जास्त देयक आकारणार्‍या भिवंडी येथील सिराज मेमोरियल रुग्णालयाचा परवाना २ मासांसाठी रहित !

रुग्णालयाने रुग्णांकडून आकारलेली अधिकची रक्कमही सव्याज प्रशासनाने वसूल करून घ्यावी !

ठाणे, २ जुलै (वार्ता.) – भिवंडी शहरात कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी परवाना दिलेल्या आधुनिक वैद्य नुरुद्दीन अन्सारी यांच्या सिराज मेमोरियल रुग्णालयाने रुग्णांकडून उपचाराचे अधिकचे देयक आकारले, हे लेखा समितीच्या पडताळणीतून निदर्शनास आले. महानगरपालिका प्रशासनाने रुग्णालय प्रशासनाला कळवूनही रुग्णालयाने हे पैसे रुग्णांना परत दिलेले नाहीत. कोविड रुग्णांच्या मृत्यूच्या संदर्भात आयोजित बैठकांनाही रुग्णालयाचे व्यवस्थापक अनुपस्थित होते. शेवटी महानगरपालिकेच्या वतीने सिराज मेमोरिअल रुग्णालयाला देण्यात आलेली नोंदणी प्रमाणपत्राची अनुमती २ मासांसाठी रहित करण्यात आली आहे. २ मासांच्या कालावधीत रुग्णालयाचे संपूर्ण कामकाज बंद ठेवण्यात यावे, अन्यथा कारवाई केली जाईल, असे आदेश महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी बजावले आहेत.