कोरोनाची तिसरी लाट : लहान मुलांना धोका आणि घ्यावयाची काळजी !

कोरोनाची तिसरी लाट बालकांना संसर्ग करील, असा अनुमान आहे. त्यामुळे लहान मुलांची सर्वच स्तरावर कशी काळजी घ्यावी ?  कोरोनाच्या धोक्याची लक्षणे कोणती ? याविषयी मार्गदर्शन करणारा हा लेख…

१. मुलांमध्ये संसर्ग कसा होऊ शकतो ?

सध्या मुलांच्या शाळा बंद आहेत, तसेच एकत्रित खेळणेही बंद आहे. त्यामुळे मुले अन्य ठिकाणांहून कोरोना घरी घेऊन येण्याची शक्यता न्यून आहे. मुलांमध्ये पालकांमुळे संसर्ग होण्याची शक्यता अधिक असल्याने पालकांनी बाहेर जावे लागल्यास योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे. बाहेर जातांना पालकांनी सॅनिटायझेशन, मास्क वापरणे आणि सामाजिक अंतर राखणे यांचे काटेकोर पालन करावे. पालक चांगले असतील, तर घरातील मुलेही निरोगी रहातील.

डॉ. कल्पना सांगळे

२. मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण आणि त्याचे स्वरूप

९० ते ९५ टक्के मुलांना सौम्य आजार होतो. त्यातील ८० टक्के मुलांना तर काहीच लक्षणे दिसत नाहीत. ५ ते ६ टक्के मुलांमध्ये मध्यम ते तीव्र स्वरूपाचा आजार होतो, त्यात काहींना प्राणवायूची आवश्यकता भासू शकते. २ ते ३ प्रतिशत मुलांना तीव्र स्वरूपाचा ‘कोविड न्यूमोनिया’ किंवा ‘MIS-C’ (Multisystem Inflammatory Syndrome) आणि ‘MIS_N’ नावाचे आजार होऊ शकतात आणि त्यावर ‘कोविड बालरोग अतीदक्षता विभागा’ (Covid Pediatric Intensive Care Unit) मध्ये उपचार केले जातात.

३. सौम्य आजारात मुलांना घरी कसे हाताळावे ?

या लेखात आपण ज्या ९० ते ९५ टक्के मुलांमध्ये सौम्य लक्षणे आढळतात, त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याने घरी कसे हाताळावे, ते पहाणार आहोत. मुलांच्या खालील गोष्टींवर लक्ष ठेवले पाहिजे.

अ. शारीरिक तापमान

आ. रक्तातील प्राणवायूची टक्केवारी (‘पल्स ऑक्सिमीटर’वर मोजतात)

इ. नाडीचे ठोके म्हणजे पल्स (‘पल्स ऑक्सिमीटर’वर दिसते)

ई. श्वासाची गती (एका मिनिटात किती वेळा छातीचा भाता वर-खाली होतो, ते मोजणे)

उ. मुलांच्या लघुशंकेचे प्रमाण (मुलांनी दर ३ ते ४ घंट्यांनी भरपूर लघुशंका केली पाहिजे. ६ घंटे उलटूनही लघुशंकेला न जाणे, हे धोक्याचे लक्षण आहे.)

वरील ५ सूत्रांची सारणी बनवून त्यात सकाळ-सायंकाळी नोंद करावी. आपल्या नेहमीच्या बालरोगतज्ञांना ही सारणी प्रतिदिन पाठवावी. मुले कोरोना पॉझिटिव्ह (सकारात्मक) झाल्यापासून ते पुढे १४ दिवस अशी नोंद करावी.

४. धोक्याची लक्षणे कोणती ?

खालीलप्रमाणे लक्षणे आढळल्यास लगेच आपल्या डॉक्टरांना आधी भ्रमणभाष करून कल्पना द्यावी आणि त्यांच्या सल्ल्याने रुग्णालयामध्ये घेऊन जावे.

अ. सलग ३ दिवसांच्या वर ताप सारखा चढ-उतार होणे

आ. ऑक्सिजनची पातळी ९४ टक्क्यांच्या खाली जाणे

इ. नाडीचे ठोके वाढणे किंवा कमी होणे

खालील सारणीत वयानुसार सामान्य स्थितीत नाडीचे ठोके किती असतात, ते दिले आहेत.

ई. श्वासाची गती वाढणे

खालील सारणीत वयानुसार सामान्य स्थितीत श्वासाची गती किती असते, ते दिले आहे.

उ. लघुशंकेचे प्रमाण न्यून होणे : ६ घंट्यांपेक्षा अधिक काळ होऊनही लघुशंका न करणे.

ऊ. मूल निरुत्साही होणे, ग्लानी येणे किंवा झोपेची गुंगी येण्याचे प्रमाण वाढणे

ए. अंगावर लाल पुरळ यायला लागणे, डोळे किंवा ओठ लाल होणे

ऐ. आकडी येणे (convulsions)

५. मुलांमध्ये संसर्ग झाल्याचे आढळल्यास घरी कोणती काळजी घ्यावी ?

अ. घरातील बाकीच्या व्यक्तींनी मास्क घालावा.

आ. वयस्कर व्यक्तींना मुलांपासून लांब ठेवावे.

इ. शक्यतो एकाच व्यक्तीने (आई किंवा वडील) मुलाचे दायित्व घ्यावे.

ई. मुले मोठी असल्यास त्यांना मिठाच्या पाण्याने गुळण्या करण्यास सांगाव्यात.

उ. बाळ जर आईचे दूध पीत असेल, तर आईने मास्क घालून आणि कोविडसंबंधी सर्व काळजी घेऊन आपल्या बाळाला स्तनपान करावे, ते बंद करण्याची आवश्यकता नाही.

ऊ. अलगीकरणात असतांना मुलांनी आराम करावा. ताप उतरल्यानंतर आणि त्यानंतर परत सलग ३ दिवस ताप आला नाही, तर घरातल्या घरात थोडे शाळेत जसे कवायतीचे व्यायाम प्रकार करतात, तसे व्यायाम करू शकतो; पण उगाच दमू नये.

ए. मुलांशी सतत बोलणे चालू ठेवावे. त्यांच्या मानसिक स्थितीचा अंदाज घेत रहावा.

६. शेवटचे अन् महत्त्वाचे

९० ते ९५ टक्के मुले घरी राहूनही बरी होतात. त्यासाठी घराचे आरोग्य चांगले ठेवले की, मातेचे आणि पर्यायाने बालकाचे आरोग्य चांगले रहाते. घर आनंदी ठेवा. यासह पालक आणि डॉक्टर यांचे एकमेकांमधील सामंजस्यही महत्त्वाचे आहे. डॉक्टर आपल्याला वेळोवेळी साहाय्य करतीलच; पण बालकाचा आहार, घरातील वातावरण आणि लेखात सांगितलेल्या ५ सूत्रांचे निरीक्षण करून स्वतःची सतर्कता अन् आरोग्य टिकवून ठेवणे मात्र आपल्या हातात आहे.

– डॉ. कल्पना सांगळे, बालरोगतज्ञ, पुणे