हिंदु राष्ट्राच्या भावी पिढीला घडवण्याचे मोठे दायित्व शिक्षकांवर ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ परिसंवादामध्ये ४०० हून अधिक शिक्षकांचा सहभाग

सद्गुरु (कु.) स्वाती खाडये

सोलापूर – देशामध्ये युवकांची संख्या अधिक; मात्र त्यांना राष्ट्र आणि धर्म यांचे शिक्षण दिले जात नसल्याने त्यांचा वैज्ञानिक शिक्षणाकडे कल आहे. पूर्वी गुरुकुल शिक्षणपद्धतीत राष्ट्राभिमान आणि धर्माभिमान शिकवला जात होता. आता मात्र मुलांना अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास चार ओळीत शिकवला जात आहे. इंग्रजी माध्यमातील शाळांमध्ये विशेष करून हिंदु विद्यार्थिनींना कुंकू लावणे, अलंकार घालणे, अशा प्रकारे धर्माचरणाच्या कृती करण्याविषयी अनेक बंधने घातली जात आहेत. राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना लहानपणापासून राष्ट्र आणि धर्म यांचे धडे दिले. त्यामुळे ते जाज्वल्य इतिहास घडवू शकले. हिंदु मुलांना घरामध्ये किंवा शाळेत, तसेच मंदिरात कुठेही धर्मशिक्षण दिले जात नाही. त्यामुळे शिक्षकांवर हिंदु राष्ट्राच्या भावी पिढीला घडवण्याचे मोठे दायित्व आहे. राष्ट्राभिमान आणि धर्माभिमान शिकूनच विद्यार्थ्यांनी शाळेतून बाहेर पडावे, यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोवा येथील शिक्षकांसाठी ‘सध्याच्या कठीण काळात साधना करून आनंदी कसे रहावे ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ आयोजित केलेल्या परिसंवादात त्या मार्गदर्शन करत होत्या. या ‘ऑनलाईन’ परिसंवादात ४०० हून अधिक शिक्षक सहभागी झाले होते. परिसंवादाचा उद्देश सनातनच्या साधिका सौ. पौर्णिमा गडकरी यांनी सांगितला, तर सूत्रसंचालन सौ. विशाखा म्हाम्हरे यांनी केले. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे गुजरात राज्य, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभाग समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी ‘विद्यादान करतांना साधनेचे करायचे प्रयत्न’ या विषयावर मार्गदर्शन केले, तर गोवा येथील सनातन संस्थेचे श्री. संगम बोरकर यांनी ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्याची शिक्षणक्षेत्राची स्थिती’ या विषयावर मार्गदर्शन केले.

शिक्षकांचे मनोगत

१. श्री. दुर्गानाथ देशमुख, टेंभुर्णी, जिल्हा सोलापूर – आजच्या परिसंवादातील माहिती महत्त्वपूर्ण होती. पूर्वी मूल्य शिक्षण होते, ते वर्ष २००५ मध्ये बंद केले. आता धर्मशिक्षण देण्यासाठी कायद्याने कोणताच आधार नाही. पाश्चिमात्य संस्कृती वाढल्याने हिंदूंना धार्मिक शिक्षण मिळत नाही. मुलांना धार्मिक शिक्षण मिळावे, यासाठी शाळा हे एकमेव माध्यम आहे; मात्र शाळेत हे शिक्षण दिले जात नाही. त्यामुळे भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी पिढी घडवतांना आम्हाला समस्या निर्माण होत आहेत. यासाठी हिंदूंच्या मुलांना धार्मिक शिक्षण देण्यासाठी कायदा करण्यात यावा.

२. श्री. शरदचंद्र रानडे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक, रत्नागिरी – हा कार्यक्रम अतिशय उपयुक्त आहे. मी मुख्याध्यापक असतांना विद्यार्थ्यांवर गीतेचा संस्कार करण्यासाठी प्रयत्न केला, तसेच व्यसनमुक्त राहून ‘आधी केले मग सांगितले’, असे प्रयत्न मी करतो. पुढील पिढी संस्कारक्षम बनवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

३. श्री. सातप्पा परीट, निपाणी, जिल्हा बेळगाव – आम्ही शाळेतील मुलांना मूल्यशिक्षण देण्यासाठी सप्ताहातील २ घंटे वेळ दिला आहे. त्याचा अचूक वापर करून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करता येते. सध्या रामायण आणि महाभारत यांतील गोष्टी विद्यार्थ्यांना सांगून त्यांच्यावर संस्कार निर्माण करणे आवश्यक आहे.

४. सौ. शोभा ताठे – गेली ४५ वर्षे आम्ही शाळेत ‘नीतीमूल्य शिक्षण’ हा उपक्रम राबवत आहोत. हे मूल्यशिक्षण देण्यासाठी दीड सहस्र व्हिडिओ सिद्ध केले आहेत आणि ते विद्यार्थ्यांना पाठवतो. यासाठी आता ‘यू ट्यूब चॅनेल’ही चालू केला आहे. आजच्या परिसंवादात सद्यःस्थितीविषयी पुष्कळ चांगले मार्गदर्शन लाभले.

