुर्गाष्टमी’ म्हणतात. १७.७.२०२१ या दिवशी उत्तररात्री २.४२ पर्यंत दुर्गाष्टमी आहे. या दिवशी श्री दुर्गादेवीचे व्रत करतात. दुर्गासप्तशती स्तोत्र, देवीकवच, अर्गला स्तोत्र आदी देवी स्तोत्रांचे वाचन करतात.

– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, वास्तु विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल पंडित, हस्ताक्षर मनोविश्लेषण शास्त्र विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा.

(२५.७.२०२१)

टीप १ – विनायक चतुर्थी, भद्रा (विष्टी करण), घबाड मुहूर्त, दग्ध योग, दुर्गाष्टमी, क्षयदिन आणि करिदिन यांविषयीची अधिक माहिती पूर्वी प्रसिद्ध केली आहे.

टीप २ – वरील सारणीतील शुभ / अशुभ दिवस पाहून ‘दिवस अशुभ आहे’, हे कळल्यावर ‘प्रवास किंवा इतर सेवा केल्यास त्याचे अशुभ परिणाम भोगावे लागतील’, अशी शंका साधकांच्या मनात निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा साधकांनी संतांची पुढील वचने लक्षात ठेवावीत.

१. हरिचिया दासा हरि दाही दिशा ।
भावें जैसा तैसा हरि एक ।। – संत एकनाथ

अर्थ : भक्ताला सर्वत्र देवाचेच दर्शन होते. भक्ताचा जसा भाव असतो, त्या स्वरूपात त्याला देव दिसतो.

२. तुका म्हणे हरिच्या दासा ।
शुभ काळ दाही दिशा ।। – संत तुकाराम

अर्थ : तुकाराम महाराज म्हणतात, ‘भक्तासाठी सर्व दिशा आणि वेळ ही शुभच असते.’

ज्या व्यक्तीच्या मनात सतत ईश्वरप्राप्तीचा ध्यास आहे, अशा भक्ताची काळजी ईश्वर घेतो.’