कोल्हापूर – १४ जुलै या दिवशी सारथी बोर्डाची महत्त्वाची बैठक होणार असून या बैठकीनंतर पुढील रूपरेषा ठरणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सारथीसंदर्भात लक्ष केंद्रीत करावे आणि सारथीसाठी १ सहस्र कोटी रुपयांचे साहाय्य घोषित करावे, अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी ९ जुलै या दिवशी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत केली.
छत्रपती संभाजीराजे भोसले पुढे म्हणाले, १ वर्षात १ सहस्र कोटी रुपये व्यय करणे सोपे नाही; मात्र शासन १, २, ३ असे टप्पे करू शकते. सारथीसाठी जो निधी लागणार आहे तो अद्याप अर्थ विभागाने दिलेला नाही. सारथीच्या बोर्डाने ९०० कोटी रुपयांची मागणी केली आहे. आम्ही शासनाला १ मासाचा कालावधी दिला होता तो आता संपत आला आहे. तरी या संदर्भात शासनाने तात्काळ पावले उचलावीत.