५. सौ. स्मिता विजय जांभळी, पर्यावरण शिक्षिका, सांगली – पर्यावरण विषयक शिक्षण हे नवीन धोरण शासन लागू करत आहे. पर्यावरणशास्त्राच्या आधारे मुलांना चांगले संस्कार निर्माण करणारे शिक्षण देता येईल, असे वाटते. ‘पर्यावरण’ या विषयावर अभ्यास शिकवतांना आम्ही भारतीय संस्कृतीचीही जोड देत आहोत.

क्षणचित्रे

१. या परिसंवादाच्या वेळी शिक्षकांनी केलेल्या मागणीनुसार प्रत्येक शनिवारी सायंकाळी ६ ते ७ या वेळेत ‘ऑनलाईन धर्मसत्संग’ घेण्याचे निश्चित करण्यात आले.

२. ‘या ‘ऑनलाईन’ परिसंवादाच्या माध्यमातून ‘पुष्कळ महत्त्वपूर्ण माहिती मिळाली’, असे अभिप्राय अनेक शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे दिले.

शिक्षकांनी तणावमुक्त होण्यासाठी सकारात्मक राहून साधना करणे आवश्यक ! – संगम बोरकर, सनातन संस्था

श्री. संगम बोरकर

सध्याची पिढी आदर्श आणि गुणसंपन्न बनवण्याचे दायित्व शिक्षकांवर आहे. त्यातच मागील २ वर्षांपासून विद्यार्थ्यांना ‘ऑनलाईन’ पद्धतीने अभ्यासक्रम शिकवावा लागत आहे. त्यातील तांत्रिक अडचणी, तसेच स्वत:च्या कुटुंबियांचे दायित्व या सर्वांचा आपल्या मनावर नकळत ताण येतो. अशा स्थितीत स्थिर रहाण्यासाठी आणि मनोबल वाढण्यासाठी सकारात्मक राहून साधना करणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्यांची दिशाभूल करणार्‍या ‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या अभ्यासक्रमाला वैध मार्गाने विरोध करा ! – संगम बोरकर, सनातन संस्था

‘एन्.सी.ई.आर्.टी.’ने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकात इतिहासातील काही महत्त्वाच्या व्यक्ती आणि क्रांतीकारक यांच्या इतिहासाचा समावेश करण्यात आलेला नाही. या माध्यमातून पराक्रमी महान राजांचे विचार संपवण्याचे षड्यंत्र चालू असून विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्यात येत आहे. याविषयी आपल्या वरिष्ठांना सांगून याचा वैध मार्गाने विरोध करणे आवश्यक आहे.

शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नीतीमूल्ये आणि धर्म यादृष्टीने योग्य आचरण करण्यास शिकवावे ! – मनोज खाडये, गुजरात राज्य, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण विभाग समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

श्री. मनोज खाडये

१. भारताला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे झाली; मात्र या प्रदीर्घ काळात शैक्षणिक क्षेत्राचा विचार केल्यास आधुनिक विज्ञान आणि निधर्मीपणा या पद्धतीचे शिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आले. जगातील कोणत्याही देशात ज्या धर्माचे बहुसंख्य लोक रहातात, त्या धर्माची शिक्षणपद्धती असते; पण आपल्या देशात तशी स्थिती नाही, हे दुर्दैव आहे. ज्या शिक्षणामुळे आयुष्यात खर्‍या अर्थी यशस्वी व्हायला शिकवले जाते, ते खरे ‘शिक्षण’ होय. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ‘ऑनलाईन’ शिक्षण देतांना त्यांना नीतीमूल्यांचे शिक्षण, तसेच धर्माच्या दृष्टीने योग्य आचरण करण्यास शिकवावे.

२. धर्मांतर, लव्ह जिहाद, लॅण्ड जिहाद, अशा विविध माध्यमांतून देशाचे शत्रू कार्यरत आहे, याचा सामना करण्यासाठी स्वत:ही धर्मशिक्षण घ्या आणि विद्यार्थ्यांमध्येही त्याविषयी जागृती करा.

३. इस्रायलने सैनिकी शिक्षण सक्तीचे केल्याने तेथील नागरिक देशभक्त आहेत. त्यामुळे त्यांना वेगळी देशभक्ती शिकवावी लागत नाही; मात्र भारतातील विद्यार्थी विदेशात शिक्षणासाठी गेल्याचा अकारण स्वाभिमान बाळगतात.

४. जवाहरलाल नेहरू विद्यापिठातील एका विद्यार्थ्यासाठी प्रतिवर्षी ११ लाख रुपये व्यय केला जातो; मात्र याच विद्यालयाच्या प्रांगणात देशविरोधी ‘भारत तेरे टुकडे होंगे, इन्शा अल्ला’, तसेच ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या जातात.

५. अलिगड मुस्लीम विद्यापिठातील विद्यार्थ्यांनी आतंकवादी मन्नान वाणी याच्या मृत्यूनंतर वर्षपूर्तीचा कार्यक्रम आयोजित केला, तर काशी विश्वविद्यालयाच्या अभ्यासक्रमातून रामायण आणि महाभारत यांचा अभ्यासक्रम वगळण्यात आला, असे गंभीर अपप्रकार शिक्षणक्षेत्रात घडत असल्याने शिक्षणव्यवस्थेत अमूलाग्र पालट करण्याची आवश्यकता आहे.