चंद्रकांत पाटील यांच्याकडून ५२ साखर कारखान्यांची चौकशी करण्याची अमित शहा यांच्याकडे मागणी

साखर कारखान्यांच्या विक्रीतील अपहाराचे प्रकरण

चंद्रकांत पाटील

मुंबई – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्राद्वारे ५२ साखर कारखान्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याही दोन कारखान्यांचा समावेश असून त्याविषयी चंद्रकांत पाटील म्हणाले की, नितीन गडकरी यांनी त्यांच्या दोन कारखान्यांविषयी यापूर्वीच तीन वेळा लिलाव होऊनही कुणीच समोर आले नाही, असे बंद पडलेले कारखाने लिलावात घेतले असल्याचे स्पष्ट केले आहे.

चंद्रकांत पाटील यांनी ३ जुलै या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवून राज्यातील सहकारी साखर कारखान्यांची कवडीमोलाने विक्री करून झालेल्या अपव्यवहारावर कारवाई करण्याची विनंती केली. जरंडेश्वर साखर कारखाना विक्रीविषयी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) केलेल्या कारवाईचे त्यांनी स्वागत केले, तसेच त्याच पद्धतीने कारवाई होण्यासाठी ५२ साखर कारखान्यांची सूची पत्रासमवेत केंद्रीय गृहमंत्र्यांना पाठवली आहे.