नागपूर येथील कोरोनासंबंधी आर्थिक व्यवहारांच्या धारिका ‘सीलबंद’ करून ठेवण्याचा महापौरांचा आदेश !

३० जूनला महापालिकेची ‘विशेष सभा’

(प्रातिनिधिक छायाचित्र)

नागपूर – कोरोनाच्या काळात औषधांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका आभा पांडे यांनी २२ जून या दिवशी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्थगन प्रस्ताव मांडला. ‘प्रशासनाकडून अहवाल दिल्यावर स्वतंत्र चर्चा व्हावी’, अशी मागणी त्यांनी सभागृहात केली. यामुळे येत्या ३० जून या दिवशी महापालिकेची ‘विशेष सभा’ घेण्यात येणार आहे. सभा होईपर्यंत कोरोनासंबंधी प्रशासनाने केलेल्या आर्थिक व्यवहारांच्या धारिका आयुक्तांनी ‘सीलबंद’ करून ठेवण्याचा आदेश महापौर दयाशंकर तिवारी यांनी सभागृहात दिला.