रायगड येथील प्रख्यात वैद्य तथा सनातनचे ३५ वे संत आयुर्वेद प्रवीण पू. वैद्य विनय भावे (वय ६९ वर्षे) यांचा देहत्याग !

वर्ष २०१३ मध्ये ‘रायगड भूषण’ पुरस्काराने करण्यात आले होते सन्मानित !

पू. वैद्य विनय भावे

रत्नागिरी – मूळचे वरसई, जिल्हा रायगड येथील प्रख्यात वैद्य तथा सनातनचे ३५ वे संत आयुर्वेद प्रवीण पू. वैद्य विनय नीळकंठ भावे (वय ६९ वर्षे) यांनी २५ जूनच्या रात्री १० वाजता रत्नागिरी येथे देहत्याग केला. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांच्या पार्थिवावर २६ जूनला सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

पू. वैद्य भावेकाका हे सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात असलेल्या मोर्डे येथे रहात होते. त्यांच्या पश्चात पत्नी श्रीमती विद्या भावे, मुलगा श्री. विक्रम भावे, सून सौ. वैदेही विक्रम भावे आणि नात ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. इंद्रश्री विक्रम भावे, असा परिवार आहे. पू. भावेकाका यांचा परिवार सनातनच्या मार्गदर्शनाखाली साधनारत आहे.

पू. वैद्य विनय भावे यांचा परिचय

‘पू. वैद्य विनय नीळकंठ भावे हे मूळचे रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात असलेल्या वरसई या गावचे आहेत. वैद्य परंपरेची त्यांच्या घराण्यातील त्यांची पाचवी पिढी आहे. त्यांनी स्वतःच्या मालकीचा ‘श्री अनंतानंद औषधालय’ नावाचा आयुर्वेदाची औषधे बनवण्याचा कारखाना स्थापून शास्त्रोक्त आणि प्रभावी औषधांची निर्मिती करत अनेक वर्षे आयुर्वेदाची सेवा केली. अवघ्या महाराष्ट्रातील वैद्यांमध्ये ते ‘वरसईकर वैद्य भावे’, म्हणून प्रसिद्ध होते. रुग्णांवर उपचार करणे, तसेच औषधनिर्मिती या दोन्ही क्षेत्रांतील त्यांचा अनुभव दांडगा होता. अभ्यासू वृत्ती, इतरांना सर्वतोपरी साहाय्य करणे, मनमिळाऊ स्वभाव आणि त्यागी वृत्ती ही त्यांची स्वभाववैशिष्ट्ये होती. पू. भावे यांना रायगड जिल्हा परिषदेने २०१३ या वर्षी ‘रायगड भूषण’ पुरस्काराने सन्मानित केले होते.

गेल्या काही वर्षांपासून ते ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ला आयुर्वेदशास्त्रातील संशोधनासाठी साहाय्य करत होते.

पू. भावेकाका यांनी देवद येथील सनातन आश्रमात राहून सनातनचे संत परात्पर गुरु पांडे महाराज यांचीही सेवा केली होती. त्यांच्या देहत्यागामुळे आयुर्वेद क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.’

अभ्यासू आणि त्यागी वृत्ती असलेले सनातनचे ३५ वे संत पू. वैद्य विनय भावे !

(परात्पर गुरु) डॉ. आठवले

१. साधनेचा आरंभ

अ. ‘१९८६ या वर्षी मी वैद्य प.पू. अण्णा करंदीकर यांच्याकडे अध्यात्म शिकायला जात असे, तर वैद्य पू. भावे वैद्यकी शिकायला जात असत. प.पू. अण्णांकडे आमची प्रथम भेट झाली. पुढे १९८७ या वर्षी प.पू. अण्णा मला प.पू. भक्तराज महाराज यांच्याकडे इंदूरला घेऊन गेले. पू. भावे प.पू. भक्तराज महाराज यांच्याकडे वर्ष १९८८ पासून भंडारे आणि उत्सव यांसाठी येत असत.

