आसाममध्ये सरकारी योजनांसाठी २ अपत्ये धोरणाची कार्यवाही करणार ! – मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा

गौहत्ती (आसाम) – आसाम राज्यशासनाकडून चालवण्यात येणार्‍या, तसेच जनतेला अर्थसाहाय्य करण्यासाठी लागू केलेल्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अधिकाधिक २ अपत्ये असण्याचे धोरण आवश्यक ठरणार आहे. या धोरणाची कार्यवाही टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी दिली. केंद्रशासनाच्या योजनांमध्ये हे धोरण लागू होणार नसल्याचेही मुख्यमंत्री सरमा यांनी स्पष्ट केले. (जनहित साधण्यासाठी जर आसाम शासन हे करू शकते, तर केंद्र सरकारनेही अशा प्रकारच्या नियमाची कार्यवाही केली पाहिजे ! यासमवेतच सर्व राज्य सरकारांनीही हे धोरण अवलंबणे आवश्यक आहे. – संपादक)

सरमा म्हणाले की, शाळा आणि महाविद्यालये यांमध्ये विनामूल्य प्रवेश किंवा पंतप्रधान आवास योजनेखालील घरे यासाठी या धोरणाची कार्यवाही करू शकणार नाही; मात्र राज्यशासनाने एखादी गृहनिर्माण योजना चालू केली, तर त्यासाठी २ अपत्ये धोरणाची कार्यवाही केली जाऊ शकते.