‘…नाहीतर मला क्लीन चिट द्या’ !
मुंबई, ६ जुलै (वार्ता.) – मी सत्ताधारी पक्षाचा आमदार असून माझ्यावर आरोप म्हणजे सरकारवर आरोप आहे. त्यामुळे सरकारने मला क्लीन चिट द्यावी, अशी मागणी ‘मनी लाँड्रिंग’ प्रकरणामुळे कारवाई चालू झालेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेच्या सभागृहात केली.
आमदार प्रताप सरनाईक म्हणाले की, सक्तवसुली संचालनालयाकडून (‘ईडी’) विनाकारण मला त्रास दिला जात आहे. घोटाळा झालेला आहे कि नाही, हे पडताळणे राज्य सरकारचे दायित्व आहे. ‘एम्.एम्.आर्.डी.ए.’ हा विभाग राज्य सरकारचा आहे. आर्थिक गुन्हे शाखेकडून अहवाल मागवण्यात यावा. माझ्यामुळे सरकारची अपर्कीती होत आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या घोटाळ्याचे अन्वेषण ‘ईडी’ करत आहे. मी गृहमंत्र्यांना ते पत्र लिहिले आहे की, जर मी गुन्हा केला असेल, तर शिक्षा भोगायला सिद्ध आहे; मात्र गुन्हाच केला नसेल, तर मला आरोपातून ‘क्लीन चीट’ देण्यात यावी.
यावर गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले की, मला सरनाईक यांनी निवेदन दिले आहे. ‘एम्.एम्.आर्.डी.ए.’कडून माहिती मागवण्याची सूचना केली आहे. त्यानंतर याविषयी योग्य निर्णय घेऊ.