आ. मी जेव्हा वर्ष १९८९ मध्ये पनवेल आणि पेण येथे सत्संग घ्यायला आरंभ केला, तेव्हा पू. भावे सत्संगाला नियमितपणे येत असत.

२. काही गुणवैशिष्ट्ये

२ अ. मनमिळाऊ : मूळची प्रकृती अंतर्मुख असली, तरी ‘मनमिळाऊ’ या गुणामुळे पू. भावे कुणाशीही सहजतेने बोलू शकत.

२ आ. साक्षीभाव

१. शारीरिक अस्वास्थ्य एवढेच नाही, तर हृदयविकारावरील शस्त्रक्रिया, अशा प्रसंगीही ते अगदी स्थिर होते.

२. कठीण अशा कौटुंबिक प्रसंगांकडेही ते साक्षीभावाने पहात.

२ इ. अभ्यासू : पुढे येणार्‍या तिसर्‍या महायुद्धाच्या काळात आधुनिक वैद्य, औषधे इत्यादी काहीच उपलब्ध असणार नाही. त्या काळात उपाय कसे करायचे ? याविषयी सनातन संस्था नामजप, न्यास, मुद्रा, स्वसंमोहन उपचारशास्त्र (सध्या दोन ग्रंथ उपलब्ध आहेत. पुढील ग्रंथ उपलब्ध होणार आहेत.) इत्यादी अनेक विषयांवर ग्रंथ प्रकाशित करणार आहे. पू. भावे यांनी संकलित केलेले ‘औषधी वनस्पतींची लागवड कशी करावी ?’ आणि ‘जागेच्या उपलब्धतेनुसार औषधी वनस्पतींची लागवड’ हे दोन ग्रंथ प्रकाशित झाले आहेत, तर आयुर्वेदावर आधारित घरगुती उपायांच्या संदर्भातील ग्रंथासाठी पू. भावे यांनी साहाय्य केले आहे.’

२ ई. त्यागी वृत्ती : पू. भावे यांच्या त्यागी वृत्तीची अनेक उदाहरणे आहेत. सनातन संस्थेशी संबंधित तीन उदाहरणे येथे देत आहे.

१. वर्ष १९९० मध्ये ‘सनातन संस्था’ अध्यात्म विश्वविद्यालय स्थापण्याचा विचार करत होती. हे पू. भावे यांना कळल्यावर त्यांनी त्यांची १२ एकर भूमी त्यासाठी देऊ केली. पुढे धरणामुळे तो पूर्ण परिसरच पाण्याखाली जाणार असल्यामुळे ती जागा उपलब्ध झाली नाही.

२. ते त्यांचा आयुर्वेदाची उत्पादने बनवण्याचा व्यवसाय ‘श्री अनंतानंद औषधालय’ या नावे करत. श्री अनंतानंद साईश हे प.पू. भक्तराज महाराज यांचे गुरु. अनुमाने २ वर्षांपूर्वी त्यांनी तो व्यवसायही सनातन संस्थेला देऊ केला होता.

३. वर्ष २००९ मध्ये ‘सनातन संस्थेवर बंदी आल्यास साधकांनी रहायला जायचे कुठे ?’ याविषयी विचार चालू असतांना त्यांनी त्या वेळी घेतलेल्या एका नवीन जमिनीचाही वापर करण्यास सांगितले होते.

२ उ. इतरांना साहाय्य करणे : केवळ आयुर्वेदाचे उपायच नाही, तर इतरांना जे काही साहाय्य करता येईल, ते पू. भावे करत असत.

व्यष्टी साधनेत प्रगती करण्यासाठी तन-मन-धन यांचा त्याग करावा लागतो. त्याचसमवेत साधनेची तळमळही असावी लागते. हे गुण पू. भावे यांच्यात होते. त्यामुळेच त्यांची साधनेत उन्नती होऊन ते संतपदी पोचले होते. ‘पू. भावे यांची पुढील प्रगती अशीच जलद गतीने होईल’, याची मला खात्री आहे.’

(परात्पर गुरु) डॉ. आठवले