केवळ हिंदूंच्याच संतांचे चित्र का ? मुसलमानांच्या मुल्लाचे का नाही ?

‘भूत पोलीस’ या भयपटाच्या पोस्टरमध्ये हिंदु संतांची चित्रे असल्याच्या कारणावरून धर्मप्रेमी हिंदूंनी संताप व्यक्त करत उपस्थित केला प्रश्‍न !

हिंदूंच्या सहिष्णुतेचा अपलाभ उठवणारे चित्रपटसृष्टीवाले ! अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांचा असा उपयोग चित्रपटसृष्टी कधीतरी करते का ? अन्य धर्मियांना त्यांच्या श्रद्धा आहेत, मग हिंदूंच्या श्रद्धेचे काय ? हीच भारताची धर्मनिरपेक्षता आहे का ?

मुंबई – पवन कृपलानीनिर्मित ‘भूत पोलीस’ या चित्रपटाच्या ‘पोस्टर’वर अभिनेत्याच्या मागच्या बाजूच्या चित्रामध्ये हिंदूंच्या संतांची चित्रे देण्यात आली आहेत. यामध्ये चित्रपटाचा मुख्य अभिनेता सैफ अली खान यांच्या हातात एक विचित्र प्रकारचे टोकेरी शस्त्र दाखवण्यात आले असून त्याच चित्राच्या पाठीमागे एक नागा साधू अघोरी साधना करत असल्याचे आणि अन्य एक साधू उभा असल्याचे दाखवण्यात आले आहे. हिंदी चित्रपटांतून सातत्याने होत असलेल्या हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान पहाता या चित्रपटाच्या पोस्टरवरील हिंदूंच्या संतांची चित्रे पाहून ‘केवळ हिंदूंच्याच संतांचे चित्र का ? मुसलमानांच्या मुल्लाचे का नाही ?’, असा प्रश्‍न सामाजिक माध्यमांवरून धर्मप्रेमी हिंदूंकडून उपस्थित करण्यात येत आहे.

काही दिवसांपूर्वी प्रेमकथेवर आधारित असलेल्या चित्रपटाला ‘सत्यनारायण की कथा’ हे नाव देण्यात आले होते; मात्र हिंदूंनी केलेल्या विरोधानंतर या चित्रपटाचे नाव पालटण्यात येत असल्याचे चित्रपटाचे दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी घोषित केले. यापूर्वी ‘दबंग ३’ या सलमान खान यांच्या चित्रपटातील एका गाण्यामध्ये हिंदूंच्या संतांना ‘गॉगल’ घालून आणि हातात ‘गिटार’ घेऊन पाश्‍चात्त्यांप्रमाणे नाचतांना दाखवण्यात आले होते. या विरोधात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केलेल्या विरोधानंतर गाण्यातील हे दृश्य वगळण्यात आले.
‘भूत पोलीस’ हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार ? हे अद्याप घोषित करण्यात आलेले नाही, तसेच या चित्रपटाचे कथानक काय आहे ? हेही चित्रपटाशी संबंधित व्यक्तींकडून सांगण्यात आलेले नाही; मात्र या चित्रपटाच्या पोस्टरवर ज्या पद्धतीने चित्रे दाखवण्यात आली आहेत, त्यावरून यामध्ये अघोरी कृत्ये दाखवण्यात आली आहेत का ? त्यांचा संदर्भ हिंदूंच्या संतांशी दाखवण्यात आला आहे का ? असे प्रश्‍न निर्माण होत आहेत. (‘भूत पोलीस’ या चित्रपटाच्या पोस्टरवरील चित्राविषयी चित्रपटाच्या निर्मात्यांनी स्पष्टीकरण द्यावे. हिंदूंच्या श्रद्धांचा अवमान करणार्‍या चित्रपटांवर हिंदूंनी संघटितपणे बहिष्कार घातला पाहिजे ! – संपादक)